नवी दिल्ली
भारताच्या खाजगी अंतराळ संशोधनामध्ये (Space Research) एक प्रभावी आणि नाविन्यपूर्ण वातावरण तयार करण्याची गरज असल्याचे सांगत, जगभरातील तरुणांना करिअर घडवण्यासाठी भारताकडे ओढा राहावा अशी स्थिती निर्माण करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. राष्ट्रीय अंतराळ दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान मोदींनी देशातील प्रमुख २० स्पेस स्टार्टअप्सच्या सीईओ आणि संस्थापकांशी संवाद साधला, ज्याचा तपशील रविवारी जाहीर करण्यात आला.
अवकाश संशोधन क्षेत्रात भारताची खर्च-स्पर्धात्मकता (Cost-competitiveness) आणि प्रचंड टॅलेंट पूल यांमुळे देश जागतिक स्तरावर वेगाने आपले स्थान निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जेव्हा एखादी मोठी कामगिरी साध्य होते, तेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे वेधले जाते, असे पंतप्रधान म्हणाले. परदेशात गेलेले भारतीय नागरिक आता मायदेशी परतत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला स्पेस इनोव्हेशनचे केंद्र बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम केले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. सरकारकडून धोरणांमध्ये सातत्य राखले जात असून, जोखीम पत्कडणाऱ्या उद्योजकांना पूर्ण पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या बैठकीदरम्यान, भारतातील पहिल्या स्पेस-टेक युनिकॉर्न असलेल्या 'स्कायरोट एरोस्पेस'सह विविध स्टार्टअप्सच्या प्रमुखांनी आगामी काळात दरमहा एका रॉकेटचे प्रक्षेपण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. तसेच येत्या १८ महिन्यांत जागतिक स्तरावर ग्राउंड स्टेशन नेटवर्क उभे करण्याचा त्यांचा मानस आहे. शेती, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि पर्यावरण यांसारख्या सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित क्षेत्रांमध्ये अंतराळ तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी या स्टार्टअप्सना केले. दरम्यान, चांद्रयान-३ च्या यशोगाथेची आठवण करून देत पंतप्रधानांनी देशवासीयांना राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या शुभेच्छा दिल्या.