सप्ताहासाठी जमीन देणाऱ्या अकरम पठाण यांचे इंदुरीकर महाराजांकडून कौतुक

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 12 h ago
AI निर्मित प्रातिनिधिक चित्र
AI निर्मित प्रातिनिधिक चित्र

 

भक्ती चाळक

महाराष्ट्राच्या राजकारणात अन् समाजकारणात सध्या एकमेकांवर चिखलफेक, आरोप-प्रत्यारोपांची राळ आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे असताना मराठवाड्याच्या एका छोट्याशा गावात मात्र एक या सगळ्याला चपराक देणारा प्रसंग घडलाय.

आज समाजात किरकोळ कारणावरून वाद उकरले जातात, एका मुस्लिम व्यक्तीने आपल्या स्वतःच्या जमिनीचा तुकडा भक्तीच्या अखंड सप्ताहासाठी मोकळ्या मनाने सोपवून दिला.

वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावात संत शंकर स्वामी महाराज यांच्या फिरत्या नारायणी नामसप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराजांचे कीर्तन रंगले. नेहमी आपल्या खास शैलीत कानउघाडणी करणाऱ्या महाराजांनी, जेव्हा जागा देणाऱ्या अकरम पठाण यांच्या औदार्याबद्दल बोलायला सुरुवात केली, तेव्हा संपूर्ण मंडपात टाळ्यांचा कडकडाट झाला.

अशी माणसं मिळायला नशीब लागतं!
सप्ताहाला स्वतःची जमीन देणाऱ्या अकरम पठाण यांचे कौतुक करताना इंदुरीकर महाराज अगदी मनापासून बोलले. ते म्हणाले की, या जागेच्या मालकाचे जितके आभार मानू तितके थोडेच आहेत. कोणतीही शंका मनात न ठेवता, कसल्याही चमत्काराची अपेक्षा न करता त्यांनी ही जागा दिली. शंकर स्वामींनीच त्यांच्या हृदयात स्थान मिळवले आणि हा योग जुळून आला."

ते पुढे म्हणाले की, "संतांची लीला आपण फक्त सांगतो, पण या माणसाने ती प्रत्यक्षात दाखवून दिली. एवढे मोठे शेत आणि तेही ऐन श्रावण महिन्यात सप्ताहासाठी उपलब्ध करून देणे साधी गोष्ट नाही. शंकर स्वामींचे आशीर्वाद या कुटुंबाच्या पाठीशी कायम राहतील. शंकर महाराज तुम्हाला तीन पिढ्या काही कमी पडू देणार नाही."

आजकाल जमिनीच्या एका तुकड्यासाठी सख्खे भाऊ एकमेकांचे वैरी बनतात. अशा काळात अकरम पठाण यांनी धार्मिक सलोख्याचे सर्वात मोठे उदाहरण उभे केले.

इंदुरीकर महाराजांनी याच मंचावरून भाष्य करत सांगितले की, "आपल्या आजूबाजूला आणि सत्तेमध्ये अनेक स्वार्थी लोक दिसतात, जे फक्त दुसऱ्यांची उणीदुणी काढण्यात व्यस्त असतात. मी सहसा कोणाची खोटी स्तुती करत नाही आणि मला त्याची गरजही नाही. पण अकरम पठाण यांनी जे काम केले आहे, त्याचे मनापासून कौतुक झालेच पाहिजे. खंडाळा परिसरातील ज्या ज्या लोकांनी या सप्ताहाला अन्नाची साथ दिली, त्या सर्वांचे आभार मानणे गरजेचे आहे."

खंडाळा गावातील या प्रसंगाने अख्ख्या महाराष्ट्राची माने जिंकली. सोबतच समाजाला जोडणारा एक नवा संदेशही दिला. अकरम पठाण यांनी मोकळ्या मनाने दिलेली ती जागा आणि वारकऱ्यांनी मिळून सजवलेला हा भक्तिसोहळा... या दोन्ही गोष्टींनी मिळून महाराष्ट्राच्या खऱ्या संस्कृतीची साक्ष दिली आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter