नवी दिल्ली
भारताचा आर्थिक विकास मजबूत पाया, आर्थिक लवचिकता आणि सातत्यपूर्ण सुधारणांवर आधारित असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. इतर देशांच्या खर्चावर वाढ करण्याऐवजी भारत जगासोबत आणि जगाच्या समृद्धीसाठी पुढे जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवी दिल्लीतील ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी सांगितले की, भू-राजकीय तणाव, पुरवठा साखळीतील अडथळे आणि धोरणात्मक संसाधनांवरील वाढत्या स्पर्धेच्या काळात भारताची वाढती आर्थिक व तांत्रिक क्षमता जागतिक आव्हानांना तोंड देण्यास मदत करू शकते. "आपण कोणाच्याही खर्चावर वाढत नाही. आपण जगासोबत आणि जगासाठी वाढतो," असे ते म्हणाले.
एप्रिल-जून तिमाहीत नोंदवलेली ७.८ टक्क्यांची आर्थिक वाढ, ७०० अब्ज डॉलर्सहून अधिक परकीय चलन साठा आणि कर आकारणी, दिवाळखोरी आणि कामगार कायद्यांमधील सुधारणा हे भारताच्या लवचिकतेचे पुरावे असल्याचे त्यांनी नमूद केले. अनिश्चिततेने भरलेल्या जगभरात भारत विश्वासार्हता आणि स्थैर्याची हमी देतो, असे ते म्हणाले.
तंत्रज्ञान आणि डिजिटलायझेशनवर भर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज तंत्रज्ञान, डेटा, ज्ञान आणि नवोपक्रम ही ताकद आहे. मात्र खरी ताकद ती कशी वापरली जाते यात आहे. भारताची डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, परवडणारा मोबाईल डेटा, डिजिटल पेमेंट आणि थेट सरकारी लाभ हस्तांतरण यांमुळे आर्थिक संधी वाढल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
गेल्या दशकात भारताने २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले असून, सामाजिक सुरक्षा प्रणाली एक अब्जाधिक लोकांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, भारताने पॅसमझोत्यांतर्गत ठरवलेल्या लक्ष्यापेक्षा आधीच अपारंपरिक ऊर्जा स्रोतांतून ४० टक्के वीज निर्मितीचे उद्दिष्ट साध्य केले आहे. नूतनीकरणक्षम ऊर्जेची क्षमता ७५ गिगावॅटवरून ३०० गिगावॅटपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले.
व्यापक आर्थिक सुधारणांचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, भारतासाठी सुधारणा ही कोणतीही सक्ती नसून ती आमची श्रद्धा आहे. भारत केवळ वेगाने वाढणारी बाजारपेठ नसून तो इतर अर्थव्यवस्थांसाठी तंत्रज्ञान, प्रतिभा आणि उत्पादनाचे व्यासपीठ बनत आहे.