जम्मू-काश्मीर प्रशासनाची मोठी कारवाई; ६०० पैकी १५० बांगलादेशी नागरिकांना केले हद्दपार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 37 m ago
प्रातिनिधिक इमेज
प्रातिनिधिक इमेज

 

श्रीनगर 

जम्मू-काश्मीरमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या ६०० बांगलादेशी नागरिकांची ओळख पटवण्यात आली असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात १५० जणांना पश्चिम बंगालमध्ये पाठवण्यात आले आहे. प्रशासनाने काश्मीर खोऱ्यात केलेल्या सर्वेक्षणानंतर ही कारवाई करण्यात आली असून, उर्वरित नागरिकांची हद्दपार प्रक्रिया सुरू आहे.

विशेष विमानाने हद्दपार

सोमवारी विशेष भारतीय हवाई दलाच्या विमानाने १५० बांगलादेशी नागरिकांना बागडोगरा येथे आणण्यात आले, जिथे त्यांना सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांच्या स्वाधीन करण्यात आले. श्रीनगर पोलिसांच्या देखरेखीखाली असलेल्या एका विशेष शिबिरात या लोकांना ठेवण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर रोजी आणखी १५० जणांच्या दुसऱ्या तुकडीची हद्दपार कारवाई केली जाणार आहे.

उच्चस्तरीय समितीची स्थापना

सीमेवरील भागात राहणाऱ्या अवैध परदेशी नागरिकांची ओळख पटवण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने लोकसंख्या बदल अभ्यासण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती (HLCDC) स्थापन केली होती. या समितीने दिलेल्या निर्देशानुसार जम्मू-काश्मीर प्रशासनाने खोऱ्यातील विविध जिल्ह्यांत सर्वेक्षण करून सुमारे ६०० अवैध बांगलादेशी नागरिकांची यादी तयार केली होती. न्यायमूर्ती प्रकाश प्रभाकर नावलेकर (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती देशभरातील लोकसंख्येतील बदलांचे वैज्ञानिक मूल्यांकन करून योग्य ते धोरणात्मक उपाय सुचवत आहे.