मुंबई
समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आगामी २०० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकार त्यांच्या संपूर्ण साहित्याचा ७ भाषांमध्ये अनुवाद करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी केली. प्रभादेवी येथील पी. एल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे आयोजित एका दिवसाच्या भाषांतर कार्यशाळेत ते बोलत होते.
संबंधित साहित्य अकादमीनमार्फत हे साहित्य हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलगू, बंगाली आणि गोर बंजारा या सात भाषांमध्ये अनुवादित केले जाईल, असे शेलार यांनी स्पष्ट केले. विविध साहित्य अकादमींच्या माध्यमातून साहित्यिक आदान-प्रदान वाढवणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. मराठी साहित्यकृती इतर भाषांमध्ये नेणे आणि इतर भाषांमधील उल्लेखनीय साहित्य मराठीत आणणे यावर या कार्यशाळेत भर देण्यात आला.
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार संयुक्तपणे महात्मा फुले यांच्या द्विशतजन्मोत्सव वर्षानिमित्त विविध उपक्रम हाती घेणार आहेत. यामध्ये ८६१ पानांच्या 'महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय' या ग्रंथाच्या भाषांतराचाही समावेश आहे. हा मूळ ग्रंथ २०१२ मध्ये 'महात्मा ज्योतिबा फुले चरित्र साधन प्रकाशन समिती'तर्फे प्रकाशित करण्यात आला होता.