दिल्लीतील आकाशवाणी भवनात परवानगीशिवाय प्रवेश केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल
निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधी पक्षांच्या मोर्चादरम्यान आकाशवाणी भवनात परवानगीशिवाय प्रवेश केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या कारवाईची अधिकृत माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी, प्रियंका गांधी, इतर खासदार आणि त्यांच्या समर्थकांनी पूर्वपरवानगीशिवाय आकाशवाणी भवन परिसरात बळजबरीने प्रवेश केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली होती. या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
आठ तासांचे ठिय्या आंदोलन
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाच्या कारभारातील कथित अनियमितता आणि मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेविरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांनी मोर्चाचे आयोजन केले होते. संसद भवनापासून निवडणूक आयोग कार्यालयाकडे जाणारा हा मोर्चा पोलिसांनी रोखल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी आकाशवाणी भवनात सुमारे आठ तास ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह २६० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
मोर्चासाठी नव्हती परवानगी
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीतील घटकांनी मंगळवारी संसद भवनापासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. मात्र, या मोर्चासाठी नवी दिल्लीच्या उपपोलिस आयुक्त (DCP) कार्यालयाकडे कोणतीही परवानगी मागण्यात आली नव्हती आणि प्रशासनाकडून अशी कोणतीही परवानगी दिली गेली नव्हती, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.