हिबा खान : नोकरी सोडून समाजपरिवर्तनासाठी वाहून नेलेले व्यक्तिमत्व

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 52 m ago
हिबा खान
हिबा खान

 

ओनिका माहेश्वरी

काही माणसे अख्खे आयुष्य फक्त स्वतःच्या स्वप्नांच्या मागे धावण्यात घालवतात. दुसरीकडे असेही काही मोजके लोक असतात, जे आपल्या भोवतालचे जग सुधारायची जबाबदारी उचलतात. कानपूरमध्ये जन्मलेल्या आणि लखनौच्या गल्ल्यांमध्ये वाढलेल्या हिबा खान या याच दुसऱ्या पंगतीतील व्यक्ती आहेत.
 
निसर्ग रक्षण, प्राण्यांचे हक्क, स्त्री सबलीकरण आणि तरुणांची जडणघडण हेच त्यांनी आपल्या जगण्याचे खरे ध्येय मानले आहे. हिबा यांचे प्रयत्न फक्त झाडे लावण्यापुरते किंवा जनजागृती मोर्चे काढण्यापुरते मर्यादित नाहीत. माणसाच्या मुळाशी असलेल्या विचारसरणीत, जगण्याच्या पद्धतीत आणि निसर्गाशी वागण्याच्या सवयींत खोलवर बदल घडवून आणायची त्यांची तळमळ आहे.

हबा ग्रीन फाउंडेशनच्या संस्थापक हिबा खान यांचा ठाम विश्वास आहे की खरा बदल तेव्हाच घडेल, जेव्हा माणूस स्वतःला निसर्गापासून आणि इतर सजीवांपासून वेगळे मानणे सोडून देईल. त्यांच्या मते निसर्ग जपणे म्हणजे फक्त जंगल वाचवणे किंवा धूर कमी करणे इतकेच नाही. त्याचा थेट संबंध आपल्या ताटातल्या अन्नाशी, खाण्यापिण्याच्या सवयींशी आणि दैनंदिन लहानसहान सवयींशीही आहे. यामुळेच त्यांचे काम अनेक आघाड्यांवर एकदम सुरू असते.
 
कधी त्या प्राण्यांबद्दलची कणव जागी करण्यासाठी सिंथेटिक तबला वाजवतात, तर कधी सिमेंटच्या जंगलात फुलपाखरे आणि पक्षी पुन्हा आणण्यासाठी कामाला लागतात. गेल्या सुमारे एका वर्षापासून त्या नोकरी सोडून पूर्णपणे फाउंडेशनच्या कामात झोकून देऊन काम करत आहेत. त्यांनी आपल्या सर्व उपक्रमांची पाच मुख्य प्रकल्पांमध्ये विभागणी केली आहे. त्यात अरण्य, पुनर्जीवन, सखी, क्लाइमेट लीडरशिप आणि प्रज्ञा यांचा समावेश आहे.

निसर्गाच्या मालकीची खोटी समजूत आणि लिंगभेदाचे वास्तव
हिबा खान पर्यावरण संकटाकडे केवळ प्रशासकीय किंवा वैज्ञानिक प्रश्न म्हणून पाहत नाहीत. त्यांच्यानुसार या संकटाचे खरे मूळ माणसाच्या त्या अहंकारी वृत्तीत दडलेले आहे, ज्यात माणूस स्वतःला धरतीचा मालक समजून बसला आहे. झाडे, डोंगर, नद्या आणि पशुपक्षी फक्त माणसाच्या गरजा भागवण्यासाठी तयार झालेले नाहीत.
 
या पृथ्वीवर त्यांचेही स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आहे. अख्ख्या सृष्टीला माणसाच्या सोयीची वस्तू का मानले गेले आहे, असा प्रश्न हिबा विचारतात. माणूस आपल्या मनातली पोकळी बाहेरच्या वस्तूंनी आणि बेसुमार उपभोगाने भरण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच निसर्गाचा ऱ्हास सुरू होतो.

दिल्ली-एनसीआरमधील गुदमरून टाकणाऱ्या प्रदूषणाचा संदर्भ देत त्या सांगतात की प्रदूषण करणारे लोक कदाचित घरात एअर प्युरिफायर लावून घेतील, पण विषारी हवेत श्वास घेणाऱ्या लाखो सर्वसामान्य माणसांची आणि मुक्या प्राण्यांची जबाबदारी कोणी घ्यायची.

