नाटकी अर्वाच्य आरडाओरडा आणि अंध राष्ट्रवादाच्या भपक्याशिवाय युद्धाची खरी कहाणी पडद्यावर मांडणे सोपे नसते. नेटफ्लिक्सवरील 'ऑपरेशन सफेद सागर' या सिरीजने नेमके हेच काम अत्यंत कौशल्याने केले आहे. १९९९ च्या कारगिल युद्धातील भारतीय हवाई दलाचे योगदान या सिरीजमध्ये पाहायला मिळते. दिग्दर्शक ओनी सेन यांनी पडद्यावर उडणाऱ्या विमानांपेक्षा रणनीती, शिस्त, मानवीय नातेसंबंध आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा ताणतणाव यावर मुख्य भर दिला आहे.
या सिरीजमध्ये एअर मार्शल विनोद पतने यांची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे प्रसिद्ध अभिनेते आदिल हुसैन यांनी. 'लाइफ ऑफ पाय' आणि 'द रिलक्टंट फंडामेंटलिस्ट'सारख्या जागतिक दर्जाच्या सिनेमांमधून नाव कमावलेल्या आदिल हुसैन यांच्यासाठी हा अनुभव फक्त एक भूमिका साकारण्यापुरता मर्यादित नव्हता. या प्रवासाने त्यांना स्वतःच्या कलेकडे आणि आयुष्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहायला लावले.
'आवाज - द व्हॉईस'ला दिलेल्या खास मुलाखतीत आदिल हुसैन यांनी या सिरीजचा अनुभव, त्यांची तयारी आणि सैनिकांच्या त्यागाविषयी मनमोकळा संवाद साधला.
सैनिकांचे जग अन् आत्मपरीक्षणाचा क्षण
प्रश्न : प्रत्येक प्रोजेक्ट माणसाला काहीतरी नवीन शिकवून जातो. 'ऑपरेशन सफेद सागर'ने तुम्हाला काय शिकवले?
आदिल हुसैन : आपल्या लष्कराची निष्ठा, प्रामाणिकपणा, शारीरिक क्षमता आणि देशाप्रती असलेली अथांग भक्ती याबद्दल मला आधीपासूनच आदर होता. पण प्रत्यक्ष हवाई दलातील सैनिकांसोबत काम करताना ही शिस्त मी अगदी जवळून अनुभवली. यामुळे माझे डोळे उघडले अन् मनात एक वेगळाच अभिमान जागा झाला.
लष्करी कॅम्पसमधील त्यांचे साधे, नियमबद्ध आयुष्य अन् कामाप्रती असलेली एकाग्रता पाहून मी स्वतःलाच प्रश्न विचारू लागलो. मी अभिनय क्षेत्र निवडले आहे, तर मीसुद्धा माझ्या कामासाठी इतका शारीरिक ताण घेतो का? इतकी रात्रीची जागरणे आणि पूर्वतयारी करतो का? ते देशाची सेवा करत आहेत आणि मी कलेची सेवा करतोय. मग माझ्या कामातही तितकीच निष्ठा असायला हवी. या अनुभवाने मला एक माणूस म्हणून अन् एक कलाकार म्हणून स्वतःचे मूल्यमापन करायला भाग पाडले.
उठसूट ड्रामा नाही, तर खरी कहाणी!
प्रश्न : जेव्हा पहिल्यांदा ही कथा तुमच्याकडे आली, तेव्हा नक्की कोणत्या गोष्टीने तुमचे मन जिंकले?
आदिल : शत्रूच्या चालींना उत्तर देण्यासाठी आपल्या हवाई दलाने ज्या पद्धतीने ऐनवेळी युक्त्या शोधल्या, ती गोष्ट मला खूप भावली. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या अणुचाचण्यांमुळे देशावर काही आंतरराष्ट्रीय मर्यादा होत्या. त्या कठीण परिस्थितीत लष्कराने दाखवलेले धैर्य कौतुकास्पद होते.
कथा वाचल्यावर माझ्या लक्षात आले की यात कोणताही उगाचचा ड्रामा किंवा अंध राष्ट्रवाद ठासून भरलेला नाही. ही कहाणी अत्यंत प्रामाणिक आहे. याचे लेखन कुशल श्रीवास्तव यांनी केले आहे, जे स्वतः भारतीय हवाई दलात सेवा बजावून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या लेखनात ती खरीखुरी आपुलकी आणि तळमळ जाणवत होती. म्हणूनच मी या प्रवासाचा भाग बनलो.
पडद्यामागचा माणूस शोधण्याचा ध्यास
प्रश्न : या सिरीजमध्ये सैनिकांना फक्त 'सुपरहिरो' न दाखवता त्यांची कुटुंबे, भीती अन् मैत्री असा मानवी चेहरा दाखवला आहे. एक कलाकार म्हणून हे तुमच्यासाठी किती महत्त्वाचे होते?
