समीर दि. शेख
भारतासह जगभरात ईद-ए-मिलादुन्नबीचा सण अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातही या उत्सवानिमित्त सांस्कृतिक विविधता पाहायला मिळाली. प्रदेशांनुसार, स्थानिक परंपरांनुसार मिलाद साजरी करण्याच्या पद्धतीमध्ये मोठा फरक दिसून येतो. जुलूस (मिरवणूक), सजावट, देखावे आणि डीजे यांपलीकडे जाऊन आता या उत्सवानिमित्त महत्त्वाचा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. प्रेषित मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि शिकवणुकीला साजेसा आनंदोत्सव नेमका कसा साजरा केला जायला हवा?
रहमत-उल-लील-आलमीन प्रेषित मोहम्मद
प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी धर्मग्रंथ कुराणने 'अल-अंबिया'अध्यायाच्या च्या १०७व्या आयतीमध्ये अल्लाहाने प्रेषितांना उद्देशून 'आम्ही तुम्हाला संपूर्ण जगासाठी केवळ एक रहमत ('रहमत-उल-लील-आलमीन') म्हणून पाठवले आहे' असे स्पष्टपणे म्हटले आहे.
प्रेषितांची शिकवण जाणून घेण्यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हा पैलू समजून घेणे गरजेचे आहे. त्यांच्या चरित्रामध्ये म्हणजेच सीरतमध्ये आपल्याला नम्रता, करुणा आणि इतरांची काळजी आदी गुण प्रकर्षाने पाहायला मिळतात. समाजावर धर्माचा सकारात्मक प्रभाव पडला पाहिजे असा त्यांचा प्रयत्न असायचा. हीच शिकवण त्यांनी आपल्या सहाबांना (सहकाऱ्यांना) आणि अनुयायांना दिली. म्हणूनच त्यांच्या जयंतीच्या दिवशी साजरा होणारा हा सण निव्वळ जन्मोत्सव नव्हे तर त्यांची शिकवण अनुयायांच्या वर्तनातून प्रतिबिंबित होतेय का हा हे तपासण्याची मोठी संधी आहे.
मिलादचे महाराष्ट्रातील उत्सवी स्वरूप
संपूर्ण महाराष्ट्रात ईद-ए-मिलादुन्नबी अत्यंत वैविध्यपूर्ण मार्गांनी साजरी केली गेली. विशेषतः मुस्लिमबहुल भागांमध्ये, विशेषतः शहरांमध्ये डीजेच्या भिंती आणि भव्य मिरवणुका यावर्षीही दिसल्या. मात्र लक्षात येण्याजोगी गोष्ट म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये काही ठिकाणी डीजे आणि स्पीकर्सचा वापर काहीसा कमी झालेला पाहायला मिळाला.
धार्मिक मिरवणुकीला गालबोट लागू नये यासाठी ध्वनी प्रदूषण टाळण्याचे आवाहन राज्यातील उलेमांनी केले होते. कदाचित त्याचाही काहीसा परिणाम पाहायला मिळाला.
पुण्यातील रामटेकडीसारख्या मुस्लीमबहुल वस्तीत काही महिन्यांपासून डीजे मुक्त मिलाद साजरी होणार असल्याचे फ्लेक्स झळकत होते. शब्दाला जगात तिथल्या तरुणांनी डीजेमुक्त मिलाद साजरी केली. एरवी या एकाच ठिकाणी ५- ७ डीजेच्या भिंतींनी परिसर दणाणून जायचा.
मुस्लिम तरुणांचा स्तुत्य पुढाकार
मात्र अनेक ठिकाणीचे जुलूस डीजेच्या दनदनाटातच निघाले. मात्र आश्वासक बाब म्हणजे, मिरवणुका धार्मिक स्थळांजवळून जाताना डीजे पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. दोनेक ठिकाणी नाचणाऱ्या गर्दीने रुग्णवाहिकांना तातडीने वाट मोकळी करून दिली.
एके ठिकाणी अंत्ययात्रा जात असताना जुलूसने आस्तेकदम जाणे पसंत केले. यावेळी डीजेसकट वाद्ये बंद ठेवल्याची उदाहरणेही दिसली. वरवर पाहता या गोष्टी अत्यंत सामान्य वाटत असल्या तरी त्यातून एक खूप मोठा संदेश दिला गेला आहे. प्रेषितांचा कोणताही उत्सव हा दुसऱ्या व्यक्तीसाठी कधीही गैरसोयीचे कारण बनू शकत नाही हेच यातून सिद्ध झाले.
परस्परांच्या सांस्कृतिक मूल्यांचा करण्यात आला सन्मान
महाराष्ट्राच्या सामाजिक- सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणारे अनेक प्रसंग यावेळी पाहायला मिळाले. केज येथे जुलूसमधील तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टीकरून त्यांना मानवंदना दिली.
तर पुण्याच्या ऐतिहासिक डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोर मिरवणूक थांबवत तिथे पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. प्रेषितांचे चरित्र आणि त्यांची शिकवण इतर धर्मियांच्या महापुरुषांचा आदर करण्यापासून रोखत नसल्याचा दाखलाच या तरुणांनी आपल्या कृतीतून दिला.
समाजसेवेतून उलगडला मिलादचा खरा अर्थ
यंदाच्या मिलादोत्सवानिमित्त मुस्लीम तरुणांनी समाजभान जपल्याचे चित्रही पाहायला मिळाले. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते पैगंबर शेख यांनी स्वतःचे पैसे खर्चून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा स्तुत्य पुढाकार घेतला. लोकांच्या वाटेतील अडथळे किंवा हानिकारक गोष्टी दूर करणे हे एक पुण्यकर्म असल्याची प्रेषितांची शिकवण आहे. त्याला अनुसरूनच ही कृती केल्याचे त्यांनी सांगितले.
तर बीड जिल्ह्यात ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने मुस्लिम जोडप्यांसाठी सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुंबईजवळील मुंब्रा येथे मिरवणूक संपल्यानंतर रात्री उशिरा मुस्लिम तरुणांनी रस्त्यावर पडलेला सर्व कचरा स्वतःहून स्वच्छ केला. तर पुण्यात अमन-ओ-इत्तेहाद ट्रस्टने 'तालीम से तरक्की, इल्म से इत्तेहाद' असा संदेश देत मदरशांतील मुला-मुलींना वह्या, पुस्तके तसेच खाऊचे वाटप केले.
समाजातूनच येतोय सुधारणेचा आवाज
मिलादच्या मिरवणुकांमधील काही अयोग्य प्रथांवर थेट मुस्लिम समाजातूनच उघडपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. पुण्याच्या कॅम्प परिसरातील अनेक मुस्लिम नागरिकांनी डीजेच्या वापरावर तसेच संभाव्य बेशिस्तीवर रास्त प्रश्न उपस्थित केले. त्यांची ही टीका इस्लामवर नव्हे तर मिलादच्या मिरवणुकीत बेशिस्त वर्तन करणाऱ्या मुस्लिमांवर होती.
पुण्याच्या फराह फाउंडेशननेही उत्सवापूर्वी प्रशासनाला तसेच पुणे महानगरपालिकेला पत्र लिहून डीजेला परवानगी न देण्याची महत्त्वाची मागणी केली होती. अति आवाजामुळे नागरिकांना त्रास होतो तसेच इस्लामबद्दल चुकीचा समज निर्माण होतो असे या संस्थेने स्पष्ट केले. पोलिसांनी कारवाई करण्यात दिरंगाई केल्यास FIR दाखल करणार असल्याचे संस्थेने म्हटले.
तोच खरा मिलादोत्सव
लोक ज्यांच्यासोबत सलामतीने राहतात तोच खरा मुस्लिम होय, अशी प्रेषितांची प्रसिद्ध शिकवण आहे. त्याची अनेक उदाहरणे या मिलादनिमित्त पाहायला मिळाली.प्रेषितांवरील प्रेम केवळ घोषणा तसेच भव्य मिरवणुकांपुरते मर्यादित राहता कामा नये. आपण आपल्या शेजाऱ्यांशी कसे वागतो किंवा सार्वजनिक वास्तूंचा वापर कसा करतो यातून ती शिकवण प्रतिबिंबित व्हायला हवी.
हा लेखही वाचा : जाणून घ्या ईद-ए-मिलादचा इतिहास, महत्त्व आणि भारतात साजरी करण्याची पद्धत
अडचणीत असलेल्या लोकांना मदत करून, आजूबाजूचा परिसरात शांती आणि सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी खिदमत आणि इमदाद करून मिलादोत्सव साजरा व्हायला हवा. आपण इतरांसाठी करुणेचा स्त्रोत बनलो तरच 'रहमत-उल-लील-आलमीन' प्रेषितांचे खरे अनुयायी म्हणजे अहले सुन्नत वल जमात म्हणून आपण दुनियात आणि आखिरतमध्ये ओळखले जाऊ.
(लेखक 'आवाज द व्हॉईस मराठी'चे संपादक आहेत.)