रक्षाबंधननिमित्त खान सरांची मोठी घोषणा!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
पाटण्यात रक्षाबंधन सोहळा साजरा करताना खान सर
पाटण्यात रक्षाबंधन सोहळा साजरा करताना खान सर

 

लोकप्रिय शिक्षक खान सर यांचे मनगट यंदाही रक्षाबंधनाला राख्यांनी गच्च भरले आहे. पाटण्यातील एसके मेमोरियल हॉलमध्ये पार पडलेल्या या अभूतपूर्व सोहळ्यात हजारो विद्यार्थिनींनी खान सरांना राखी बांधून आपले प्रेम व्यक्त केले. या पवित्र दिनाचे औचित्य साधून खान सरांनी अनाथ मुलांसाठी एक भव्य अनाथ आश्रम सुरू करण्याची मोठी घोषणा केली आहे.

आज सकाळी सकाळी राखी बांधण्याचा मुहूर्त नसल्याने सभागृहात हजारो विद्यार्थिनी उत्सुकतेने वाट पाहत बसल्या होत्या. दुपारी १२:३० वाजता राखी बांधण्याच्या मुख्य सोहळ्याला धुमधडाक्यात सुरुवात झाली. खान सर म्हणाले, "या वेळी सकाळी १०:३० ते १२:३० दरम्यान राखी बांधण्याचा मुहूर्त नव्हता. त्यामुळे सुरुवातीला फक्त १०-१५ टक्केच राख्या बांधल्या गेल्या. बाकी सगळे जण साडेबाराच्या मुहूर्ताची वाट पाहत थांबले होते."

ते पुढे म्हणतात, "सण-उत्सव साजरे करताना आपल्या पूर्वजांनी तयार केलेल्या परंपरांचे पालन आपण केलेच पाहिजे. या शुभप्रसंगी सर्व देशवासीयांना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!"

सभागृहात अन् सभागृहाबाहेर उपस्थित असलेल्या हजारो मुलींच्या खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. मुहूर्त सुरु होताच मुलींनी मोठ्या उत्साहाने खान सरांच्या हातावर राख्या बांधल्या.
कर्करोग रुग्णालयाचे स्वप्न लवकरच साकारणार
गेल्या रक्षाबंधनाला खान सरांनी गरिबांसाठी एक भव्य कर्करोग रुग्णालय (कॅन्सर हॉस्पिटल) सुरू करण्याचा संकल्प केला होता. या रुग्णालयाविषयीची अद्ययावत माहिती देताना त्यांनी सांगितले की, रुग्णालयाची इमारत पूर्णपणे बनून तयार झाली आहे.

खान सर म्हणाले, "गेल्या वेळी मी कर्करोग रुग्णालय उघडण्याचे बोललो होतो. या वर्षीच्या रक्षाबंधनाला त्याची चावी सुपूर्द करायचा आमचा विचार होता. रुग्णालय बनून तयार आहे. पण गेल्या दोन-तीन महिन्यांत काही न्यायालयीन अन् प्रशासकीय अडचणींमुळे आमचे नियोजन थोडे विस्कळीत झाले."

ते पुढे म्हणाले, "न्यायालयाचे सहकार्य आम्हाला लाभले आहे. त्यामुळे रुग्णालयाचे उद्घाटन दोन महिने पुढे गेले आहे. दोन-अडीच महिन्यांत आम्ही हे अत्यंत सुसज्ज रुग्णालय सुरू करणार आहोत. नामांकित डॉक्टरांशी आमची चर्चा पूर्ण झालेली आहे."

अनाथ मुलांच्या भविष्याची नांदी
ज्या मुलींना भाऊ नाही किंवा ज्या मुलांना कुटुंब नाही, त्यांच्या दुःखाची जाणीव ठेवत खान सरांनी यंदाच्या रक्षाबंधनाला अनाथ आश्रम स्थापन करण्याची मोठी घोषणा केली. 

अनाथ आश्रमाच्या संकल्पनेबद्दल बोलताना खान सर म्हणाले, "मला बहीण नाही, या गोष्टीचे मला दुःख होते. पण ज्या अनाथ मुलांना कोणीच कुटुंब नाही, त्यांचे काय होत असेल? याच विचारातून या रक्षाबंधनाला आम्ही अनाथ आश्रम उघडण्याची घोषणा करत आहोत. खूप लवकर आम्ही तुम्हाला आमच्या अनाथ आश्रमात घेऊन जाऊ."

ते पुढे म्हणाले, "आमच्याकडे एक संपूर्ण शैक्षणिक अन् वैद्यकीय व्यवस्था आधीपासूनच तयार आहे. त्यामुळे या अनाथ मुलांना इथेच शिक्षण मिळेल. त्यांना डॉक्टर, नर्स, अधिकारी किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल, तर ती सगळी सोय आमच्याकडेच उपलब्ध असेल. या अनाथ आश्रमातील मुलांना कधीही एकटेपणा जाणवणार नाही. आमच्या संस्थेत शिकणारी इतर मुले त्यांच्याशी संवाद साधतील, त्यांच्यासोबत मिळूनमिळून राहतील. त्यामुळे तिथे खूप छान वातावरण तयार होईल."
मुलींच्या स्वप्नांना पंख देण्याचे आवाहन
सोहळ्याच्या शेवटी खान सरांनी समाजाला अन् पालकांना महत्त्वाचा संदेश दिला. मुलींवर बंधने लादण्याऐवजी त्यांच्या स्वप्नांना पाठबळ देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

खान सर म्हणाले, "मुलींच्या स्वप्नांच्या वाट्यात कोणीही अडथळा बनू नये, हीच माझी इच्छा आहे. त्यांच्या स्वप्नांचा आदर केला पाहिजे, त्यांना मोकळेपणाने जगू दिले पाहिजे. कुटुंब किंवा समाजाने आपल्या मर्यादा त्यांच्यावर लादू नयेत. मुलीही माणूस असतात, हे समाजाने समजून घेतले पाहिजे अन् निर्णय घेताना एकदा तरी त्यांचे मत विचारात घेतले पाहिजे."

शिक्षणाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवणाऱ्या खान सरांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून अनाथ मुलांच्या पुनर्वसनाचा अन् आरोग्याचा घेतलेला हा ध्यास सामाजिक बांधिलकीचे उदाहरण आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter