फाझिला अल्लाना : भारतीय टीव्हीला रिॲलिटी शोजची ओळख करून देणारी महिला

Story by  पुणे | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
फाझिला अल्लाना
फाझिला अल्लाना

 

मृदगंधा दीक्षित

एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर भारतात सामाजिक, आर्थिक आणि लोकांच्या रोजमर्राच्या जगण्यातही स्थित्यंतरं घडत होती. या बदलत्या आणि नव्या भारताचं प्रतिबिंब इथल्या मनोरंजन विश्वात दिसत होतं. नव्वदच्या दशकात 'केबल टीव्ही'ने क्रांती घडवल्यानंतर, भारतीय दूरचित्रवाणीवर कौटुंबिक मालिकांची (डेली सोप्स) जणू त्सुनामीच आली होती. 'सास-बहू'च्या या मालिकांनी तेव्हा घराघरांतल्या प्रेक्षकांवर भुरळ घातली होती.

नेमक्या याच काळात, टेलिव्हिजन हे कौटुंबिक रडगाण्यांपुरतं मर्यादित न राहता, त्यामध्ये खऱ्या माणसांच्या खऱ्याखुऱ्या भावना, निकोप स्पर्धा, बुद्धिमत्ता आणि ग्लॅमरही असायला हवं, ही नस एका तरुण निर्मातीने अचूक पकडली. प्रवाहाविरुद्ध पोहण्याचं धाडस दाखवत 'नॉन-फिक्शन' आणि 'रिॲलिटी टीव्ही'चं चकचकीत नवं पर्व भारतात आणणाऱ्या या दूरदृष्टी बाळगून असलेल्या निर्मातीचं नाव आहे— फाझिला अल्लाना.

मुंबईतून आपल्या प्रवासाची सुरुवात करून, आज जागतिक पातळीवर स्वतःचा दबदबा निर्माण करणाऱ्या 'सोल प्रॉडक्शन्स'च्या (Sol Productions) संस्थापिका आणि व्यवस्थापकीय संचालिका फाझिला अल्लाना यांची ही वाटचाल प्रेरणादायी आहे. त्यांचा हा प्रवास एका कॉर्पोरेट टॅलेंट आणि अफाट धाडस असणाऱ्या हरहुन्नरी उद्योजिकेचा आहे.
 

बालपण, शिक्षण आणि जागतिक दृष्टिकोनाची पायाभरणी
कोणत्याही यशस्वी उद्योजकाच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या सुरुवातीच्या शिक्षणाचा आणि आजूबाजूच्या परिसराचा सिंहाचा वाटा असतो. २० मे १९७० रोजी दक्षिण मुंबईसारख्या गजबजलेल्या आणि कॉस्मोपॉलिटन भागात फाझिला यांचा जन्म झाला. त्यांचं शालेय शिक्षण मुंबईतल्या नामांकित 'क्वीन मेरी स्कूल'मध्ये झालं. लहानपणापासूनच त्यांच्यावर मुंबईच्या या वेगवान व्यावसायिक आणि कॉस्मोपॉलिटन वातावरणाचा प्रभाव होता.

शालेय शिक्षणानंतर वाणिज्य आणि अर्थशास्त्राचे धडे गिरवण्यासाठी त्यांनी 'सिडनहॅम कॉलेज'मध्ये प्रवेश मिळवला आणि १९९१ साली वाणिज्य शाखेतली पदवी पूर्ण केली. त्यांच्यातल्या व्यावसायिक कौशल्याचा, नफ्या-तोट्याच्या गणितांचा आणि स्ट्रॅटेजिक अप्रोचचा भक्कम पाया इथेच रचला गेला. पुढे मीडियासारख्या अनिश्चित क्षेत्रात स्वतःची कंपनी उभी करताना त्यांना त्याचा मोठा फायदा झाला. पदवी मिळवल्यानंतर काही वर्षं त्या फिनलंडमधल्या 'ओउलू' (Oulu) शहरात काम करत होत्या. फिनलंडमधल्या याच वास्तव्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला जागतिक दृष्टिकोण दिला.

'युटीव्ही'मधला काळ आणि मलेशियातला कॉर्पोरेट अनुभव
फिनलंडचा मुक्काम संपवून भारतात परतल्यानंतर फाझिला यांनी लगेचच स्वतःचा कुठलाही व्यवसाय सुरू करण्याची घाई केली नाही. त्याऐवजी, त्यांनी 'युटीव्ही' (UTV) सारख्या प्रस्थापित माध्यम संस्थेसोबत कामाला सुरुवात केली. खऱ्या अर्थाने हा काळ त्यांच्यासाठी मनोरंजन विश्वाची 'ग्राउंड रिॲलिटी' बारकाईने समजून घेण्याचा होता.

