इहसान फझिली
इंग्लंडच्या नयनरम्य कॉट्सवोल्ड परिसरात चहाच्या दुकानांपुढे लोकांची वर्दळ आणि कश्मीरी संस्कृतीबद्दलचे अथांग प्रेम... या दोघांच्या अनोख्या मिलाफातून जन्माला आले 'चाय जाई'. गेल्या दहा वर्षांच्या प्रवासात ६० हून अधिक प्रकारच्या चहाची चव खवय्यांना चाखवत या ठिकाणाने लोकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
जम्मू-कश्मीर सरकार अन् कॉर्पोरेट क्षेत्रात काम केल्यानंतर रुही नाझकी यांनी पुन्हा आपल्या जन्मभूमीत परतण्याचा निर्णय घेतला. त्यांनी केवळ एक कॅफे सुरू केला नाही, तर कश्मीरी परंपरा आणि आधुनिक चहा संस्कृतीचा एक अप्रतिम सांस्कृतिक मंच उभा केला.
मुंबई ते झेलमचा किनारा
मुंबईत दोन दशके घालवल्यानंतर जेव्हा रुही नाझकी यांनी कश्मीरमध्ये काहीतरी नवीन सुरू करण्याचे ठरवले, तेव्हा २०१५ च्या सुमारास प्रसिद्ध व्यावसायिक जगदीश महाट्टा (मेहता) यांच्याशी त्यांची भेट झाली.
रुही नेहमी इंग्लंडला जायच्या. तिथल्या कॉट्सवोल्ड चहाच्या दुकानांमधील आपुलकी आणि कश्मीरची समृद्ध चहा संस्कृती एकत्र आणण्याची कल्पना त्यांना सुचली. बाहेरच्या जगात कश्मीरी संस्कृतीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे, ही खंत त्यांच्या मनात होती.
त्या या अनुभवाबद्दल सांगतात, "आम्ही ब्रिटीश कॉट्सवोल्डच्या धर्तीवर एक ऊबदार आणि आपुलकीचे ठिकाण तयार करायचे ठरवले. त्यात कश्मीरी परंपरेतील सुंठ-मीठाचा चहा (नमकीन चाय), कहवा आणि अनेक स्थानिक प्रकार जोडले."
श्रीनगरच्या अत्यंत निसर्गरम्य अशा रेसिडेन्सी रोडवर, झेलम नदीच्या किनाऱ्यावर हे चाय जाई उभं आहे. समोरच पोलो ग्राऊंड आणि नदीच्या संथ पाण्यावर तरंगणारा दोंगा म्हणजेच कश्मीरी लोकांचे पारंपरिक हाऊसफूट! या ठिकाणच्या प्रत्येक कोपऱ्यात कश्मीरी कला, संस्कृती आणि हस्तकलेचा स्पर्श जाणवतो.
रमझान अन् कर्फ्यूच्या संकटावर मात
जून २०१६ मध्ये रमझानच्या काही दिवसांआधी चाय जाईची सुरुवात झाली. सुरुवातीचा महिना उपवासाचा असल्याने व्यवसाय मंद होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत ८ जुलै रोजी दहशतवादी कमांडर बुरहान वानी मारला गेला अन् संपूर्ण कश्मीर खोऱ्यात कर्फ्यू, इंटरनेट बंदी आणि आंदोलनांचे सत्र सुरू झाले. सलग चार महिने सर्व काही ठप्प होते.
पण हार मानतील त्या रुही नाझकी कसल्या! हिवाळा सुरू होताच त्यांनी कश्मीरी संस्कृतीतील एक खास खाद्यप्रकार हरिसा सर्व्ह करायला सुरुवात केली. रुही नाझकी सांगतात, "आम्ही पूर्णपणे घरगुती पद्धतीने बनवलेला हरिसा कुटुंबांना अत्यंत आदराने आणि सन्मानाने सर्व्ह करायला सुरुवात केली. आजही आमची ही परंपरा कायम आहे."
