NEPAL FLOODS: महाराष्ट्रातील ४०४ पर्यटक सुरक्षित, ६० जणांशी अद्याप संपर्क नाही; प्रशासनाकडून शोधकार्य सुरू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
महाराष्ट्रातील शेकडो पर्यटक पुरात अडकले; मंत्रालयातील नियंत्रण कक्षाकडून सतत मॉनिटरिंग
महाराष्ट्रातील शेकडो पर्यटक पुरात अडकले; मंत्रालयातील नियंत्रण कक्षाकडून सतत मॉनिटरिंग

 

मुंबई 

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पूर आणि दरड कोसळण्याच्या संकटात महाराष्ट्रातील ४०४ पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे, तर अद्याप ६० पर्यटकांचा संपर्क होऊ शकलेला नाही. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. तिबेटच्या सीमेवरील रसुवा जिल्ह्यात भुते कोशी नदीला आलेल्या महापुरात अनेक गावे उद्ध्वस्त झाली असून या आपत्तीमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शासन स्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

या भीषण दुर्घटनेच्या वेळी नेपाळमध्ये असलेले महाराष्ट्रातील १०५ नागरिक सुखरूप भारतात परतले आहेत. हे सर्व नागपूरचे असून ते त्यांच्या नियोजित वेळापत्रकानुसार घरी परतत आहेत. याशिवाय, राज्य नियंत्रण कक्षाने उर्वरित २९९ पर्यटकांशी संपर्क साधला असून ते नेपाळच्या विविध भागांत सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मुंबईच्या 'रिचा टूर्स प्रायव्हेट लिमिटेड'च्या माध्यमातून नेपाळ दौऱ्यावर गेलेल्या ६० जणांच्या गटाशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही, ज्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

कैलास मानसरोवर यात्री काठमांडूकडे रवाना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपा्यानंतर तिबेटमध्ये अडकलेले ठाणे, पुणे, रायगड, अलिबाग आणि डोंबिवली येथील ३७ कैलास मानसरोवर यात्री शुक्रवारी सकाळी काठमांडूच्या दिशेने रवाना झाले. हे सर्व यात्री तिबेटमधील सागा येथून नियलाम चेकपोस्ट मार्गे नेपाळची राजधानी गाठत असून २९ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता त्यांचे काठमांडूहून विमान प्रवासाचे नियोजन आहे. दुसरीकडे, गिर्यारोहक डॉ. मिलिंद चितळे आणि त्यांच्या पत्नी डॉ. जान्हवी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईहून गेलेल्या ६१ जणांच्या गटाशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही, असे शिवसेना नेते डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.