हिबा यांच्या या लढ्यात स्त्री सबलीकरण आणि लिंगभाव समानतेचा मुद्दाही खूप महत्त्वाचा आहे. लहानपणापासून त्यांनी पाहिले की मुलींना कायम दुसऱ्यांच्या गरजेनुसार स्वतःला बदलण्यास शिकवले जाते. त्यांनी सुंदर दिसावे आणि घर सांभाळावे अशी अपेक्षा ठेवली जाते. दुसरीकडे मुलांवर लहान वयातच पैसा कमवण्याचे आणि भावना दाबून ठेवण्याचे ओझे लादले जाते. पुरुषसत्ताक व्यवस्थेचा हा दुहेरी फटका असल्याचे हिबा मानतात.
 
पाच माणसे एका घरात राहत असताना घर चालवण्याची आणि सांभाळण्याची जबाबदारी एकाच व्यक्तीच्या खांद्यावर का असावी, असा त्यांचा थेट सवाल आहे. घरात काम करणाऱ्या स्त्रियांच्या कष्टालाही आर्थिक मोल असते. स्वयंपाक करणे, मुलांचा सांभाळ करणे आणि घरचे व्यवस्थापन करणे ही अशी कामे आहेत, ज्यांसाठी बाहेरून कोणाला ठेवायचे तर मोठी रक्कम मोजावी लागते. मग घरची स्त्री हेच काम करत असेल तर तिला फुकटची जबाबदारी का मानले जाते.

व्हिगन तबला आणि दयेची शिकवण
हिबा खान यांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वात वेगळी बाजू म्हणजे त्यांचा व्हिगन तबला. त्या स्वतःला भारतातील पहिल्या व्हिगन तबला वादक मानतात. सर्वसाधारणपणे तबल्याची पुडी बनवण्यासाठी प्राण्यांच्या कातड्याचा वापर केला जातो. पण हिबा सिंथेटिक साहित्यापासून बनवलेल्या तबल्यावर थाप देतात. संगीतासोबतच प्राण्यांवर प्रेमाचा संदेश देण्याचे ते त्यांच्यासाठी एक माध्यम आहे. २०१४ मध्ये त्यांनी व्हिगन जीवनशैली स्वीकारली. व्हिगन झाल्यानंतर त्यावर उघडपणे बोलणाऱ्या सुरुवातीच्या मुस्लिम महिलांपैकी त्या एक आहेत. यामागे त्यांचे खोलवरचे नैतिक आणि आध्यात्मिक विचार आहेत.

इस्लाममध्ये ईश्वराला रहमान आणि रहीम म्हणजेच अत्यंत दयाळू म्हटले गेले आहे. दया हाच आपल्या श्रद्धेचा पाया असताना मुक्या प्राण्यांवरील हिंसाचार कसा काय योग्य ठरवता येईल, असा विचार हिबा यांनी केला. त्या लोकांना व्हिगन आहाराचे फायदे सांगतात, पण कोणाच्याही ताटातील अन्नाची किंवा सवयींची थट्टा करत नाहीत. वैज्ञानिक पुरावे आणि प्रेमाच्या भाषेत त्या आपली भूमिका मांडतात.

पुनर्जीवन, सखी आणि प्रज्ञा: जमिनीवर उमटणारा बदल
निसर्ग वाचवण्यासाठी हिबा यांचा 'पुनर्जीवन' प्रकल्प शहरांमध्ये नाहीशी होत चाललेली जैवविविधता परत आणत आहे. ग्रेटर नोएडाच्या सेक्टर दोनमध्ये याचा जिवंत अनुभव पाहायला मिळतो. हिबा यांच्या चमूने तिथे वेटलैंड्स तयार केल्याने सात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजाती परत आल्या. आता तिथे हिरवे नाकतोडे, बगळे आणि रंगीबेरंगी ड्रॅगनफ्लाई पुन्हा दिसू लागले आहेत.
 
जुनी जंगले तोडून त्याजागी नवीन रोपे लावणे हा उपाय नाही, असे हिबा मानतात. शतकानुशतके वाढलेल्या जंगलाची जागा काही वर्षांची रोपे घेऊ शकत नाहीत. असे असले तरी त्यांच्या चमूने आतापर्यंत दहा हजारांहून अधिक झाडे लावली आहेत आणि किनारपट्टीवरील खारफुटी (मॅंग्रोव्ह) वाचवण्यासाठीही त्या काम करत आहेत.

