न्यूयॉर्क
न्यूयॉर्क शहराचे मेयर झोहरन मामदानी यांनी नवरात्र, 'सिंदूर खेळ' आणि दुर्गा पूजेचा आनंद साजरा करणाऱ्या भारतीय डायस्पोराला (परदेशी वस्तीतील भारतीय समुदाय) फेस्टिव्हलच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. हा काळ चिंतन आणि आत्मपरिक्षणाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मामदानी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, या आठवड्यात आमचे हिंदू शेजारी नवरात्रोत्सवादरम्यान देवी दुर्गेची पूजा करत आहेत. आमच्या परिसरामध्ये गरबा डान्स, सिंदूर खेळ, ज्येष्ठांचे आशीर्वाद घेणे आणि घरात गोलू मांडणी यांसारखे अनेक विधिवत सोहळे साजरे होत आहेत. तुमची कुटुंबे याला दुर्गा पूजा, दशमी, दसरा किंवा नवरात्र यापैकी काहीही म्हणोत, हा सण आपल्यासाठी चिंतन आणि नूतनीकरणाचा काळ ठरवो, असे ते म्हणाले.
न्यूयार्क शहर, राज्य आणि संपूर्ण अमेरिकेतील अनेक हिंदू संघटनांनी दुर्गा पूजा आणि नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. व्हाइट प्लेन्स, न्यूयार्क येथील हिंदू टेंपल ऑफ ट्राई-स्टेडमध्ये डांडिया, गरबा, अष्टमी पूजा आणि कन्या पूजेसह अनेक दिवसांचे उत्सव आयोजित करण्यात आले आहेत, ज्यामध्ये भारतीय-अमेरिकन समुदायातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे.