NEPAL FLOODS: भारताकडून मदतीचा तिसरा हप्ता रवाना; १० टन सामग्रीसह डॉक्टर आणि रेस्क्यू टीम नेपाळमध्ये दाखल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
भारताकडून मदतीचा तिसरा हप्ता नेपाळमध्ये दाखल
भारताकडून मदतीचा तिसरा हप्ता नेपाळमध्ये दाखल

 

नवी दिल्ली 

नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी भारताने मदतीचा तिसरा हप्ता रवाना केला आहे. शुक्रवारी भारताने १० टन मदत साहित्यासह ११ सदस्यीय डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथक तसेच बोगद्यातील बचाव कार्याचा (Tunnel rescue) आढावा घेण्यासाठी एक विशेष रेस्क्यू टीम नेपाळला पाठवली आहे.

यापूर्वी भारताने बुधवारी १० टन आणि गुरुवारी ३७.५ टन एवढी मानवतावादी मदत (HADR) शेजारील देशात पाठवली होती. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोशल मीडियावर माहिती दिली की, १० टन मानवी मदतीचे तिसरे विमान काठमांडूच्या दिशेने रवाना झाले आहे. या मदतीमध्ये पोर्टेबल जनरेटर सेट, डिग्निटी किट्स, अन्नधान्याचे पॅकेट्स आणि पाणी शुद्धीकरण करणाऱ्या गोळ्यांचा समावेश आहे. नेपाळमधील पूर आणि दरड कोसळण्याच्या संकटात भारत पूर्णपणे शेजाऱ्यांच्या पाठीशी उभा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

५४७ हून अधिक जणांचा मृत्यू, भारताकडून सर्वतोपरी मदत

तिबेट सीमेवरील मुसळधार पाऊस आणि महापुरात नेपाळमध्ये ५४७ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांच्याशी फोनवर चर्चा करून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिल्यानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. तात्पुरती निवारा केंद्रे, ब्लँकेट्स, औषधे आणि सौर दिवे यांसारख्या साहित्याचा यात समावेश असून आगामी काळातही भारताकडून अशी मदत सुरूच राहणार आहे.