गौस सिवानी
अल्लामा मुहम्मद इक्बाल म्हणजे उपखंडातील एक अत्यंत उत्तुंग विचारवंत अन् कवी. धर्म, संस्कृती, मानवता आणि अध्यात्म याकडे पाहण्याची त्यांची नजर अतिशय व्यापक होती. इक्बाल स्वतःला एक निष्ठावंत मुस्लिम आणि इस्लामी पुनरुज्जीवनाचे पुरस्कर्ते मानत, तरीही इतर धर्मांतील महान व्यक्तिमत्त्वे अन् विचारांबद्दल त्यांच्या मनात अथांग आदर होता. इतर धर्मांतील शिकवण अन् उदात्त विचार त्यांना भावले, की ते मनमोकळेपणाने दाद द्यायचे.
इक्बाल यांनी अत्यंत आदराने अन् श्रद्धेने उल्लेख केलेल्या हिंदू व्यक्तिमत्त्वांमध्ये मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा समावेश आहे. प्रभू रामचंद्रांचे नाव आणि कार्य भारतातील घराघरांत पोहोचलेले आहे. इक्बाल यांनी याच रामचंद्रांना अत्यंत भावपूर्ण शब्दांत आदरांजली वाहिली आहे.
श्रीराम कोण आहेत?
श्रीरामांची कथा भारतात पिढ्यानपिढ्या रंगवून सांगितली जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण ती ऐकत मोठा झालाय. या कथेचा मूळ स्रोत 'रामायण' हा ग्रंथ आहे. मुघल काळात या ग्रंथाचा फार्सी भाषेत अनुवाद झाला होता.
रामायणानुसार श्रीरामचंद्र हे अयोध्येचे राजे दशरथ यांचे ज्येष्ठ सुपुत्र. त्यांचा विवाह अत्यंत गुणी सीतामातेशी झाला. राज्याभिषेकाची तयारी झालेली असतानाच, सावत्र आईच्या हट्टापोटी त्यांना १४ वर्षांचा वनवास पत्करावा लागला आणि भरताला राजगादी मिळाली.
भाऊ लक्ष्मण आणि पत्नी सीता यांच्यासह राम वनात गेले. तिथे लंकापती रावणाने सीतेचे अपहरण केले. पुढे हनुमंताच्या सैन्याच्या मदतीने रामांनी रावणाचा पराभव करत सीतेला मुक्त केले. वनवासाचा काळ संपवून ते अयोध्येत परतले. या सर्व काळात भरताने रामांच्या पादुका राजगादीवर ठेवून कारभार चालवला.
रामांच्या संपूर्ण जीवन प्रवासात त्यांचे शौर्य, मानवता अन् पितृभक्तीचे दर्शन घडते. याच कारणामुळे ही कथा भारतात अमर झाली. दरवर्षी विजयादशमीला 'रामलीला'च्या रूपाने ती रंगमंचावर साकारली जाते. भारतच नव्हे, तर इंडोनेशिया, मलेशिया, कंबोडिया आणि थायलंडसारख्या देशांमध्येही रामाची कथा तितकीच लोकप्रिय आहे.
इक्बाल यांच्या दृष्टीने 'राम' एक जिवंत व्यक्तिमत्त्व
रामायणातील कथेची ऐतिहासिक सत्यता काय, यावर इतिहासकारांमध्ये नेहमीच चर्चा रंगते. अनेक जण या कथांना पौराणिक मानतात. इक्बाल यांनी मात्र रामांना एक ऐतिहासिक अन् वास्तववादी व्यक्तिमत्त्व मानले. त्यांनी केवळ शायरीतूनच नव्हे, तर आपल्या गद्य लिखाणातूनही रामांची स्तुती केली आहे.
'असरार-ए-ख़ुदी'च्या प्रस्तावनेत ते लिहितात, "श्रीकृष्ण, श्रीराम आणि रामानुज ज्या सत्याचा पडदा उघडू पाहत होते, श्री शंकराचार्यांच्या तार्किक जादुगिरीने त्याला झाकून टाकले. परिणामी, श्रीकृष्णाचा समाज त्यांच्या पुनरुज्जीवनाच्या फळांपासून वंचित राहिला."
