हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ११ भारतीय खलाशी जखमी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 59 m ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना पनामाचा ध्वज असलेल्या 'एमटी ऑन पीस' या व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्राने भीषण हल्ला केला. या दुर्घटनेत जहाजावरील १२ खलाशी जखमी झाले असून, त्यापैकी ११ जण भारतीय नागरिक आहेत. ओमानच्या किनाऱ्याजवळ घडलेल्या या घटनेनंतर परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत निवेदन जारी करून या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या व्यापारी जहाजावर एकूण १९ कर्मचाऱ्यांचे पथक तैनात होते. यामध्ये तब्बल १७ भारतीय नागरिकांचा समावेश होता. क्षेपणास्त्राच्या धडकेमुळे जहाजाचे मोठे नुकसान झाले असून, जखमी झालेल्या १२ कर्मचाऱ्यांपैकी ११ भारतीय खलाशांवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

ओमान प्रशासनाच्या मदतीने तातडीने बचावकार्य
घटनेची माहिती मिळताच ओमानच्या स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्य राबवले. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, "ओमानी अधिकाऱ्यांच्या मोलाच्या सहकार्याने जखमी खलाशांना जहाजावरून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर ओमानमधील खासब येथील रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत." भारताने या तातडीच्या मदतीबद्दल ओमान सरकारचे आभार मानले आहेत.

सागरी मार्गावरील हल्ल्यांवर भारताची तीव्र चिंता
पश्चिम आशियातील आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवर व्यापारी जहाजांवर होणारे सातत्यपूर्ण हल्ले ही अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "या प्रदेशात शांतता आणि स्थिरता कायम राहण्यासाठी अशा प्रकारचे हल्ले तात्काळ थांबले पाहिजेत. व्यापारी जहाजे, खलाशी आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे त्वरित थांबवले पाहिजे. आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरून होणारी वाहतूक आणि व्यापार लवकरात लवकर पूर्ववत होणे आवश्यक आहे."