IND-PAK: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर व्हिसाच्या अडचणी दूर; १५० पाकिस्तानी वधू भारतात दाखल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 14 h ago
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मुलींचे भारतातील तरुणांशी ठरलेले लग्न अखेर मार्गी लागल्याने वधूंना मिळालासा दिलासा
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मुलींचे भारतातील तरुणांशी ठरलेले लग्न अखेर मार्गी लागल्याने वधूंना मिळालासा दिलासा

 

नागपूर 

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कुटुंबीयांना भारताशी विवाह जुळवण्यासाठी वाघा-अटारी सीमेवरून सहजगत्या व्हिसा आणि प्रवास मिळायचा, मात्र भारत सरकारने 'ऑपरेशन सिंदूर' राबवल्यानंतर हा मार्ग बंद झाला होता. यामुळे भारतामधील तरुणांसोबत लग्न ठरलेल्या किमान १५० पाकिस्तानी महिलांचे विवाह रखडले होते. अखेर सर्व अडचणींवर मात करत या १५० पाकिस्तानी वधू आणि त्यांचे कुटुंबीय भारतात पोहोचले आहेत, अशी माहिती नागपूरचे समुदाय नेते राजेश झांबिया यांनी रविवारी दिली.

'ऑपरेशन सिंदूर' या लष्करी मोहिमेनंतर केंद्र सरकारने अटारी मार्गावरील व्हिसा आणि सीमा मार्ग बंद केले होते, ज्यामुळे सिंध प्रदेशातील नागरिकांचा प्रवास थांबला होता. त्यानंतर नागपूर आणि इतर भारतीय शहरांमधील तरुणांसोबत विवाह ठरलेल्या या वधूंच्या कुटुंबीयांनी पाकिस्तानातील घोटकी येथील शादानी दरबारचे आध्यात्मिक प्रमुख संत युधिष्ठिरलाल शादानी यांच्या मदतीने भारताच्या गृह मंत्रालयाकडे (MHA) पाठपुरावा केला. गृह मंत्रालयाने वधू व त्यांच्या कुटुंबीयांना हवाई मार्गाने प्रवास करण्याच्या अटेशिवाय व्हिसा मंजूर केला.

विविध देशांच्या मार्गातून भारतात आगमन

या महिलांनी ओमान (मस्कत), दुबई, श्रीलंका आणि बांगलादेश यांसारख्या विविध देशांच्या पारगमन (transit) मार्गांचा वापर करत भारतात प्रवेश केला आहे. या प्रक्रियेअंतर्गत नागपूरमधील १५ प्रकरणांसह एकूण १५० वधू आणि त्यांचे कुटुंबीय भारतात पोहोचल्याचे सांगण्यात आले आहे. अद्यापही पाकिस्तानात अशा ३०० हून अधिक महिला विवाहाच्या प्रतीक्षेत असून, त्यांनाही लवकरात लवकर व्हिसा मिळावा अशी मागणी समुदायाकडून करण्यात येत आहे.