सेंट लुईस
भारताचा युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंदने बुद्धिबळाच्या विश्वात इतिहास रचला आहे. अमेरिकेतील सेंट लुईस येथे पार पडलेल्या ग्रँड चेस टूरच्या (GCT) महाअंतिम फेरीत अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाचा पराभव करत प्रज्ञानानंदने ग्रँड चेस टूरचे विजेतेपद पटकावले आहे. ही प्रतिष्ठाची स्पर्धा जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे.
या अंतिम फेरीत प्रज्ञानानंदने सुरुवातीला ६ गुणांनी पिछाडीवर असतानाही शानदार पुनरागमन केले. सेंट लुईस चेस क्लबमध्ये गुरुवारी झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात भारताच्या २१ वर्षीय ग्रँडमास्टरने १५-१३ असा विजय मिळवत आपले पहिले जीसीटी विजेतेपद आपल्या नावावर केले. या विजयासह त्याला २० लाख डॉलर्सचे (USD 200,000) बक्षीस मिळाले असून, आगामी वर्षातील ग्रँड चेस टूरसाठीही त्याचे स्थान निश्चित झाले आहे.
दिवसाच्या सुरुवातीला फॅबियानो कारुआनापेक्षा ६ गुणांनी मागे असलेल्या प्रज्ञानानंदने रॅपिडच्या दोन्ही फेऱ्या जिंकत २ गुणांची आघाडी घेतली, जी निर्णायक ठरली. त्यानंतर झालेल्या ब्लिट्झच्या चार सामन्यांमध्ये दोन्ही खेळाडूंनी जोरदार संघर्ष केला. शेवटच्या गेममध्ये अनिर्णित (ड्रॉ) राहूनही प्रज्ञानानंदने सामना खिशात घातला. यावर्षी त्याने नॉर्वे चेस स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले होते, ज्यामध्ये त्याने विश्वविजेता मॅग्नस कार्लसनचा पराभव केला होता.