नवी दिल्ली
नवी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) येथे सोमवारपासून तीन दिवसीय 'ब्रिक्स थिएटर फेस्टिव्हल'चा (BRICS Theatre Festival) दिमाखात शुभारंभ झाला आहे. या महोत्सवात ब्रिक्समधील नऊ सदस्य आणि भागीदार देशांमधील नाट्य अभ्यासक, विद्वान, विद्यार्थी आणि सांस्कृतिक प्रतिनिधी एकत्र आले आहेत.
या महोत्सवात भारत, थायलंड, इंडोनेशिया, रशिया, इराण, व्हिएतनाम, दक्षिण आफ्रिका, कझाकस्तान आणि इथोपिया या सहभागी देशांच्या राष्ट्रीय नाट्य शाळा आणि अग्रगण्य नाट्य संस्थांचे प्रयोग सादर केले जात आहेत. महोत्सवातील प्रयोग नवी दिल्लीतील एनएसडीचे अभिमांच आणि सम्मुख सभागृह, कमानी सभागृह, एलटीजी सभागृह आणि मेघदूत थिएटर येथे पार पडत असून, तिकिटे बुक माय शोवर उपलब्ध आहेत.
उद्घाटन सोहळ्यात भारताचे सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी एनएसडीच्या वतीने आसिफ अली लिखित आणि एनएसडीचे संचालक चित्तरंजन त्रिपाठी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आलेले 'समुद्र मंथन' हे नाटक सादर करण्यात आले. रशिया दोन नाट्य पथकांसह यात सहभागी होत असून, भारत दोन नाटके सादर करत आहे. कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून देशांमधील परस्पर समज आणि संवाद वाढवणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.