"दोन देशांमधील कोणतेही संबंध तेव्हाच यशस्वी होतात, जेव्हा ते 'परस्पर हिताच्या' (Mutual Interest) कसोटीवर उतरतात," अशा अत्यंत स्पष्ट शब्दांत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बांगलादेशला संदेश दिला आहे. शनिवारी 'इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम'मध्ये बोलताना जयशंकर यांनी बांगलादेशसोबतचे सध्याचे संबंध आणि पाकिस्तानची दहशतवादी नीती यावर अत्यंत रोखठोक आणि परखड मते मांडली.
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणावर थेट उत्तर टाळले, पण भूमिका स्पष्ट!
सध्या बांगलादेशने भारताकडे त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची (Extradition) मागणी लावून धरली आहे. या प्रश्नावर थेट उत्तर देणे जयशंकर यांनी टाळले, पण भारताची भूमिका अत्यंत स्पष्ट केली. ते म्हणाले, "मला एवढंच सांगायचं आहे की, कोणतेही संबंध टिकण्यासाठी ते आमच्याही फायद्याचे असायला हवेत. शेजाऱ्यांनी फक्त माझ्याच हिताचा विचार करावा, अशी माझी अजिबात अपेक्षा नाही. मलाही त्यांच्या हिताचा आदर करावा लागेल आणि त्यांच्याकडूनही मला तीच अपेक्षा आहे. जेव्हा आपण एका 'कॉमन ग्राउंड'वर (समान भूमिकेवर) येतो, तेव्हाच संबंध सुरळीत चालतात."
दोन वर्षांपूर्वी शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर आता भारत आणि बांगलादेशातील संबंध सावरण्याच्या दृष्टीने, बांगलादेशचे सध्याचे पंतप्रधान तारिक रहमान यांचा संभाव्य भारत दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. भारताने त्यांना द्विपक्षीय चर्चेसाठी आणि आगामी 'ब्रिक्स' (BRICS) परिषदेसाठी नवी दिल्लीत निमंत्रण दिले आहे. येत्या काही आठवड्यांत हा दौरा व्हावा, यासाठी पडद्यामागून चर्चा सुरू आहेत.
मात्र, ५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांनी नवी दिल्लीतून माध्यमांशी जो 'व्हर्च्युअल' संवाद साधला, त्यावरून बांगलादेशने तीव्र संताप व्यक्त केला होता. हसीना यांच्या या विधानांचा आणि रहमान यांच्या दौऱ्याचा संबंध जोडण्याचाही प्रयत्न ढाक्याकडून झाला. यावर भारताने मात्र स्पष्ट केले आहे की, हसीना यांच्या या संवादात भारताचा कोणताही सहभाग नव्हता आणि त्यांच्या विधानांना भारताचा पाठिंबाही नाही.
पाकिस्तानला सणसणीत टोला: "तो एक 'युनिक' देश आहे!"
या फोरममध्ये पाकिस्तानबद्दल विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना जयशंकर यांनी पाकिस्तानची चांगलीच कानउघाडणी केली. ते म्हणाले, "पाकिस्तान हा जगातला एक 'युनिक' देश आहे. पण हे वेगळेपण चांगल्या अर्थाने नाही! आजच्या या आधुनिक काळात शेजारील देशावर दबाव टाकण्यासाठी आणि हल्ले करण्यासाठी 'दहशतवादाचा' इतक्या पद्धतशीरपणे आणि सातत्याने वापर करणारा पाकिस्तान हा जगातला एकमेव देश आहे."
दहशतवादाच्या या मुद्द्यामुळे भारतातील जनमानसावर कसा परिणाम होतो, हे सांगताना जयशंकर म्हणाले, "मी एका लोकशाही देशाचा मंत्री आहे. माझ्या देशातील जनतेचे यावर काय मत आहे आणि त्यांच्या भावना काय आहेत, याकडे मी डोळेझाक करू शकत नाही."
अमेरिका-पाक संबंधांवरही भाष्य
अमेरिका आणि पाकिस्तानच्या जुन्या संबंधांबद्दल बोलताना ते म्हणाले की, "त्यांच्या संबंधांचा इतिहास खूप जुना आहे, पण आता मोठ्या प्रमाणावर आपण (भारताने) अमेरिकेसोबत आपले स्वतःचे अत्यंत भक्कम संबंध प्रस्थापित केले आहेत."
दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला भारताने पुन्हा एकदा आरसा दाखवला आहे, तर दुसरीकडे बांगलादेशलाही 'संबंधांमध्ये परस्पर आदर आणि हित महत्त्वाचे असते', याची जाणीव करून दिली आहे.