भक्ती चाळक
नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असतानाच, दुसरीकडे सामाजिक सौहार्द टिकवून ठेवण्यासाठी मुस्लिम समाजाने मोठा निर्णय घेतला. ऑल इंडिया मुस्लीम फेस्टिव्हल्स कमिटीने मुस्लीम तरुणांना गरबा कार्यक्रमांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाला विरोध करणे हा यामागील हेतू नसून, विनाकारण निर्माण होणारे वाद टाळणे आणि समाजात सौहार्द टिकवून ठेवणे, हाच या आवाहनाचा मुख्य उद्देश असल्याचे संघटनेनी स्पष्ट केले आहे.
नवरात्रीच्या दिवसात दरवर्षी गरब्यात मुस्लीम तरुणांच्या उपस्थितीवरून राजकीय वर्तुळात आणि समाजमाध्यमांवर मोठा गदारोळ पाहायला मिळतो. काही राजकीय नेत्यांनी याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर, एखाद्या समाजाने त्यांच्या धार्मिक कार्यक्रमाबाबत आक्षेप नोंदवला असेल, तर तिथे अट्टाहासाने जाण्यापेक्षा संयम आणि परस्पर सन्मान दाखवणे अधिक योग्य आहे, अशी भूमिका मुस्लीम कमिटीने घेतली आहे.
‘रील्स अन् व्ह्यूजसाठी समाजाला गालबोट नको’
मध्य प्रदेश मुस्लीम फेस्टिव्हल्स कमिटीचे प्रदेशाध्यक्ष झीशान रहमान यांनी तरुणांना थेट शब्दांत समजावले आहे. केवळ सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी, लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी गरबा स्थळांवर जाणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
झीशान रहमान म्हणाले, “आम्ही मुस्लीम तरुण आणि विद्यार्थ्यांना गरबा कार्यक्रमात न जाण्याचे आवाहन केले कारण, एका व्यक्तीच्या चुकीमुळे पूर्ण समाजाला गालबोट लागते आणि संपूर्ण समाजाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. हे सगळे वाद टाळण्यासाठीच आम्ही हा निर्णय घेतला आहे.”
समितीने यासंदर्भात राज्य प्रशासन आणि शिक्षण विभागालाही पत्र लिहिले आहे. ११ ऑक्टोबरपूर्वी शाळा, महाविद्यालये, तंत्रनिकेतन, वैद्यकीय महाविद्यालये आणि वसतिगृहांपर्यंत हा संदेश पोहोचावा, जेणेकरून तरुण या आवाहनाची नोंद घेतील आणि कोणत्याही वादात अडकणार नाहीत.
आक्षेप तिथे अट्टाहास कशाला?
ऑल इंडिया मुस्लीम फेस्टिव्हल्स कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष शेख इस्माईल खान आणि मुख्य संरक्षक शमसुल हसन यांनी ६ ऑक्टोबर रोजी परिपत्रक काढून हे आवाहन केले.
शमसुल हसन म्हणाले, “जेव्हा एक समाज मुस्लिमांना त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याची विनंती करतो, तेव्हा मुस्लीम समाजानेही त्याला आक्षेप घेण्याचे कारण नाही. जिथे आपल्या उपस्थितीने गढूळ वातावरण निर्माण होऊ शकते, अशा ठिकाणी जाणे टाळणेच सर्वांच्या हिताचे आहे.”
शमसुल हसन पुढे म्हणाले की, “आमची कमिटी राज्य आणि जिल्हा स्तरावर याचे जनजागरण करणार आहे. स्थानिक काझी, मुफ्ती, उलेमा या मंडळींनी आणि सामाजिक संस्थांनी पुढे येऊन मस्जिदीच्या मिंबरवरून आणि सभांमधून तरुणांना मार्गदर्शन करण्यास सांगितले आहे. तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनाही असे कोणतेही व्हिडिओ किंवा रील्स व्हायरल न करण्याचे सांगण्यात आले आहे.”
जिल्हा प्रशासनालाही देणार माहिती
कमिटीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. हाफिज खान आणि शमसुल हसन यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, सर्व धर्मांच्या श्रद्धेचा आणि धार्मिक परंपरांचा आदर केला गेला पाहिजे. समाजात फूट पाडणे हा आमचा हेतू नसून शांतता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा कायम राखणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.
या मोहिमेची माहिती जिल्हा प्रशासनालाही अधिकृतपणे दिली जाणार आहे, जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही. एका व्यक्तीच्या चुकीच्या वर्तनामुळे संपूर्ण समाजाची बदनामी होऊ नये, यासाठी तरुणांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, चिथावणीखोर वक्तव्यांना बळी पडू नये आणि संयम बाळगावा, असा मोलाचा सल्ला या संघटनेने आपल्या आवाहनातून दिला आहे.