गौस सिवानी
अल्लामा इक्बाल यांनी आपल्या शायरीच्या माध्यमातून देशभक्तीसोबतच राष्ट्रीय एकात्मतेचा अत्यंत प्रभावी संदेश दिला. त्यांनी हिंदू आणि शीख संतांची, तसेच ख्रिश्चन तत्त्ववेत्त्यांची आपल्या कविता अन् गद्यात मनमोकळेपणाने स्तुती केली. गौतम बुद्ध, जरथुस्त्र आणि मानी यांच्यावरही त्यांनी लेखन केले. अगदी इराणमधील बहाई धर्माचे संस्थापक बहाउल्लाह यांच्यावर त्यांनी आपल्या पीएच.डी.च्या शोधनिबंधात भाष्य केले होते.
बहाई धर्माचे संस्थापक बहाउल्लाह यांनी प्रेषितत्वाचा (नबूवत) दावा केला होता, ज्याला मुस्लिम जगतातून तीव्र विरोध झाला. तरीही इक्बाल यांनी त्यांच्यावर अभ्यासपूर्ण लिहिले, यावरूनच त्यांचा इतर धर्मांविषयीचा आदर स्पष्ट होतो. या विषयावर उर्दू आणि फार्सी भाषेत त्यांच्या शेकडो रचना आढळतात.
ज़ुनार हो गले में, तस्बीह हाथ में हो
यानी सनमकदे में शान-ए-हरम दिखा दें
पहलू को चीर डालें, दर्शन हो आम उसका
हर आत्मा को गोया इक आग सी लगा दें
आँखों की है जो गंगा, ले ले के उससे पानी
उस देवता के आगे इक नहर सी बहा दें
"हिंदुस्तान" लिख दें माथे पे उस सनम के
भूले हुए तराने दुनिया को फिर सुना दें
मंदिर में हो बुलाना जिस दम पुजारियों को
आवाज़-ए-अज़ाँ को नाक़ूस में छुपा दें
अग्नि है वह जो निर्गुण, कहते हैं पीत जिस को
धर्मों के ये बखेड़े उस आग में जला दें
इक्बाल यांना न्याय, नैतिकता, अध्यात्म आणि परस्पर आदरावर आधारित राष्ट्रीय एकात्मता हवी होती. केवळ भूगोलाच्या सीमा एखाद्या देशातील नागरिकांना एकत्र बांधू शकत नाहीत, अशी त्यांची ठाम धारणा होती. राष्ट्राला खऱ्या अर्थाने मजबूत आणि एकसंध ठेवण्यासाठी नैतिक आदर्श अन् सामायिक मूल्यांची गरज असते.
इक्बाल यांच्या नजरेतून हिंदू समाज
इक्बाल हे इस्लामिक तत्त्वज्ञानाचे प्रसारक असले तरी हिंदू समाजाबद्दलचे त्यांचे सकारात्मक विचार फार कमी लोकांना माहीत आहेत. हिंदू समाज ही जगातील एक प्राचीन संस्कृती तर आहेच, शिवाय जग जेव्हा अज्ञानाच्या अंधारात होते, तेव्हाही या समाजाकडे ज्ञान आणि कलेचा अथांग साठा होता, असे ते मानत.
ते लिहितात, "हिंदू समाजाच्या हृदयात अन् मस्कुतात व्यवहार आणि विचारांचा अद्भुत मेळ दिसतो. या समाजातील सूक्ष्म विचारवंतांनी कर्म-शक्तीच्या स्वरूपावर अत्यंत सखोल चिंतन केले आहे."
(संदर्भ: दीबाचा असरार-ए-ख़ुदी)
आपल्या पीएच.डी.च्या शोधनिबंधात त्यांनी भारतीय आणि इराणी चिंतनपद्धतीची तुलना करताना वेदांत तत्त्वज्ञानाचा गौरव केला. ते लिहितात, "भारतीय माणूससुद्धा इराणी माणसाप्रमाणे ज्ञानाच्या सर्वोच्च स्रोताची गरज मान्य करतो. मात्र तो एका अनुभवातून दुसऱ्या अनुभवाकडे शांतपणे पुढे सरकतो अन् त्या अनुभवांचे विश्लेषण करत राहतो, जेणेकरून त्यातील समग्र सत्य समोर येईल. इराणी व्यक्ती तत्त्वज्ञानाला केवळ एक कल्पनेच्या रूपात पाहते, तर कश्मीरी किंवा भारतीय विचारवंत आपल्या विचारांना तर्कशुद्ध अन् पद्धतशीर रूप देण्यावर भर देतो. या दोन्ही मानसिक प्रवृत्तींचा परिणाम स्पष्ट आहे. एका बाजूला विखुरलेले विचार दिसतात, तर दुसऱ्या बाजूला वेदांतासारखे सखोल, सुटसुटीत अन् प्रभावी तत्त्वज्ञान उभे ठाकते."
