अयोध्या जिल्ह्यातील बीकापूर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांना राखी बांधताना मुस्लीम मुली
अयोध्या जिल्ह्यातील बीकापूर पोलीस ठाण्यात गुरुवारी रक्षाबंधनाचे औचित्य साधून सामाजिक सलोख्याचे एक अप्रतिम दृश्य पाहायला मिळाले. या कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मुस्लिम समाजातील मुलींनी त्यात घेतलेला उत्स्फूर्त आणि भरगोस सहभाग.
'पाणी संस्था' आणि 'आरोही संस्था' यांच्या माध्यमातून एकत्र आलेल्या या मुलींनी खाकी वर्दीतील रक्षकांच्या हातावर राखी बांधली अन् समाजाला सलोख्याचा संदेश दिला.
संस्थेच्या अध्यक्षा शालिनी, सचिव मौसम आणि उपाध्यक्ष पिंकी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमातौनक फातिमा, रोशन फातिमा यांच्यासह अनेक मुस्लिम मुलींनी पुढे येत बीकापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सिंह, पोलीस निरीक्षक देवेंद्र पांडे, एसएसआय विजय प्रताप तिवारी यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांना रक्षासूत्र बांधले.
सलोख्याचे नाते
कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुलींनी अत्यंत आदराने पोलीस कर्मचाऱ्यांची आरती ओवाळली आणि त्यांना गोड घास भरवला. दिवस-रात्र समाजाच्या संरक्षणासाठी झटणाऱ्या पोलिसांप्रती आदर व्यक्त करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. खाकी वर्दीतील पोलिसांनीसुद्धा या भगिनींचे प्रेम तितक्याच आदराने स्वीकारले. मुलींना भेटवस्तू देऊन त्यांच्या सुरक्षेचे अन् सन्मानाचे वचन पोलिसांनी या वेळी दिले.
सामाजिक बंधुभावाचा संदेश
यंदा २८ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या रक्षाबंधनाचे औचित्य साधून आज सकाळी ११ वाजता अभिजित मुहूर्तावर हा सोहळा पार पडला. मुस्लिम मुलींनी अशा प्रकारे पुढाकार घेऊन पोलिसांना राखी बांधल्याने उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
या सोहळ्यात बीकापूर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनीसुद्धा तितक्याच उत्साहाने भाग घेतला. आरती, दुर्गा, शालिनी, कुसुम, आरती कनौजिया, खुशबू, अंशिका, गरिमा आणि रूबी यांच्यासह शेकडो मुलींच्या उपस्थितीने पोलीस ठाण्याचा परिसर फुलून गेला होता.
"कोणत्याही प्रसंगी बहिणींच्या पाठीशी पोलीस दल खंबीरपणे उभे राहील," असा शब्द पोलिसांनी या वेळी दिला. बीकापूरमधील हा उपक्रम केवळ एका सणापुरता मर्यादित न राहता सामाजिक समरसता आणि बंधुभावाचे एक सुंदर प्रतीक बनून समोर आला.