Bank Employees Nationwide Strike: मागणी मान्य न झाल्यास २६ ऑक्टोबरपासून अनिश्चितकालीन संपाचा इशारा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 54 m ago
बँक कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रतीकात्मक छायाचित्र.
बँक कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रतीकात्मक छायाचित्र.

 

नवी दिल्ली 

पाच दिवसांचा कामाचा आठवडा (5-day banking) लागू करण्यात होणारा उशीर, कार्यप्रदर्शन-आधारित प्रोत्साहन (PLI) योजनेतील मतभेद आणि पेन्शनशी संबंधित प्रलंबित मागण्यांवरून बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन (UFBU) या ९ प्रमुख बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनांच्या मध्यवर्ती संस्थेने येत्या ११ सप्टेंबर रोजी देशव्यापी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

हा संप झाल्यास देशभरातील, विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची सेवा सलग चार दिवस विस्कळीत होण्याची शक्यता आहे. ११ सप्टेंबर रोजी शुक्रवार असून, त्यानंतर शनिवार आणि रविवार बँकेच्या नियमित सुट्ट्या आहेत. तसेच १४ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवानिमित्त काही राज्यांमध्ये बँकेला सुट्टी असणार आहे. सरकारने आणि बँक प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास २८ सप्टेंबरपासून तीन दिवसांचा आणि २६ ऑक्टोबरपासून अनिश्चितकालीन संप पुकारण्याचा इशाराही युनियनने रविवारी झालेल्या बैठकीत दिला आहे.

मागण्या आणि संपाचे कारण

'इंडियन बँक्स असोसिएशन'ने (IBA) १२ व्या द्विपक्षीय करारांतर्गत सोमवार ते शुक्रवार रोज ४० मिनिटे कामाचा वेळ वाढवून ५ दिवसांचा आठवडा करण्यास मान्यता दिली होती. ही शिफारस केंद्र सरकारकडे पाठवण्यात आली असली, तरी ती गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहे. याशिवाय, वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठीची 'पीएलआय' योजना आणि 'एनपीएस' ऐवजी जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करण्याच्या मुद्द्यांवरून युनियन आणि सरकारमधील मतभेद वाढले आहेत.