(संदर्भ: तम्हीद-ए-फ़लसफ़ा-ए-अजम, इक़बाल यांचा पीएच.डी. शोधनिबंध, १९३६)
इराणी मन एखाद्या विषयाच्या मुळाशी जाण्यासाठी घाई करते, ज्यामुळे विचारांची परिपक्वता मागे पडते. याउलट, भारतीय विचारवंत अत्यंत धैर्याने मानवी अनुभवांच्या विविध पैलूंचा अभ्यास करतो अन् सत्याचा शोध घेतो. याच धैर्यामुळे भारतात वेदांतासारख्या महान दार्शनिक प्रणालीचा जन्म झाला, असे इक्बाल स्पष्ट करतात.
इक्बाल यांनी केवळ प्राचीन इतिहासाचे कौतुक केले नाही, तर स्वातंत्र्याच्या काळात घडणाऱ्या हिंदू समाजाच्या मानसिक बदलांचेही अचूक विश्लेषण केले. त्यांनी आपल्या डायरीत लिहिले होते, "एखाद्या समाजात नव्या आदर्शाचा जन्म अन् विकास पाहणे अत्यंत रंजक असते. हा नवा आदर्श त्या समाजात नवीन उत्साह निर्माण करतो आणि सर्व शक्ती एका ध्येयाकडे केंद्रित करतो. आधुनिक हिंदू समाज याचे उत्तम उदाहरण आहे. राजकीय स्वातंत्र्याचे ध्येय त्यांच्या आत्म्यावर पूर्णपणे साचले आहे. या अनुभवातून जात असताना कदाचित जुन्या नैतिक मूल्यांचा ऱ्हास होईल अन् एक नवीन समाज जन्माला येईल."
(संदर्भ: मुन्तशिर ख़यालात-ए-इक़बाल, पृष्ठ ५५-५६)
स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात राजकीय स्वातंत्र्य हे हिंदू समाजाचे मुख्य ध्येय बनले होते. या राजकीय जागृतीमुळे समाज कसा बदलत आहे, याचे तटस्थ विश्लेषण इक्बाल यांनी एका विचारवंताच्या भूमिकेतून केले. राजकीय ध्येयाच्या मोहात प्राचीन नैतिक आणि आध्यात्मिक मूल्ये मागे पडतील, ही त्यांची भीती आजच्या बदलत्या समाजाकडे पाहताना खरी ठरताना दिसते.
वेदांत तत्त्वज्ञान म्हणजे काय?
इक्बाल यांना वेदांत तत्त्वज्ञानाची प्रचंड भुरळ होती. त्यांनी संस्कृत भाषेतील मूळ ग्रंथांसोबतच पाश्चात्य विद्वानांनी लिहिलेल्या भाष्यग्रंथांचा सखोल अभ्यास केला होता.
"वेदांत" म्हणजे वेदांचा अंतिम भाग किंवा वेदांचे सार. वेदांच्या शेवटच्या भागाला 'उपनिषद' म्हटले जाते, म्हणूनच वेदांताला उपनिषदांचे तत्त्वज्ञान असेही म्हणतात. उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र या तीन मुख्य ग्रंथांवर वेदांत आधारित आहे. या सृष्टीतील एकमेव सत्य म्हणजे 'ब्रह्म' असून प्रत्येक जीवाचा आत्मा हा त्या ब्रह्माचाच अंश आहे, हा वेदांताचा मुख्य सिद्धान्त आहे.