त्यांच्यातलं व्यवस्थापन कौशल्य, वेळेचं अचूक नियोजन आणि अंगभूत नेतृत्वगुण पारखून 'युटीव्ही'ने त्यांच्यावर मलेशियातील ऑपरेशन्सची जबाबदारी सोपवली. मलेशियात काम करताना त्यांनी 'क्रॉस-बॉर्डर कंटेंट डेव्हलपमेंट' आणि जागतिक पातळीवरील मीडिया उपक्रमांचं व्यवस्थापन लीलया हाताळलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमका कारभार कसा चालतो, बजेट्स कशी सांभाळावी लागतात आणि विविध देशांतल्या तंत्रज्ञांसोबत योग्य समन्वय कसा राखायचा, याचे प्रत्यक्ष धडे त्यांनी इथेच गिरवले.
 

'सोल प्रॉडक्शन्स'ची स्थापना
मलेशियात मिळालेल्या अनुभवानंतर स्वतःचं असं काहीतरी निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षेने जानेवारी २००३ मध्ये फाझिला यांनी आपल्या 'युटीव्ही'मधल्या सहकारी कामना निरुला मेनेझेस यांच्या साथीने 'सोल प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड'ची (Sol Productions Pvt. Ltd.) स्थापना केली. सुरुवातीच्या काळात अगदी तुटपुंजं बजेट आणि मर्यादित साधनसामुग्रीवर उभी राहिलेली ही कंपनी, आज भारतीय टेलिव्हिजनवर हजारो तासांचा दर्जेदार 'नॉन-फिक्शन' कंटेंट निर्माण करणारी एक मोठी संस्था बनली आहे.

कोणतीही यशस्वी कॉर्पोरेट संस्था चालवायची असेल, तर तिथे कामाची आणि जबाबदाऱ्यांची अचूक विभागणी असणं गरजेचं असतं. फाझिला यांनी कंपनीची 'क्रिएटिव्ह डिरेक्शन', 'क्लायंट रिलेशन्स' आणि 'ऑपरेशनल ग्रोथ'ची सूत्रं स्वतःच्या हातात ठेवली; तर दुसरीकडे कामना यांनी प्रॉडक्शन डिझाईन आणि रोजच्या कामाची अंमलबजावणी चोखपणे सांभाळली. या दोन खंबीर महिलांच्या परिपूर्ण 'लीडरशिप ड्युओ'ने तत्कालीन 'फिक्शन' मालिकांच्या गर्दीत न रमता थेट 'नॉन-फिक्शन'वर आपलं लक्ष केंद्रित केलं आणि बघता-बघता 'सोल'ला अल्पावधीतच यशाच्या शिखरावर नेऊन बसवलं.
 

निर्मितीमागचा मूळ विचार आणि 'कॉफी विथ करण'चा जन्म
फाझिला अल्लाना यांचा निर्मितीमागचा दृष्टिकोन नेहमीच प्रामाणिक आणि प्रेक्षकांशी थेट नाळ जोडणारा राहिला आहे. भारतीय टेलिव्हिजनचा इतिहास बदलून टाकणाऱ्या आणि आजच्या 'पॉप-कल्चर'चा एक अविभाज्य भाग बनलेल्या 'कॉफी विथ करण' या शोचा जन्म नेमका कसा झाला, याबद्दल बोलताना फाझिला एक रंजक किस्सा सांगतात, "हा शो आम्ही काही खूप आधीपासून प्लॅन करून ठेवला होता असं मुळीच नाही. अनेक भन्नाट क्रिएटिव्ह आयडियाज जशा अगदी अचानक सुचतात, तसंच काहीसं याबाबतीत घडलं. आम्ही त्यावेळी 'स्टार परिवार अवॉर्ड्स'चं काम पाहत होतो आणि करण जोहरच्या चित्रपटांमध्ये कायम 'परिवार' हाच मुख्य विषय असल्याने आम्ही त्याला तो अवॉर्ड शो होस्ट करण्यासाठी विचारलं. पण त्यावर तो म्हणाला की, 'मला अवॉर्ड शोपेक्षा एखादा चॅट शो करायला जास्त आवडेल'. आणि अशा प्रकारे अगदी योग्य वेळी योग्य व्यक्ती गवसल्यामुळे हा शो आकाराला आला."

"आमचा मुख्य उद्देशच मुळी या सेलिब्रिटींना एका सामान्य माणसासारखं प्रेक्षकांसमोर आणणं हा असतो. ते त्यांच्या स्वतःच्या घरात कसे वावरतात, त्यांच्या काही गमतीशीर सवयी काय आहेत, त्यांच्या मनात कोणत्या भीती दडलेल्या आहेत, हे सगळं लोकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न असतो. कारण, प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या स्टार्समध्ये दडलेला तो खरा 'माणूस' पाहायला आवडतो."

टेलिव्हिजनवरचे 'ट्रेंडसेटर' ब्रँड्स आणि धाडसी प्रयोग
'कॉफी विथ करण' व्यतिरिक्तही 'सोल प्रॉडक्शन्स'ने प्रेक्षकांना अनेक आयकॉनिक शोज दिले आहेत. 'नाच बलिये' या सेलिब्रिटी डान्स रिॲलिटी शोला तर त्यांनी भव्यतेच्या नव्या उंचीवर नेऊन ठेवलं. या शोने भारतीय रिॲलिटी शोजच्या निर्मितीचं बजेट आणि सादरीकरण एका उच्च स्तरावर नेऊन ठेवलं होतं.

यासोबतच त्यांची 'स्वयंवर सिरीज' (राखी का स्वयंवर, राहुल दुल्हनिया ले जायेगा) हा प्रयोग म्हणजे भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातला सर्वात धाडसी आणि तितकाच वादग्रस्त ठरलेला प्रयोग होता. टेलिव्हिजनवर प्रत्यक्ष विवाह सोहळ्याचं रिॲलिटी शोमध्ये रूपांतर करण्याच्या या भन्नाट कल्पनेने तेव्हा टीआरपीचे सगळे विक्रम मोडीत काढले होते.

प्रेक्षकांना नेमकं काय पाहायला आवडेल आणि त्यांना टीव्ही स्क्रीनसमोर कसं खिळवून ठेवायचं, याची उत्तम जाण फाझिला यांना आहे. 'जरा नचके दिखा', 'क्या मस्त है लाईफ', 'माय का लाल' यांसारख्या विविध शोजमधून त्यांनी युवा आणि बाल प्रेक्षकांसाठीही कंटेट निर्माण केला.

प्लॅटफॉर्मची मर्यादा ओलांडणारं कॉर्पोरेट कौशल्य
कोणत्याही आधुनिक कॉर्पोरेट कंपनीचं खरं यश हे तिच्या बदलत्या काळानुसार स्वतःला बदलून घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतं. 'सोल प्रॉडक्शन्स'च्या कामकाजाचं एक मुख्य कॉर्पोरेट सूत्र आहे ते म्हणजे: "क्रिएशन, प्रॉडक्शन आणि इम्प्लिमेंटेशन".

फाझिला यांचा सर्वात मोठा कॉर्पोरेट गुण कुठला असेल, तर तो म्हणजे त्यांचा 'प्लॅटफॉर्म ॲग्नोस्टिक' दृष्टिकोन. म्हणजेच, केवळ एखाद्या वाहिनीवर किंवा एकाच भाषेवर विसंबून न राहता, आज 'सोल प्रॉडक्शन्स' तब्बल ४० हून अधिक ब्रॉडकास्ट चॅनेल्स आणि 'ओटीटी' प्लॅटफॉर्म्ससाठी आपला कंटेंट पुरवत आहे. त्यांच्या याच व्यावसायिक प्रतिभेचं आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे, त्यांनी कंपनीचा व्यवसाय हिंदी भाषेपुरता मर्यादित न ठेवता तो ५ हून अधिक भाषांमध्ये विस्तारला आहे.

फाझिला त्यांच्या कामाच्या या मॉडेलबद्दल बोलताना म्हणतात, "कोणताही शो आमच्यासाठी खूप लहान किंवा खूप मोठा नसतो; आम्ही प्रत्येक शो त्याच्या बजेट आणि क्रिएटिव्ह गरजेनुसारच डिझाईन करत असतो." त्यांचं हे लवचिक बिझनेस मॉडेल 'सोल'ला आजच्या या स्पर्धेच्या युगात दोन पावलं पुढे ठेवतं. आजवर तब्बल ५० हून अधिक शोजची यशस्वी निर्मिती करणं, हे त्यांच्या 'क्रिएटिव्ह माईंड्स, क्वालिटी प्रॉडक्शन्स आणि ॲक्सेस टू टॅलेंट' या ब्रीदवाक्याचं खऱ्या अर्थानं मोठं यश आहे.

जागतिक पाऊलखुणा आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीचा 'मास्टरस्ट्रोक'
व्यवसाय जागतिक स्तरावर नेऊन पोहोचवण्यासाठी अत्यंत भक्कम आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय घेण्याची मोठी क्षमता लागते. फाझिला अल्लाना यांनी २००७-०८ च्या सुमारास 'झोडियाक मीडिया' (Zodiak Media - आताचा 'बनिजय ग्रुप' Banijay Group) सोबत अतिशय हुशारीने धोरणात्मक भागीदारी केली.

त्यांच्या या एका 'कॉर्पोरेट मास्टरस्ट्रोक'मुळे 'सोल प्रॉडक्शन्स'ला आंतरराष्ट्रीय फॉरमॅट्स थेट भारतात आणण्याचा आणि जागतिक स्तरावरचं मोठं आर्थिक पाठबळ मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला. एखाद्या भारतीय प्रॉडक्शन हाऊसने अशा जागतिक मीडिया समूहाशी थेट भागीदारी करून आपला व्यवसाय वाढवणं, हे फाझिला शबुद्दीन अल्लाना यांच्या बिझनेस ॲक्युमेनचं उदाहरण आहे.

बदलत्या काळाशी जुळवून घेण्याची कला
२०१५ नंतर भारतात इंटरनेट स्वस्त झालं, तशी देशात 'ओटीटी' प्लॅटफॉर्म्सची मोठी लाटच आली. टीव्हीसमोर बसणारा प्रेक्षक हळूहळू स्वतःच्या मोबाईलकडे वळू लागला. या स्थित्यंतरात अनेक जुने निर्माते मागे पडले, पण फाझिला अल्लाना यांनी मात्र इथेही स्वतःला खंबीरपणे सिद्ध करून दाखवलं.

डिजिटल युगातल्या या तरुण प्रेक्षकांना नेमकं काय हवं आहे, याचा अचूक वेध घेत त्यांनी 'हॉटस्टार', 'नेटफ्लिक्स' आणि 'ॲमेझॉन प्राईम'सारख्या प्लॅटफॉर्म्ससाठी 'नॉन-फिक्शन वेब सिरीज' बनवायला सुरुवात केली. 'नेटफ्लिक्स'वरील 'सोशल करन्सी' सारख्या शोजमधून त्यांनी स्वतःच्या कंपनीचा हा 'मल्टी-प्लॅटफॉर्म विस्तार' सिद्ध करून दाखवला.

'सोल प्रॉडक्शन्स' आज ज्या 'बनिजय ग्रुप'चा एक अविभाज्य भाग आहे, त्या मुख्य 'बनिजय आशिया' बॅनरच्या विस्तारातही फाझिला यांच्या धोरणात्मक भागीदारीचा आणि त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा मोठा वाटा आहे. 'बनिजय आशिया'च्या बॅनरखाली तयार झालेले 'द ग्रेट इंडियन कपिल शो' आणि 'रोअर ऑफ द लायन' सारखे भव्य ओटीटी प्रोजेक्ट्स, हे याच जागतिक एकत्रीकरणाचं आणि एकत्रित कॉर्पोरेट ताकदीचं उदाहरण मानलं जातं.

मनोरंजन विश्वातली 'कॉर्पोरेट शिस्त'
मुळात मनोरंजन क्षेत्र हे तिथल्या अनिश्चित वेळा, गोंधळ आणि अव्यवस्थेसाठी नेहमीच बदनाम राहिलं आहे; परंतु फाझिला यांनी मात्र 'सोल प्रॉडक्शन्स'मध्ये कडक 'कॉर्पोरेट शिस्त' आणली. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या तंत्रज्ञांना, लेखकांना आणि कलाकारांना त्यांनी नेहमीच सुरक्षित आणि अतिशय व्यावसायिक वातावरण दिलं. मनोरंजन क्षेत्रात नव्याने पाऊल ठेवणाऱ्या कलाकारांना आणि तंत्रज्ञांना योग्य प्रशिक्षण देण्यावरही त्यांचा नेहमीच भर राहिला आहे.

एका छोट्या प्रॉडक्शन हाऊसपासून सुरुवात करून एका विशाल मीडिया नेटवर्कचा मुख्य भाग बनण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. चुरशीच्या अशा या मनोरंजन क्षेत्रात सलग २१ वर्षांहून अधिक काळ एक निर्मिती संस्था यशस्वीपणे चालवणं, ही सामान्य गोष्ट नाही. भारतीय टेलिव्हिजन विश्वावर आपला स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या फाझिला अल्लाना नॉन फिक्शन पर्वाच्या शिल्पकारांपैकी एक आहेत, असंच म्हणावं लागेल.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter