नेपाळच्या महापुरात १६० जणांचा मृत्यू, ३०० हून अधिक भारतीय गायब

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
नेपाळ-तिबेट सीमेवरील महापुराचे दृश्य
नेपाळ-तिबेट सीमेवरील महापुराचे दृश्य

 

नेपाळ-तिबेट सीमेवर भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण महापुरात तब्बल ३०० भारतीय पर्यटकांसह हजारो नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. नेपाळच्या रसुवा प्रदेशासह तीन जिल्ह्यांमध्ये या महापुराने भीषण हाहाकार माजवला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत १६० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी गुरुवारी या भीषण परिस्थितीची माहिती दिली.

नेपाळ परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चिनी सीमेवर रसुवागढीजवळील ल्हेंदे उपनदीचा प्रवाह हिमस्खलनामुळे अडवला गेल्याने भोटेकोशी नदीला अचानक मोठा पूर आला. या पुराचा पहिला तडाखा तिमुरे परिसराला बसला. बेपत्ता असलेल्या भारतीयांमध्ये कैलाश मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या किमान ५० भाविकांचा समावेश आहे.

भारतीय दूतावासाकडून आपत्कालीन हेल्पलाइन जारी
महापुरामुळे हजारो कुटुंबे बेघर झाली असून आपत्तीची भीषणता आणि झालेल्या नुकसानीचा पूर्ण अंदाज घेण्याचे काम सध्या सुरू आहे. नेपाळमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून बचावकार्यासाठी नेपाळ सरकारच्या अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहे.

अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी काठमांडूतील भारतीय दूतावासाने आपत्कालीन क्रमांक जारी केले आहेत. नागरिक मदत आणि माहितीसाठी +977 985 131 6807 किंवा +977 970 910 7500 या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात. याशिवाय बीजिंगमधील भारतीय दूतावासाने व्हॉट्सॲपद्वारे संपर्कासाठी 0086 185 1428 4905 हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. नेपाळ पर्यटन मंडळानेही १२३४ हा टोल-फ्री आपत्कालीन क्रमांक आणि ११४४ हा हॉटलाइन क्रमांक मदतीसाठी सुरू केला आहे.