हरिसा अन् तरुण पिढीची पसंती
हरिसा हा मटणाचा एक खास पारंपरिक पदार्थ! रात्रभर मंद आचेवर शिजवून, तांदळाचे पीठ आणि सुगंधी मसाल्यांसोबत घट्ट मळून हा पदार्थ तयार केला जातो. कडकडीत थंडीच्या दिवसांत स्थानिक 'गिरदा' किंवा तंदूरी रोटीसोबत गरमागरम हरिसा खाणे म्हणजे कश्मीरी लोकांसाठी पर्वणीच. चौदाव्या शतकात मध्य आशियातून आलेला हा पदार्थ सहसा जुन्या श्रीनगर शहरातील दुकानांमध्ये मिळायचा, पण चाय जाईने तो नव्या स्वरूपात तरुणांसमोर आणला.
थंडीच्या दिवसांत संध्याकाळच्या जेवणाला पर्याय म्हणून तरुण मंडळी इथे हरिसाचा आनंद घेऊ लागली. हरिसासोबतच कोळशाच्या आगीवर चहा अन् कहवा उकळत ठेवणारी तांब्याची पारंपरिक किटली म्हणजेच समावार इथे पाहायला मिळते.
संस्कृतीचा उत्सव आणि बॉलिवूडचे आकर्षण
चाय जाई हे केवळ खाण्यापिण्याचे ठिकाण राहिले नाही, तर तो एक सांस्कृतिक मंच बनला. इथे कश्मीरी ऋतूंचे उत्सव साजरे होऊ लागले. पांपोरच्या केशर शेतात साजरी होणारी हब्बा खातून वसंत उत्सव असो वा हिवाळी महोत्सव... कश्मीरी कलाकार, कवी आणि हस्तकलाकारांना इथे व्यासपीठ मिळाले. मुशायरा, ईद, शिवरात्री आणि नाताळचे सण इथे उत्साहात साजरे केले जातात.
या कामात रुही यांना त्यांचे वडील फारूक नाझकी यांचे मोठे पाठबळ मिळाले. फारूक नाझकी हे स्वतः नामांकित कवी, दूरदर्शन आणि आकाशवाणीचे माजी प्रमुख होते. (६ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांचे निधन झाले). रुही आवर्जून सांगतात, "सर्वसमावेशकता हा आमच्या प्रत्येक कार्यक्रमाचा गाभा आहे."
हळूहळू चाय जाईची ख्याती हिमालयाच्या पलीकडे पोहोचली. २०१८ मध्ये आलेल्या लैला मजनू या हिंदी चित्रपटाचे शूटिंग इथे झाल्यानंतर आणि अनेक बॉलिवूड कलाकारांनी इथे भेटी दिल्यानंतर तरुण पिढी अन् पर्यटकांमध्ये या जागेबद्दल एक वेगळेच भावनिक नाते निर्माण झाले.
६० हून अधिक चहाचे प्रकार
इथे जगभरातील तब्बल ६० प्रकारचे पेय उपलब्ध आहेत. यामध्ये २५ प्रकार कॉट्सवोल्ड शैलीतील, तर ७ प्रकार अस्सल कश्मीरी ग्रामीण भागातील आहेत.
हॉटेल्समध्ये सहसा न मिळणारे मक्याची रोटी, 'हान्ध' (रानभाजी), 'क्रेच' आणि तांदूळ-डाळीच्या मसाल्यांपासून बनणारा जुना पारंपरिक पदार्थ 'छेद्वार' इथे आवर्जून दिला जातो. याशिवाय कश्मीरी चाय, शिरमाल, केशर कहवा आणि 'लवासा पिझ्झा' यांसारखे नवनवीन प्रयोग इथे चाखायला मिळतात.
सरकारी कार्यालयांमध्ये कश्मीरी पोशाख 'फेरण' घालण्यावर बंधने आली, तेव्हा चाय जाईने 'फेरण'ला एक आधुनिक ब्रँड म्हणून प्रस्थापित केले. इतकेच नाही तर कागदाच्या लगद्यापासून बनणाऱ्या 'पेपर मेशी' (Papier-mâché) कलेचा वापर करून कप डिझाइन करत 'प्याला' हा ब्रँडही त्यांनी बाजारात आणला. कश्मीरी खाद्यसंस्कृती आणि परंपरेला आधुनिकतेची जोड देत 'चाय जाई'ने गेल्या दशकात संस्कृती जतन करण्याचे एक मोलाचे काम केले आहे.