Mumbai FDA Action: अक्षय केटरर्स, क्राफ्टपॅक हॉस्पिटॅलिटीसह चार प्रतिष्ठानांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 58 m ago
स्वयंपाकघरात अस्वच्छता आणि कुचराई भोवली; एफडीएच्या कारवाईने अन्न व्यवसायांत खळबळ
स्वयंपाकघरात अस्वच्छता आणि कुचराई भोवली; एफडीएच्या कारवाईने अन्न व्यवसायांत खळबळ

 

मुंबई 

मुंबईतील विविध भागांत अन्न सुरक्षेचे नियम पायदळी तुडवणाऱ्या आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या चार प्रमुख अन्न व्यवसाय संस्थांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर कारवाई केली आहे. स्वयंपाकघरात अस्वच्छता, झुरळांचा प्रादुर्भाव आणि निकृष्ट अन्नपदार्थ आढळून आल्यामुळे या चारही आस्थापनांचे परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत, अशी माहिती एफडीएने शुक्रवारी दिली.

गेल्या काही दिवसांत FDA ने केलेल्या तपासणी मोहिमेत मुंबईतील ग्रॅव्हारे इन्स्टिट्यूटमधील 'अक्षय केटरर्स', वांद्रे पूर्व येथील जिओ वर्ल्ड ड्राईव्हमधील 'क्राफ्टपॅक हॉस्पिटॅलिटी', दादर पश्चिम येथील 'मॅरियन हॉटेल अँड रेस्टॉरंट' आणि चेंबूरच्या टिळकनगरमधील 'भगवती स्टोअर्स' यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. या आस्थापनांच्या किचन आणि अन्न साठवणूक क्षेत्रात झुरळे व इतर कीटकांचा मोठ्या प्रमाणावर वावर असल्याचे तपासणीत आढळले. तसेच, जेवणात अतिरीक्त कृत्रिम रंग, एमएसजीचा (MSG) वापर आणि वारंवार तेच तेल उकळून वापरले जात असल्याचे उघडकीस आले.

अस्वच्छता आणि क्रॉस-कंटॅमिनेशनचा धोका

तपासणीदरम्यान शिजवलेला भात कोणत्याही आवरणाशिवाय उघड्यावर ठेवण्यात आला होता, तर स्वयंपाकघराच्या भिंतींवर बुरशी आणि ओलावा जमल्याचे दिसून आले. शाकाहारी आणि मांसाहारी अन्न तयार करण्यासाठी एकच कटिंग बोर्ड आणि उपकरणे वापरली जात असल्याने 'क्रॉस-कंटॅमिनेशन'चा मोठा धोका निर्माण झाला होता. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ अंतर्गत या सर्व आस्थापनांचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत. दुसरीकडे, अकोला येथेही सोयाबीन तेलामध्ये भेसळ संशयावरून कारवाई करत सुमारे १२ लाखांहून अधिक किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.



Latest News