या विधानावरून स्पष्ट दिसते की, इक्बाल श्रीकृष्ण आणि श्रीरामांना काल्पनिक मानत नव्हते, तर ऐतिहासिक पुरुष मानत होते. हिंदू तत्त्वज्ञानातील दोन प्रवाह त्यांनी समोरासमोर मांडले. श्रीकृष्ण, श्रीराम अन् रामानुज यांची शिकवण प्रत्यक्ष जीवन, नैतिकता, कर्म आणि ईश्वराशी असलेल्या आत्मिक नात्यावर आधारित होती. ही शिकवण माणसाला व्यावहारिक आयुष्यात अध्यात्म, प्रेम अन् त्यागाची वाट दाखवत होती. इक्बाल यांनी या शिकवणीला 'अरूस-ए-मआनी' म्हणजेच मानवी आयुष्याला अर्थ देणारे शाश्वत सत्य म्हटले आहे.
इक्बाल यांची अजरामर रचना 'राम'
इक्बाल यांच्या 'बांग-ए-दरा' या काव्यसंग्रहात 'राम' ही प्रसिद्ध नज्म समाविष्ट आहे. एखादे काल्पनिक पात्र कधीही 'इमाम-ए-हिंद' बनू शकत नाही, हीच इक्बाल यांची धारणा होती. राम केवळ एका धर्माचे नेते नसून भारताच्या सांस्कृतिक अन् नैतिक परंपरेचा मानबिंदू आहेत, हा विचार त्यांनी या कवितेतून मांडला.
कवितेची सुरुवात ते अशा शब्दांत करतात,
लबरेज़ है शराब-ए-हक़ीक़त से जाम-ए-हिंद
सब फ़लसफ़ी हैं ख़ित्ता-ए-मग़रिब के राम-ए-हिंद
इक्बाल म्हणतात, भारताची संस्कृती अन् अध्यात्म सत्याच्या दारूने तुडुंब भरलेल्या पेल्यासारखे समृद्ध आहे. या आध्यात्मिक वारशाचे सर्वात मोठे प्रतीक म्हणजे प्रभू श्रीराम! पश्चिमेकडील मोठे तत्त्ववेत्तेसुद्धा भारताच्या या रामरुपी ज्ञानापुढे शिष्यासारखे भासतात. राम केवळ तात्त्विक चर्चेचा विषय नसून प्रत्यक्ष जगण्याची दिशा दाखवणारे मार्गदर्शक आहेत.
त्याच नज्ममध्ये पुढे एक अत्यंत गाजलेला शेर येतो,
है राम के वजूद पे हिंदोस्ताँ को नाज़
अहल-ए-नज़र समझते हैं उस को इमाम-ए-हिंद
उर्दू साहित्यात श्रीरामांवर लिहिलेला हा सर्वात उत्तुंग शेर मानला जातो. इथे इक्बाल यांनी रामांना 'इमाम-ए-हिंद' ही पदवी दिली. इथे 'इमाम' शब्द कोणत्याही धार्मिक अर्थाने आलेला नाही, तर संपूर्ण राष्ट्राला नैतिक वाट दाखवणारा नेता किंवा मार्गदर्शक या अर्थाने आला आहे. रामांनी आपल्या चारित्र्याने समाजात आदर्श निर्माण केला, म्हणूनच भारताला त्यांच्या अस्तित्वाचा अभिमान आहे.
पुढे ते लिहितात,
ऐजाज़ इस चराग़-ए-हिदायत का है यही
रोशन तर अज़ सहर है ज़माने में शाम-ए-हिंद
इथे रामांना 'चराग़-ए-हिदायत' (मार्गदर्शक दिवा) म्हटले आहे. रामांच्या शिकवणीने अन् चारित्र्याने संपूर्ण भारताचे नैतिक जीवन उजळून निघाले. जो स्वतःच्या चारित्र्याने समाजातील अंधार दूर करतो, तोच खरा महान पुरुष असतो.
नज्मचा शेवटचा शेर रामांच्या दोन्ही रूपांचे दर्शन घडवतो,
तलवार का धनी था, शुजाअत में फ़र्द था
पाकीज़गी में जोश-ए-मुहब्बत में फ़र्द था
या ओळींमध्ये रामांचे शारीरिक शौर्य आणि आध्यात्मिक महानता एकत्र दिसते. राम हे हातात तलवार चालवण्यात पटाईत अन् असीम धैर्य असलेले योद्धे होते. 'तलवार का धनी' म्हणजे केवळ सैनिक नव्हे, तर सत्यासाठी लढणारा निडर नेता! तर दुसऱ्या ओळीत रामांचे अंतःकरण उघडले आहे. 'पाकीज़गी' म्हणजे शुद्ध चारित्र्य अन् प्रामाणिकपणा, तर 'जोश-ए-मुहब्बत' म्हणजे लोककल्याण अन् अथांग प्रेम! इक्बाल यांच्या मते रामांचे मोठेपण केवळ त्यांच्या युद्धकौशल्यात नव्हते, तर त्यांच्या निष्कलंक चारित्र्यात अन् प्रेमाने भरलेल्या हृदयात होते.
संपूर्ण नज्म अशी आहे,
लबरेज़ है शराब-ए-हक़ीक़त से जाम-ए-हिंद
सब फ़लसफ़ी हैं ख़ित्ता-ए-मग़रिब के राम-ए-हिंद
यह हिंदियों की फ़िक्र-ए-फ़लक-रस का है असर
रिफ़अत में आसमाँ से भी ऊँचा है बाम-ए-हिंद
इस देस में हुए हैं हज़ारों मलक-सरिश्त
मशहूर जिन के दम से है दुनिया में नाम-ए-हिंद
है राम के वजूद पे हिंदोस्ताँ को नाज़
अहल-ए-नज़र समझते हैं इस को इमाम-ए-हिंद
ऐजाज़ इस चराग़-ए-हिदायत का है यही
रोशन तर अज़ सहर है ज़माना में शाम-ए-हिंद
तलवार का धनी था, शुजाअत में फ़र्द था
पाकीज़गी में जोश-ए-मुहब्बत में फ़र्द था
इक्बाल यांच्या नजरेतील राम
इक्बाल यांच्या दृष्टीने राम हे केवळ ऐतिहासिक किंवा धार्मिक व्यक्तिमत्त्व नव्हते. ते सत्य, त्याग, न्याय, वचनपूर्ती अन् धैर्याचे मूर्तिमंत रूप होते. बापाची आज्ञा पाळणे, दिलेला शब्द पाळणे, प्रजेची सेवा करणे आणि न्यायाने राज्य चालवणे हीच एका महान पुरुषाची लक्षणे असतात.
इक्बाल यांच्या तत्त्वज्ञानात 'ख़ुदी' (आत्मभान/स्वाभिमान) या संकल्पनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 'ख़ुदी' म्हणजे केवळ स्वार्थ नव्हे, तर स्वतःचे चारित्र्य घट्ट ठेवणे, सत्यावर ठाम राहणे अन् त्याग करणे. रामांचे आयुष्य या 'ख़ुदी'चे जिवंत उदाहरण होते.
इक्बाल यांची 'राम' ही नज्म म्हणजे धार्मिक सहिष्णुता, सांस्कृतिक बंधुभाव आणि परस्पर आदराचा एक अप्रतिम आविष्कार आहे. माणसाचे मोठेपण त्याच्या धर्मावरून ठरत नाही, तर त्याच्या चारित्र्यावरून आणि त्याने केलेल्या मानवसेवेवरून ठरते, हाच संदेश अल्लामा इक्बाल यांनी 'इमाम-ए-हिंद' रामांच्या माध्यमातून जगाला दिला.