काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात 'छात्रों की गुंज' कार्यक्रम; सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश खुला असल्याचे महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षांचे स्पष्टीकरण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 d ago
काँग्रेस नेते राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी

 

पुणे 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यात होणाऱ्या 'छात्रों की गुंज' (Chhatron Ki Gunj) या कार्यक्रमात केवळ काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयांमधीलच विद्यार्थ्याना प्रवेश असेल, हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी गुरुवारी फेटाळून लावला. हा कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांसाठी खुला असून बारकोडद्वारे नोंदणी करणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या वा धर्माच्या विद्यार्थ्यांना यात सहभागी होता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पुणे येथे आलेल्या सकपाळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की हा संवाद तरुण विद्यार्थ्यांसोबत होणार आहे. हा कार्यक्रम मुलींच्या शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले आणि हिंदवी स्वराज्य स्थापना करणाऱ्या जिजामाता यांच्या पवित्र पुणे शहरात होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये बोलताना हा कार्यक्रम नियंत्रित वातावरणात आणि ठराविक विद्यार्थ्यांपुरताच मर्यादित असल्याचा दावा केला होता. यावर प्रत्युत्तर देताना सकपाळ म्हणाले की, आम्ही बस भरून लोकांना आणलेले नाही किंवा कार्यकर्त्यांना बळजोरीने बोलावलेले नाही. आमच्याकडे एक बारकोड आहे, ज्याद्वारे कोणीही नोंदणी करू शकतो.

बारकोड प्रणालीद्वारे सर्वांसाठी प्रवेश खुला

हर्षवर्धन सकपाळ पुढे म्हणाले की, हा कोणताही राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही आणि तिथे पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह असणार नाही. "या कार्यक्रमात कोणत्याही जाती, धर्म किंवा पक्षाचा विद्यार्थी येऊ शकतो. मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही यायचे असेल, तर ते बारकोड स्कॅन करून येऊ शकतात, त्यांचेही स्वागत आहे," असे ते म्हणाले. मुख्यमंत्री कायद्याचे उच्चशिक्षित पदवीधर असून त्यांना बारकोड म्हणजे काय हे माहीत असायला हवे, असा टोलाही त्यांनी लगावला.

पेपर लीक आणि विद्यार्थ्यांच्या इतर समस्यांवर या कार्यक्रमात प्रामुख्याने चर्चा केली जाणार असल्याचे सकपाळ यांनी सांगितले. झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनानंतर परीक्षा रद्द झाल्याच्या प्रसंगी राहुल गांधी खंबीरपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहिल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. एआयएसएसएमएस (AISSMS) कॉलेज मैदानावर २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.