हिबा यांच्या आयुष्यातील एका अत्यंत हृदयद्रावक घटनेतून 'प्रोजेक्ट सखी'चा जन्म झाला. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या चाळीस वर्षांच्या महिलेचा अचानक मृत्यू झाला. हिबा तिथे पोहोचल्या तेव्हा लोकांचे बोलणे ऐकून त्या सुन्न झाल्या. तिथे जमलेले लोक या चिंतेत होते की आता या घरात चपात्या कोण बनवेल आणि झाडलोट कोण करेल. कुटुंबातील एक जिवंत माणूस गेल्याचे कोणालाही दुःख नव्हते. 

या घटनेने हिबा यांना आतून हादरवून सोडले. समाजाने स्त्रीची ओळख फक्त स्वयंपाकी आणि मोलकरीण इथपर्यंतच मर्यादित केल्याचे त्यांना जाणवले. हीच विचारसरणी बदलण्यासाठी प्रोजेक्ट सखी सुरू झाला. या अंतर्गत स्त्रियांना कायदेशीर हक्क आणि घरगुती हिंसाचाराबाबत जागरूक केले जाते. जून ते ऑक्टोबर दरम्यान चमूने एक हजाराहून अधिक सॅनिटरी पॅड्स वाटले. सोबतच दिल्ली-एनसीआरमधील सोसायट्यांमध्ये वापरलेल्या पॅड्स आणि डायपर्सच्या सुरक्षित विल्हेवाटीची व्यवस्था उभारण्याचे कामही सुरू आहे.

आजच्या काळात तरुण कायम मोबाईलच्या पडद्याला चिकटून बसलेले असताना हिबा यांनी 'प्रोजेक्ट प्रज्ञा' सुरू केला आहे. तरुणांना पुन्हा पुस्तकांशी जोडणे हा यामागचा उद्देश आहे. याअंतर्गत अशी खास पुस्तके तयार करण्यात आली आहेत, जी वाचकांनी कोणत्याही पानावरून वाचायला सुरुवात केली तरी चालते. त्यात निसर्ग, समाज आणि जैवविविधतेच्या कथा आहेत. याशिवाय तरुणांना हवामान बदलासाठी व्यावहारिकदृष्ट्या सज्ज करण्यासाठी क्लाइमेट लॅब्स आणि क्लाइमेट टॉक्स घेतले जात आहेत. 

या मोहिमेतून आतापर्यंत चार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना जोडण्यात आले आहे. आयआयएम सिरमौर आणि दिल्ली विद्यापीठाच्या महाविद्यालयांपर्यंतही ही मोहीम पोहोचत आहे. तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी अत्यंत कमी शुल्कात एक खास प्रशिक्षण कार्यक्रमही सुरू करण्यात आला आहे.

सामाजिक परिवर्तनाची ही वाट हिबा यांच्यासाठी सोपी राहिलेली नाही. पैशांची चणचण हे मोठे आव्हान आहे. लोक त्यांच्या कामाचे भरभरून कौतुक करतात, पण आर्थिक मदतीसाठी पुढे येणारे हात कमी आहेत. हिबा यांनी नोकरी सोडून स्वतःची पुंजी या फाउंडेशनमध्ये गुंतवली आहे. त्यांच्या चमूतील इतर सहकारीही नोकरी सांभाळून वेळ आणि पैसा देत ही मोहीम जिवंत ठेवत आहेत. देशातील प्रत्येक शहरात मोकळ्या पडलेल्या जमिनीवर लहान लहान जंगले उभी राहावीत, असे हिबा यांचे स्वप्न आहे. 

ही हिरवळ शहरांतील तापमान कमी करेल आणि जमिनीखालची पाणीपातळी वाढवेल. बदल घडवण्यासाठी मोठ्या पदाची किंवा कोट्यवधींच्या बजेटची गरज नसते, हेच हिबा यांची कहाणी दाखवून देते. हेतू प्रामाणिक असेल तर एका माणसाचा लहानसा प्रयत्नही समाजाला नवी दिशा देऊ शकतो.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter