वाशीममधील उपजिल्हा रुग्णालयाजवळ डीपीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवणारे लाईनमन शाकिब शेख आणि सॅस टीम
आतिफ अहमद
धुराचे मोठमोठे लोट, आगीच्या भडकणाऱ्या ज्वाळा अन् काही अंतरावरच उपचारासाठी खाटेवर खिळलेले शेकडो रुग्ण. वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या अगदी जवळ असलेल्या विद्युत डीपीने अचानक पेट घेतला. या घटनेने संपूर्ण परिसरात एकाच खळबळ उडाली. क्षणाक्षणाला आगीचे रौद्र रूप वाढत होते आणि कधीही भीषण स्फोट होऊन मोठा अनर्थ घडण्याची भीती निर्माण झाली होती.
नेमके काय घडले
नूतन कॉलनी परिसरातील तिरंगा चौकाजवळ असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाला लागूनच वीज डीपी होती. अचानक डीपीतून ठिणग्या उडाल्या आणि काही सेकंदांतच आगीचा भडका उडाला. रुग्णालयालगतच ही घटना घडल्याने रुग्ण, त्यांचे नातेवाईक अन् डॉक्टरांच्या पोटात भीतीचा गोळा आला.
'वन सेकंड, वन कॉल – न्यू लाईफ' या तत्त्वावर काम करणाऱ्या 'सॅस' (सर्वधर्म आपत्कालीन संस्था) या संस्थेच्या कंट्रोल रूमला घटनेची खबर मिळाली. आदर्श शिक्षक उमेश महिकर यांनी ही बातमी पाहताच क्षणाचाही विलंब न करता संस्थाप्रमुख श्याम सवाई यांना फोन केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्याम सवाई यांनी तात्काळ गाडी घटनास्थळाकडे वळवली.
अन्नाचा घास बाजूला ठेवून शाकिबची धाव
आपत्कालीन प्रसंगात स्वतःची कर्तव्यनिष्ठा कशी असावी, याचा एक नवा वस्तुपाठच महावितरणचे लाईनमन शाकिब गनी शेख यांनी घालून दिला. संध्याकाळची वेळ असल्याने शाकिब आपल्या घरी निवांत जेवायला बसले होते. पहिलाच घास तोंडात घेणार, तेवढ्यात त्यांच्या मोबाईलवर सवाई यांचा फोन आला.
रुग्णालयाजवळील आगीची कल्पना मिळताच आणि तिथे कित्येक निष्पाप रुग्णांचे प्राण टांगणीला लागल्याचे समजताच शाकिब यांनी हातातील अन्नाचा घास तसाच बाजूला ठेवला. जीवाची तमा न बाळगता शाकिब थेट आगीच्या ठिकाणी पोहोचले. तिथे पोहोचल्या पोहोचल्या त्यांनी सर्वात आधी संपूर्ण परिसराचा विद्युत प्रवाह खंडित केला. त्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे विजेचा मोठा भडका उडण्यापासून वाचला आणि रुग्णालयातील रुग्णांना नवा जन्म मिळाला.
शाकिब यांनी या घटनेविषयी सांगताना आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, "मी संध्याकाळी जेवायला बसलो होतो, इतक्यात श्याम सवाईंचा फोन आला अन् उपजिल्हा रुग्णालयाजवळ डीपी पेटल्याचं समजलं. रुग्णांचा जीव धोक्यात आहे ऐकताच मी घटनास्थळी पोहोचलो आणि सर्वात आधी परिसरातील विद्युत प्रवाह खंडित केला. त्यानंतर मी श्याम सवाई आणि त्यांच्या टीमला या बचावकार्यात पूर्ण सहकार्य केले."
ते पुढे म्हणाले की, "ड्युटी प्रामाणिकपणे बजावणे आणि लोकांसाठी धावून जाणे, हीच ईश्वरसेवा आहे. माझा धर्मही मला हेच शिकवतो की, आपले कर्तव्य आणि आपली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडली पाहिजे. संकटाच्या वेळी कोणत्याही भेदभावाविना लोकांच्या कामी आले पाहिजे. प्रामाणिकपणे आपली ड्युटी करून लोकांचे प्राण वाचवण्यातच मला खरे समाधान मिळते."
सामाजिक सुधारणेचे चालतेबोलते केंद्र
कारंजा शहरात आज जो बंधुभावाचा आणि सुरक्षिततेचा माहौल पाहायला मिळतो, त्यामागे श्याम सवाई यांचे मोठे योगदान आहे. महात्मा गांधींच्या विचारांवर निष्ठा ठेवून जगणारे सवाई यांनी शहरात 'सॅस'च्या माध्यमातून मदतीचे मोठे जाळे विणले आहे. अपघात असो, आग असो की कोणतीही आपत्ती, सवाई आणि त्यांची सर्वधर्मीय टीम धावून जाते. देशात कुठेही द्वेषाचे वातावरण असले, तरी कारंजामध्ये सवाई यांनी निर्माण केलेला हा सलोखा पाहिला की बंधुभाव अजूनही टिकून असल्याचा प्रत्यय येतो.

या संपूर्ण आगीच्या तांडवातून एका मोठ्या दुर्घटनेला कसे रोखले, याबाबत सांगताना श्याम सवाई यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. ते म्हणाले, "उमेश महिकर यांचा फोन येताच मी रुग्णालयाकडे धाव घेतली. आगीने भयंकर रूप धारण केले होते. तेव्हा मी लगेच लाईनमन शाकिबला फोन केला. शाकिबने जेवणाचे ताट सोडून येत लगेच लाईन बंद केली, अन्यथा शेकडो रुग्णांचा जीव धोक्यात आला असता. त्यानंतर आम्ही फायर ब्रिगेडला बोलावले. आमचे सॅसचे सहकारी, रुग्ण कल्याण समितीचे संतोष घोंगडे, रुग्णालयाचे मिथुन ठाकूर आणि इतर सहकाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता मदत केली. सर्वांच्या या एकजुटीमुळेच आज कारंजातला एक मोठा अनर्थ सुदैवाने टळला."
खांद्याला खांदा लावून केले बचावकार्य
या बचावकार्यात प्रत्येक जण आपापल्यापरीने मदतीचा हात पुढे करत होता. आगीची भीषणता ओळखून रुग्ण कल्याण समितीचे सदस्य संतोष घोंगडे यांनी नगरपरिषद अग्निशमन विभागाचे अधिकारी शुभम झोपाळे यांच्याशी संपर्क साधला. रुग्णालयाचे तांत्रिक सहाय्यक मिथुन ठाकूर आणि श्याम सवाई यांनी रुग्णालयातील फायर बंब वापर करून आगीची तीव्रता सुरुवातीलाच आटोक्यात आणली.
थोड्याच वेळात अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली आणि जवानांनी धैर्याने आगीवर पूर्णपणे ताबा मिळवला. या संपूर्ण धडपडीत सामाजिक कार्यकर्ते शाम घोडेस्वार, कपिल महाजन, सावन कोल्हे आणि वैभव रोडे यांनीही जीवाची पर्वा न करता मोलाचे सहकार्य केले.
कारंजा लाडच्या या छोट्याशा शहराने संपूर्ण देशाला एक खूप मोठा धडा शिकवला आहे. द्वेषाच्या राजकारणापेक्षा माणुसकी आणि प्रेमाची ताकद कितीतरी पटीने मोठी असते, हेच कारंजाच्या या वीरांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.