गौस सिवानी
अल्लामा इक्बाल यांच्या साहित्याचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे त्यांनी केवळ इस्लामिक किंवा मुस्लिम विचारवंतांचाच गौरव केला नाही. धर्माच्या सर्व चौकटी ओलांडून जगातल्या महान आत्म्यांना त्यांनी मुक्तहस्ताने सन्मान दिला. याच शृंखलेत एक अत्यंत महत्त्वाचे नाव येते, ते म्हणजे महर्षी विश्वामित्र.
हिंदू धर्मग्रंथ अन् पुराणांमध्ये महर्षी विश्वामित्र यांचे नाव आदरपूर्वक घेतले जाते. इक्बाल यांनी याच विश्वामित्रांना एका अत्यंत प्रेरणादायी अन् महान व्यक्तिमत्त्वाच्या रूपात जगासमोर मांडले. आपल्या प्रसिद्ध पर्शियन काव्यग्रंथ 'जावेदनामा'मध्ये त्यांनी विश्वामित्रांच्या तोंडून मानवता, आत्मविश्वास आणि संघर्षाचा एक अद्भुत संदेश दिला आहे.
संघर्षाची एक अमर गाथा
ऋग्वेद, रामायण, महाभारत अन् अनेक पुराणांमधून विश्वामित्रांचा महिमा गायला गेला आहे. सुरुवातीच्या काळात विश्वामित्र हे 'कौशिक' नावाचे एक अत्यंत पराक्रमी क्षत्रिय राजा होते. महर्षि वशिष्ठांसोबत झालेल्या एका संघर्षात कौशिक राजाला पराभवाचा झटका बसला. पण या पराभवाने खचून न जाता त्यांनी राजवैभव सोडून कठोर तपस्येचा मार्ग निवडला. आपल्या आत्मबळाच्या अन् तपश्चर्येच्या जोरावर त्यांनी थेट ब्रह्मर्षि हे सर्वोच्च पद मिळवून दाखवले!
रामायणात विश्वामित्र हे प्रभू राम आणि लक्ष्मणाचे गुरू म्हणून समोर येतात. त्यांनीच या दोन राजकुमारांना दिव्य अस्त्रांचे ज्ञान दिले. आपल्या यज्ञात विघ्न आणणाऱ्या राक्षसांचा संहार करण्यासाठी त्यांनी राजा दशरथाकडे राम-लक्ष्मणाची मागणी केली होती. पुढे याच विश्वामित्रांनी राम-लक्ष्मणाला मिथिलेला नेले, जिथे श्रीरामांनी शिवधनुष्य मोडून सीतेशी विवाह केला.
हिंदू परंपरेत विश्वामित्र म्हणजे केवळ एक ऋषी नाहीत; तर ते ज्ञान, तपश्चर्या, दृढ संकल्प अन् आत्मबळाचे वाहक आहेत. अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या 'गायत्री मंत्रा'चे दिव्य ज्ञान सर्वात आधी महर्षी विश्वामित्रांनाच प्राप्त झाले होते.
इक्बाल अन् विश्वामित्र : विचारांचा अद्भुत संगम
इक्बाल यांनी आपल्या लेखनासाठी विश्वामित्रांचीच निवड का केली असावी, हा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तर इक्बाल यांच्या जीवनतत्त्वज्ञानात दडले आहे. इक्बाल यांच्या विचारांचा मूळ पाया म्हणजे 'कर्म', 'सततचा संघर्ष' आणि 'खुदी' (आत्मचेतना).
विश्वामित्रांचे अख्खे आयुष्य याच संघर्षाचे जिवंत उदाहरण आहे. पराभवाला आपली तकदीर मानण्यास त्यांनी साफ नकार दिला. स्वतःला तपस्येच्या भट्टी तापवून इतके श्रेष्ठ बनवले की, शेवटी महर्षी वशिष्ठांनाही त्यांना ब्रह्मर्षि म्हणून स्वीकारणे भाग पडले.
हाच संघर्ष अन् आत्मविश्वासाची मशाल इक्बाल यांच्या फल्सफा-ए-खुदी (आत्मज्ञानाचे तत्त्वज्ञान) शी तंतोतंत जुळते. म्हणूनच विश्वामित्रांच्या चरित्राने इक्बाल यांना भुरळ घातली होती.
इक्बाल यांचा तो जगप्रसिद्ध शेर या नात्याची साक्ष देतो,
ख़ुदी को कर बुलंद इतना कि हर तक़दीर से पहले
ख़ुदा बंदे से ख़ुद पूछे बता तेरी रज़ा क्या है
जावेदनामा : चंद्रलोकातील ती गूढ भेट
१९३२ मध्ये प्रकाशित झालेला 'जावेदनामा' हा केवळ एक काव्यग्रंथ नसून ती एक बौद्धिक अन् आध्यात्मिक सफर आहे. या काव्यात इक्बाल आपले आध्यात्मिक गुरू मौलाना जलालोद्दीन रूमी यांच्यासोबत वेगवेगळ्या अवकाशीय लोकांची सफर करतात. या प्रवासात ते प्रेषित, सुफी संत, विचारवंत, पाश्चात्य तत्त्वज्ञ आणि भारतीय परंपरेतील महान आत्म्यांना भेटतात.
याच प्रवासात चंद्रलोकावर त्यांची भेट महर्षी विश्वामित्र यांच्याशी होते. इक्बाल यांनी विश्वामित्रांचा उल्लेख "आरिफ-ए-हिंदी" (भारताचा महाज्ञानी) आणि जहाँ-दोस्त (जगन्मित्र / समस्त मानवतेचा मित्र) अशा अत्यंत आदरयुक्त शब्दांत केला आहे. यावरून इक्बाल यांना भारताची प्राचीन संस्कृती, दर्शन आणि साहित्याची किती सखोल जाण होती, हे स्पष्ट दिसते.
जावेदनाम्यानुसार, चंद्रलोकातील एका गूढ गुहेत विश्वामित्र एकांतवासात ध्यानस्थ बसले होते. त्या गुहेचे वर्णन करताना इक्बाल लिहितात, "चारही बाजूंना एक अलौकिक प्रकाश पसरला होता. दरीतील प्रत्येक दगड जणू जानवे परिधान करून उभा असल्यासारखा वाटत होता. खजूर वृक्ष एखाद्या देवासारखे उत्तुंग दिसत होते."
एका खजूर वृक्षाखाली विश्वामित्र बसले होते. डोळ्यांत सुरमा, डोक्यावर जटा अन् अंगावर एक पांढरा नाग लपेटलेला.
सृष्टीच्या रहस्यांवर गहन चर्चा
रूमी अन् इक्बाल यांना पाहून विश्वामित्रांनी विचारले, "तुमच्यासोबत हा तरुण कोण आहे, ज्याच्या डोळ्यांत जगण्याची अन् सत्य शोधण्याची इतकी तीव्र आस दिसतेय?"
रूमी यांनी इक्बाल यांची ओळख करून दिल्यानंतर विश्वामित्रांच्या मुखातून पर्शियन भाषेत हे विचार बाहेर पडले,
आलम अज़ रंग अस्त व बे-रंगी अस्त हक़
चीस्त आलम? चीस्त आदम? चीस्त हक़?
अर्थात, हे जग अनेक रंगांनी नटलेले आहे, पण तो परमेश्वर मात्र कोणत्याही रंगात अडकलेला नाही. मग शेवटी हे जग काय आहे? माणूस काय आहे? अन् त्या परम सत्याचे खरे रूप काय आहे?
यानंतर रूमी यांनी पूर्व अन् पश्चिमेच्या विचारसरणीतील फरक स्पष्ट केला. त्यावर उत्तर देताना विश्वामित्र म्हणाले,
बर वुजूद ओ बर अदम पेचीदा अस्त
मशरिक़ ईं असरार रा कम दीदा अस्त
म्हणजे, अस्तित्व अन् अनस्तित्वाच्या कोड्यातच हे सत्य दडले आहे, पण पूर्वेकडील जगाने हे रहस्य समजून घेण्यात कुठेतरी कमतरता दाखवली.
पुढे ते म्हणतात,
कार-ए मा अफ़लाकियाँ जुज़ दीद नीस्त
जानम अज़ फ़र्दाए ऊ नौमीद नीस्त
म्हणजे, आम्हा आकाशलोकातील आत्म्यांचे काम फक्त साक्षीदार राहून पाहणे एवढेच आहे. पण मला मानवाच्या भविष्याबद्दल अजिबात निराशा वाटत नाही.
पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे : विश्वामित्रांचा संदेश
हा संवाद ज्या काळात लिहिला गेला, तेव्हा भारत इंग्रजांच्या गुलामीत खितपत पडला होता. स्वातंत्र्याची लढाई पेटलेली होती. अशा काळात विश्वामित्रांच्या तोंडून इक्बाल यांनी दिलेला हा संदेश म्हणजे भारतीय जनतेला दिलेली एक प्रकारची वैचारिक हाक होती!
संवादादरम्यान आकाशातून एक देवदूत उतरतो अन् म्हणतो, "सर्वात भाग्यवान तेच राष्ट्र, जे स्वतःची खरी ताकद अन् अस्मिता ओळखते."
अर्शियाँ रा सुबह-ए ईद आँ साअते
चूँ शवद बेदार चश्म-ए मिल्लते
म्हणजे, जेव्हा एखाद्या राष्ट्राचे डोळे उघडतात अन् त्यात आत्मचेतना जागृत होते, तो क्षण स्वर्गवासीयांसाठी सुद्धा सणाच्या (ईदच्या) सकाळीसारखा आनंदाचा असतो.
इक्बाल यांच्या मते विश्वामित्र हे भारताच्या प्राचीन ज्ञान-परंपरेचे आणि आत्मबळाचे सर्वात मोठे प्रतीक आहेत. विश्वामित्रांच्या माध्यमातून त्यांनी भारतीयांना सांगण्याचा प्रयत्न केला की, पश्चिमेने विज्ञानात प्रगती केली असेल, पण अध्यात्म अन् नैतिकतेच्या बाबतीत भारतच जगाचा मार्गदर्शक आहे. जेव्हा भारत आपल्या अज्ञानाची झोप सोडून जागा होईल, तेव्हा तो केवळ स्वतःला मुक्त करणार नाही, तर संपूर्ण जगाला ज्ञानाचा अन् मानवतेचा नवा प्रकाश देईल.
धार्मिक भिंती बाजूला सारून दोन भिन्न संस्कृतींमधील हा संवाद आजही जगाला शांती, आत्मसन्मान आणि निरंतर कर्म करण्याचा एक अमर संदेश देतो.