आदिल : माझ्यासाठी प्रत्येक भूमिकेचा मानवी पैलू शोधणे नेहमीच महत्त्वाचे असते. मोठ्या आणि ऐतिहासिक गोष्टी करणाऱ्या माणसांना समजून घेताना तर हे अधिक गरजेचे बनते. कोणतीही खरी मोठी व्यक्ती स्वतःला "मी हिरो आहे" असे कधीच म्हणत नाही! त्यांचे काम आणि देशासाठी प्राण देण्याची त्यांची वृत्ती त्यांना मोठे बनवते.
त्यांच्या या शौर्यामागे आपल्यासारखाच एक माणूस असतो. त्यांनी देशाची सेवा करण्याचा 'स्वधर्म' निवडलेला असतो. देशासाठी स्वतःचे प्राण पणाला लावायला ते कसे तयार होतात, हीच गोष्ट मला एक कलाकार अन् माणूस म्हणून नेहमी विचार करायला लावते.
हवाई दलाचे कॅम्प अन् दिग्गजांशी संवाद
प्रश्न : भूमिकेच्या तयारीसाठी तुम्ही हवाई दलातील दिग्गजांशी संवाद साधला होता, तो अनुभव कसा होता?
आदिल : होय, मी एअर मार्शल विनोद पतने यांच्याशी आणि इतर अधिकाऱ्यांशी सविस्तर बोललो. सिरीजचे निर्माते कुशल श्रीवास्तव आणि अभिजित परमारसुद्धा या चर्चेत सोबत होते. आम्ही वर्कशॉप्स केले अन् एअर फोर्स बेसला प्रत्यक्ष भेट दिली.
तिथे ग्रुप कॅप्टन दर्जाच्या अधिकाऱ्यांचे बोलणे, चालणे, इतरांना सूचना देण्याची पद्धत अन् कुटुंबाशी असणारे नाते मी बारकाईने टिपले. माझी भूमिका एका उच्च पदावरील अधिकाऱ्याची असल्याने रणनीती आखण्यावर माझा भर होता. त्यामुळे प्रत्यक्ष युद्धाच्या मैदानाव्यतिरिक्त टेबलावर होणाऱ्या खलबतांची ही तयारी खूप उपयोगी पडली.
संयम हीच कलेची खरी ताकद!
प्रश्न : लष्करी आयुष्याचे अत्यंत संयमित चित्रण केल्याबद्दल निवृत्त अधिकाऱ्यांनी सिरीजचे कौतुक केले आहे. युद्धपटात संयम पाळल्याने कथा अधिक प्रभावी होते का?
आदिल : कलाविश्वात संयम पाळणे खूप गरजेचे असते. अवाजवी गोष्टी काढून टाकणे म्हणजेच खरी कला! शांतता, आदर, संयम अन् सहानुभूती या मानवी मूल्यांची प्रेरणा कलेने दिली पाहिजे.
सिरीजमध्ये एक वाक्य येते, "रेझर ब्लेड्स" (Razor blades)! म्हणजेच जेव्हा कर्तव्याची हाक येते, तेव्हा आपण अगदी ब्लेडसारखे धारदार अन् अचूक असलो पाहिजे. तिथे तडजोड चालत नाही. पण त्याचा उगाच आकांडतांडव किंवा देखावा करण्याची गरज नसते. आपल्या शत्रू सैनिकाला पकडल्यावरही आपण त्याला अमानुष वागणूक दिली नाही. शत्रूला हरवण्यासाठी आपण स्वतः त्यांच्यासारखे क्रूर बनू शकत नाही. युद्ध ही हिंसेची वेळ असली तरी हिंसेचे उदात्तीकरण होता कामा नये.
१ आणि २ नंबरवर ट्रेंडिंगचा आनंद
प्रश्न : सध्या नेटफ्लिक्स इंडियावर तुमच्या 'सफेद सागर' आणि 'मुसाफिर कॅफे' या दोन्ही सिरीज अनुक्रमे पहिल्या अन् दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहेत. कसे वाटतेय?
आदिल : खूप छान वाटतेय! दोन्ही सिरीजचा भाग असण्याचा मला सार्थ अभिमान आहे. 'मुसाफिर कॅफे'लाही लोकांचे खूप प्रेम मिळत आहे. या दोन्ही कथा एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या आहेत आणि समाजातील वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकतात. अशा सूक्ष्म अन् खोल आशयाच्या कथा लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल मी मेकर्स आणि नेटफ्लिक्सचा आभारी आहे.