Indian National Shot Dead In New York: न्यूयॉर्कमध्ये भारतीय युवकाची निर्घृण हत्या, हल्लेखोर फरार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 17 h ago
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात भारतीय नागरिक ठार; हल्लेखोराचा शोध सुरू असल्याचा पोलिसांचा दावा
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात भारतीय नागरिक ठार; हल्लेखोराचा शोध सुरू असल्याचा पोलिसांचा दावा

 

न्यूयॉर्क 

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एका अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात २७ वर्षीय भारतीय नागरिकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. क्वीन्स भागातील रहिवासी असलेला गुरदीप सिंग असे मृत तरुणाचे नाव असून, शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पूर्व न्यूयॉर्क परिसरातील स्टेनली अव्हेन्यूजवळ ही घटना घडली. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळावर पोहोचले, जिथे छातीत गोली लागलेल्या अवस्थेत एक तरुण जमिनीवर पडलेला आढळला. पॅरामेडिक्सने तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सीबीएस न्यूजने (CBS News) मिळवलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन व्यक्ती रस्त्यावर आपापसात भांडताना दिसत आहेत, त्यानंतर गोळीबाराचा प्रकाश दिसून येतो. यानंतर एक व्यक्ती खाली पडतो आणि दुसरी व्यक्ती कारमध्ये बसून निघून जाते.

पोलीस तपास सुरू आणि पंजाबी संघटनेची प्रतिक्रिया

शनिवारा सकाळपर्यंत पोलिसांनी परिसराची कसून पाहणी करून पुरावे गोळा केले. याप्रकरणी अद्याप कोणतीही अटक करण्यात आलेली नाही असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेवर उत्तर अमेरिकन पंजाबी असोसिएशनने (NAPA) तीव्र शोक आणि चिंता व्यक्त केली आहे. हा कोणताही किरकोळ किंवा विलग प्रकार मानू नये, असे संघटनेचे म्हणणे आहे. गेल्या दशकाहून अधिक काळ अमेरिकेत राहत असलेल्या गुरदीप सिंगच्या हत्येमागील नेमके कारण शोधून काढावे, अशी मागणी त्यांनी तपास यंत्रणांकडे केली आहे.