सिलिगुडी
देशाच्या पूर्व सीमांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आणि अत्यंत धोरणात्मकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या सिलीगुडी कॉरिडोअरची (Siliguri Corridor) सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी पश्चिम बंगालमधील सिलीगुडीजवळ असलेल्या सुकना येथे वरिष्ठ अधिकारी आणि सुरक्षा दलांच्या प्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. 'चिकन नेक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पट्ट्यात सीमा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.
पश्चिम बंगालच्या तीन दिवसांच्या दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी झालेल्या या महत्वपूर्ण बैठकीत सीमा सुरक्षेवर अधिक प्रभावी नजर ठेवणे, केंद्रीय सुरक्षा दल, गुप्तचर यंत्रणा आणि राज्य पोलीस व प्रशासनामध्ये सुसंवाद साधणे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच 'त्रिकोणीय सुरक्षा ग्रिड' (Triangular Security Grid) स्थापन करण्याच्या फ्रेमवर्कवरही यावेळी खल करण्यात आला. सिलीगुडी कॉरिडोअर हा नेपाळ, भूतान आणि बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय सीमांच्या जवळ असल्याने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. पूर्वोत्तर राज्यांना देशाच्या उर्वरित भागाशी जोडणारा हा एकमेव भूमी मार्ग असल्यामुळे या भागाची सुरक्षा अभेद्य राखण्यासाठी आसाममधील धुब्री, बिहारमधील किशनगंज आणि पश्चिम बंगालमधील चोप्रा येथे तीन नवीन लष्करी छावण्यांद्वारे त्रिकोणीय ग्रिड उभारण्यात येत असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.