काळानुरूप वेदांताच्या विविध शाखा विकसित झाल्या. यात श्री आद्य शंकराचार्य यांनी मांडलेला 'अद्वैत वेदांत', रामानुजाचार्य यांचा 'विशिष्टद्वैत' आणि मध्वाचार्य यांचा 'द्वैत वेदांत' प्रमुख मानला जातो. काश्मीरमध्ये प्रचलित असलेल्या शैव दर्शन परंपरेचाही यात मोठा वाटा आहे.
इक्बाल अन् वेदांताचे नाते
इक्बाल यांनी वेदांताच्या विचारांचे कौतुक करतानाच त्यावर विश्लेषणात्मक भाष्यही केले. सूफी संप्रदायावर हिंदू वेदांताचा अन् कुंडलिनी सिद्धान्ताचा मोठा प्रभाव पडला होता, हे त्यांनी स्पष्टपणे दाखवून दिले.
'फ़लसफ़ा-ए-अजम' मध्ये ते लिहितात, "नंतरच्या काळातील काही सूफी सिलसिल्यांनी (उदा. नक्शबंदिया) आध्यात्मिक प्रगतीसाठी हिंदू वेदान्त्यांकडून पद्धती आत्मसात केल्या. मानवी शरीरात विविध रंगांचे सहा केंद्र (चक्रे) असतात, या कुंडलिनी सिद्धान्ताचा वापर सूफी साधनेत केला गेला. रंगांच्या या विविधतेमागे असलेला मूळ, रंगहीन प्रकाश अनुभवणे हाच या साधनेचा उद्देश असतो."
(संदर्भ: फ़लसफ़ा-ए-अजम, पृष्ठ १०७)
इराण आणि भारतामधील आध्यात्मिक देवाणघेवाणीवर प्रकाश टाकताना ते पुढे लिहितात, "बाकू येथील बौद्ध आणि हिंदू मंदिरांना भेट देणाऱ्या साधूंच्या माध्यमातून हे विचार इराणमध्ये पोहोचले. हुसैन मंसूर यांनी या विचाराला पुढे नेत 'अना-अल-हक़' (मीच सत्य आहे) ची घोषणा केली, जी हिंदू वेदांतातील 'अहं ब्रह्मास्मि' या घोषणेशी तंतोतंत जुळणारी आहे."
(संदर्भ: फ़लसफ़ा-ए-अजम, पृष्ठ १११)
प्राचीन भारतीय ज्ञानाचा गौरव
इक्बाल यांनी लहानांसाठी 'तारीख़-ए-हिंद' नावाचे पाठ्यपुस्तकही लिहिले होते. यात त्यांनी संस्कृत साहित्याचा इतिहास आणि भारतीय विज्ञानाचा अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.
ते लिहितात, "हिंदू धार्मिक साहित्याचे दोन भाग पडतात— श्रुति आणि स्मृति. श्रुतीमध्ये चार वेद (ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद) आणि ब्राह्मण ग्रंथांचा समावेश होतो. ऋग्वेद हा आर्य भाषांमधील सर्वात प्राचीन ग्रंथ मानला जातो. यात निसर्गाच्या विविध शक्तींना देवता मानून त्यांची स्तुति केली गेली आहे."
(संदर्भ: तारीख़-ए-हिंद, पृष्ठ ४४१-४४२)
भारतातील खगोलशास्त्र आणि गणिताच्या प्रगतीबद्दल लिहिताना इक्बाल नमूद करतात, "वेदांगातील ज्योतिषशास्त्र अत्यंत प्राचीन आहे. आर्यभट्ट (इ.स. ५००) यांनी पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते, हा शोध लावला. तर भास्कराचार्य (इ.स. ११००) यांनी शोधलेला गणिताचा सिद्धान्त युरोपियन गणितज्ञांच्या कॅल्क्युलस (Calculus) पद्धतीशी अत्यंत मिळताजुळता आहे."
(संदर्भ: तारीख़-ए-हिंद, पृष्ठ ४४३)
अल्लामा इक्बाल यांनी जगातील विविध तत्त्वज्ञानाचा अभ्यास करताना भारतीय परंपरेकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. प्राचीन हिंदू तत्त्वज्ञान, वेद आणि उपनिषदांमधील ज्ञानाचा त्यांनी मोकळ्या मनाने स्वीकार केला अन् आपल्या साहित्यात त्याला सन्मानाचे स्थान दिले.