साजिदा खान : स्वयंपाकाच्या आवडीला रोजगाराचे साधन बनवणारी मास्टरशेफ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 13 h ago
साजिदा खान
साजिदा खान

 

ओनिका माहेश्वरी

मुंबईच्या धकाधकीच्या आणि पळपळीच्या आयुष्यात रोजचं जेवण बनवणं हे अनेक जण केवळ एक रूटीन काम मानतात. पण याच मुंबईत अशाही काही व्यक्ती आहेत, ज्यांच्यासाठी स्वयंपाक म्हणजे एक कला, एक प्रयोग आणि स्वतःला व्यक्त करण्याचं सुंदर माध्यम आहे!

अशीच एक थक्क करणारी गोष्ट आहे शेफ साजिदा खान यांची. त्यांनी स्वतःच्या कुकिंगच्या आवडीला फक्त स्वतःपुरतं मर्यादित ठेवलं नाही, तर हजारो लोकांना स्वावलंबी बनवणारा आणि त्यांची स्वप्नं पूर्ण करणारा एक भक्कम मंच उभा केला. एक समर्पित आई, गृहिणी अन् यशस्वी उद्योजिका म्हणून साजिदा खान यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे.

रसोई ते स्वतःचे क्रिएटिव्ह जग
साजिदा खान यांना लहानपणापासूनच वेगवेगळ्या पाककृती बनवण्याची आणि नवनवीन प्रयोग करण्याची भारी आवड होती. त्यांच्यासाठी किचन म्हणजे केवळ अन्न शिजवण्याची जागा नव्हती, तर ते त्यांचे एक वेगळेच आनंदी जग होते.

काळानुसार त्यांच्या एका गोष्टी लक्षात आली. मुंबईसारख्या महापालिकेत कुकिंग आणि बेकिंगचे व्यावसायिक धडे घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी दर्जेदार संस्थांची खूप मोठी कमतरता आहे. जुन्या पारंपरिक कुकिंग क्लासेसमध्ये ती मजा आणि ते शिकण्याचे आधुनिक वातावरण मिळत नव्हते. याच एका विचाराने त्यांच्या मनात नव्या स्वप्नाची बीजे रोवली.
 

हिरानंदानीच्या पॉश भागात सुरू झालेला 'तो' धाडसी प्रयोग
गृहिणी आणि आईची जबाबदारी सांभाळत त्यांनी पवईच्या हिरानंदानी गार्डन्ससारख्या पॉश भागात अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 'कुलिनरी क्राफ्ट स्टुडिओ'ची पायाभरणी केली.

सुरुवातीचा काळ मुळीच सोपा नव्हता. घर-कुटुंब आणि स्वतःचं स्वप्न या दोन टोकांवर तोल सांभाळताना त्यांची दमछाक व्हायची. पण त्यांनी आपल्या ध्येयाशी कधीच तडजोड केली नाही. बघता बघता त्यांचा हा छोटासा प्रयत्न मुंबईतील सर्वात चर्चेत असलेला बेकिंग आणि कुकिंग स्टुडिओ बनला!

रेसिपीपेक्षा अन्नामागील विज्ञानावर भर
साजिदा खान यांचे मत अगदी स्पष्ट आहे. स्वयंपाक बनवणे म्हणजे केवळ एखादी रेसिपी कॉपी करणे नव्हे, तर तो एक जिवंत अनुभव आहे! लोक जसे नाटक, सिनेमा किंवा संगीताचा आनंद घेतात, तसाच आनंद आणि आत्मविश्वास स्वयंपाक करताना मिळाला पाहिजे.

म्हणूनच त्यांच्या स्टुडिओत येणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ रेसिपी गोखायला लावली जात नाही, तर:

कोणत्याही डिशमागचे मूळ विज्ञान काय आहे?

मसाल्यांचा योग्य समतोल कसा साधावा?

चव आणि सादरीकरण (फूड प्लेटिंग) यांचा ताळमेळ कसा बसवावा?

एका साध्या जेवणाला मेजवानीचे रूप कसे द्यावे?

या सगळ्या गोष्टींचे प्रत्यक्ष आणि व्यावहारिक धडे इथे दिले जातात.

अत्याधुनिक किचन अन् आंतरराष्ट्रीय ट्रेनिंग
पूर्णपणे एअर-कंडिशन्ड आणि आधुनिक उपकरणांनी सज्ज असलेल्या या स्टुडिओत अनुभवी शेफच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी काम करतात.

इथे केवळ भारतीय जेवणच नाही, तर चॉकलेट टेम्परिंग, ब्रेड आणि केक बेकिंग, पेस्ट्री मेकिंग, पास्ता, वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय डिशेस आणि फूड सादरीकरणाचे बारकावे शिकवले जातात. व्यावसायिक किचनमध्ये काम करताना वेळेचे नियोजन कसे करायचे आणि गुणवत्तेशी तडजोड न करता काम कसे करायचे, याचेही धडे दिले जातात.
 

महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याची नवी पहाट
"जे शिक्षण माणसाला स्वतःच्या पायावर उभे करते, तेच खरे शिक्षण!" या विचारावर साजिदा खान यांचा ठाम विश्वास आहे. त्यांच्या या स्टुडिओने विशेषतः महिलांसाठी रोजगाराचे एक नवे दालन खुले करून दिले आहे.

इथे प्रशिक्षण घेतलेल्या कित्येक महिलांनी आज स्वतःच्या घरातून होम-बेकरी आणि फूड बिझनेस सुरू केले आहेत. अनेक तरुणांनी नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. थोडक्यात सांगायचे तर, हा स्टुडिओ केवळ शिकण्याचे केंद्र राहिलेले नसून सामाजिक आणि आर्थिक क्रांतीचे माध्यम बनला आहे.

साजिदा खान यांची ही यशोगाथा सिद्ध करते की, जेव्हा एखाद्या स्त्रीची जिद्द आणि तिची आवड एकत्र येते, तेव्हा ती केवळ स्वतःचे आयुष्य बदलत नाही, तर समाजात रोजगाराच्या आणि प्रगतीच्या शेकडो नव्या वाटा निर्माण करते.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter