सारा मेहमूद : मुस्लीम तरुणींच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या लेखिका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 35 m ago
सारा मेहमूद
सारा मेहमूद

 

सानिया अंजुम 

अनेकदा एखादी कथा आपल्या मनात कधी रुजते, हे लेखकाला स्वतःलाही समजत नाही. सारा मेहमूदच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. तिचा हा प्रवास सुरू झाला तो वाचनाच्या आवडीपासून. एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जगभरातले तरुण लेखक आपल्या कादंबऱ्या एकेक प्रकरण करत प्रसिद्ध करायचे. सारा तिथल्या कथांमध्ये पार गुंतून जायची. पण हे सगळं वाचताना तिच्या मनात एक मोठी उणीव सतत सलत होती. भारतीय पार्श्वभूमीवर आधारित मुस्लीम साहित्य, विशेषतः आजच्या तरुण मुस्लीम महिलांच्या भावना आणि स्वप्न दाखवणाऱ्या कथा तिथे कुठेच दिसत नव्हत्या.

सारा त्या दिवसांची आठवण सांगताना म्हणते, "मी तर सहजच लिहायला सुरुवात केली होती."

वाचकाची हीच उत्सुकता पुढे जाऊन एका नव्या निर्मितीचा ध्यास बनली. तिला स्वतःला ज्या गोष्टी वाचायला आवडल्या असत्या, त्या स्वतःच लिहिण्याचा निर्णय तिने घेतला. तिचा हेतू फक्त मुस्लीम पात्रांची संख्या वाढवणे हा नव्हता, तर ती पात्रे जिवंत आणि खरीखुरी वाटणे आवश्यक होते.

सारा याबद्दल सांगते, "मला आपल्या धर्माचे प्रतिनिधित्व सकारात्मक आणि अगदी खऱ्या अर्थाने मांडायचे होते. आजच्या काळातील तरुण स्त्रियांना प्रेरणा देतील, त्यांना स्वतःच्या वाटतील अशा व्यक्तिरेखा मला घडवायच्या होत्या."

म्हणजेच जुन्या आणि पारंपारिक चौकटी मोडून काढणे भाग होते. साराने अशा स्त्रियांची कल्पना केली, ज्या कपड्यांच्या बाबतीत साध्या आहेत, आपल्या ईश्वरावर अढळ श्रद्धा ठेवतात आणि सोबतच स्वतःच्या भविष्याबद्दल प्रचंड महत्त्वाकांक्षी आहेत. आपल्या धर्माचा अभिमान बाळगूनही, फक्त धर्मापुरत्या मर्यादित न राहता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रिया तिने रेखाटल्या.

तिच्या कथांमध्ये आजच्या तरुण पिढीतील नातेसंबंध आणि प्रेमाचा विचार पाहायला मिळतो. समाजाच्या अपेक्षा आणि स्वतःच्या इच्छा यांच्यातील तणाव तिची पात्रे अतिशय संयमाने हाताळतात.
 

कथेच्या पलीकडचे वास्तव
हाच तणाव तिच्या 'बाउल्ड ओव्हर बाय द ब्रोकन' या पुस्तकात प्रकर्षाने जाणवतो. काल्पनिक विश्वाला वास्तवाच्या जवळ आणण्याच्या ध्यासातून या पुस्तकाचा जन्म झाला. पुस्तकातील प्रसंगांवर वाचकांनी "असं फक्त गोष्टींमध्येच घडतं" अशी दिलेली प्रतिक्रिया तिला बदलायची होती.

त्यावर बोलताना सारा म्हणते, "वाचक जर पुस्तकासाठी त्यांचा वेळ देत असतील, तर त्यांना काहीतरी अर्थपूर्ण आणि मोलाचे मिळायला हवे."

म्हणूनच तिने दक्षिण आशियाई तरुण स्त्रियांच्या आयुष्यातील ओळखीचे प्रसंग निवडले. गव्हाळ रंगावरून होणारी हेटाळणी असो, शिक्षण संपताच लग्नासाठी येणारा दबाव असो किंवा लग्नानंतर आपोआप जुळवून घेता येते हा गोड समज असो... या सगळ्या गोष्टी तिने अत्यंत ताकदीने मांडल्या.

या काही अद्भूत घटना नाहीत, पण याच साध्या प्रसंगांमध्ये प्रचंड ताकद आहे. रोजच्या आयुष्यातील टोमणे, अपेक्षा आणि कौटुंबिक चर्चाच तर मुलींचे भविष्य ठरवत असतात! साराने हे प्रश्न फक्त एका प्रेमकथेत गुंफले नाहीत, तर त्या निमित्ताने विवाह आणि नातेसंबंधांबद्दलच्या जुन्या समजांवर थेट बोट ठेवले.

तिने लग्नाला कथेचा शेवट मानण्यास ठामपणे नकार दिला. सारा म्हणते, "बहुतेक कथा लग्नाच्या मंडपात संपतात. पण माझ्या पुस्तकात खरा थरार लग्नानंतरच सुरू होतो."

गोष्टी मांडण्याची ही पद्धत लहान वाटली तरी खूप महत्त्वाची आहे. लग्नाचे सोहळे संपतात, पण खरे आयुष्य, एकमेकांना समजून घेणे, तडजोडी आणि नाते फुलवण्याचे खरे काम तिथूनच सुरू होते.

स्वप्न अन् श्रद्धेची सांगड
साराच्या तिन्ही पुस्तकांमध्ये एक गोष्ट आवर्जून दिसते; ती म्हणजे धर्म किंवा श्रद्धा ही एका कोपऱ्यात ठेवायची गोष्ट नसून रोजच्या आयुष्यात जगायची गोष्ट आहे.

यावर तिचे विचार स्पष्ट आहेत, "तुम्हाला तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुमच्या धर्माचा त्याग करण्याची अजिबात गरज नाही, हाच माझ्या सर्व पुस्तकांचा मुख्य गाभा आहे."

तिच्या दृष्टीने हे तत्व फक्त साहित्यापुरते मर्यादित नाही. नातेसंबंध, महत्त्वाकांक्षा आणि कठीण प्रसंगांत आपली श्रद्धा कशी कामी येते, याचा विचार वाचकांनी करावा अशी तिची इच्छा आहे.

सारा म्हणते, "वाचकांनी पुस्तक बाजूला ठेवल्यावर, आपल्या रोजच्या आयुष्यात आणि निर्णयांमध्ये श्रद्धेचा वापर कसा करता येईल, यावर नक्कीच विचार करायला हवा."

तिचा हा दृष्टिकोन फक्त तिच्या व्यक्तिगत विश्वासातून आलेला नाही, तर तिच्या शैक्षणिक प्रवासाचाही त्यावर मोठा प्रभाव आहे.
 

अध्यापन, संशोधन अन् लेखनाचा मेळ
सारा ही 'फूड सायन्स अँड न्यूट्रिशन' विषयाची सहाय्यक प्राध्यापिका आहे. संशोधन हा तिच्या व्यावसायिक आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. या शैक्षणिक प्रशिक्षणामुळे तिला कोणत्याही प्रसंगाकडे सूक्ष्मपणे पाहण्याची, प्रश्न विचारण्याची आणि सखोल विश्लेषण करण्याची सवय लागली.

ती सांगते, "माझ्या शिक्षणाने माझा दृष्टिकोन घडवला आहे. यामुळे मला प्रसंग अधिक चिकित्सकपणे आणि वेगळ्या कोनातून समजून घेता येतात."

कौलेजमधील शिकवणे, संशोधन आणि पुन्हा लेखन... एवढ्या सगळ्या गोष्टी सांभाळताना वेळेचे नियोजन करणे कठीणच! पण सारा लेखनाला अतिरिक्त कामाचा ताण मानत नाही. उलट अनेकदा थकवा दूर करण्यासाठी तिला लेखनाचाच आधार वाटतो.

आपली ही सवय सांगताना ती म्हणते, "कामाशिवाय दुसऱ्या कशासाठीही वेळ नाही असे जेव्हा मला वाटते, नेमक्या त्याच दिवशी मनातील विचार कागदावर उतरवण्यासाठी माझी धावपळ सुरू होते. तेच माझे टेन्शन घालवण्याचे साधन आहे."

हे तिचे प्रामाणिक कबुलीनामे आहेत. लेखन ही काही ती वेळापत्रकात बसवून करणारी गोष्ट नाही, तर ते तिच्या आतून उमटणारे एक उमाळे आहेत.

तिच्या दृष्टीने लेखन म्हणजे यशाच्या यादीत आणखी एक पदक मिळवणे नाही, तर मनातील विचार आणि भावना व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे.

ती अतिशय साध्या शब्दांत सांगते, "चित्रकार चित्रे काढतात, बेकर्स केक बनवतात आणि लेखक लिहितात."

आयुष्यात कितीही घाईगडबड असली तरी मनातील कलात्मकता कधीच मरत नाही, याचे हे उत्तम उदाहरण!

एक वेगळी आणि समृद्ध वाट
ऑनलाइन वाचक ते स्वतःची पुस्तके प्रकाशित करणारी लेखिका आणि प्राध्यापिका... साराचा हा प्रवास काही ठरवून झालेला नाही. साहित्य, संशोधन आणि अध्यापन एकत्र आणण्याचा कोणताही मोठा प्लॅन तिच्याकडे नव्हता. जिथे उणीव दिसली, तिथे स्वतः काहीतरी करून पाहण्याच्या इच्छेतून या प्रवासाची सुरुवात झाली.

आज तिचे लेखन वैयक्तिक आणि जागतिक विषयांच्या मध्यभागी उभे आहे. जिथे श्रद्धा आणि स्वप्ने एकत्र येतात, कथा आणि वास्तव एकत्र भेटतात, परंपरा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचा सुंदर मेळ दिसतो.

तिच्या कथा म्हणूनच वाचण्यासारख्या आहेत! त्या तरुण मुस्लीम महिलांना एका ओळखीसाठी दुसऱ्या ओळखीचा बळी देण्यास सांगत नाहीत. उलट, त्या स्वप्नांसोबत भक्तीला, महत्त्वाकांक्षेसोबत मूल्यांना आणि प्रेमासोबत लग्नानंतरच्या खऱ्या वास्तवाला सामावून घेण्यासाठी एक सुंदर जागा तयार करतात.

ज्या कथा तिला स्वतःला शोधून सापडल्या नाहीत, त्या लिहायला साराने सुरुवात केली होती. आज ती अशा गोष्टी लिहीत आहे, ज्या वाचताना इतर हजारो जणींना स्वतःचेच प्रतिबिंब त्या कथांमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter