वाॅशिंग्टन
भारत आणि इराण यांच्यात कोणताही व्यापारी करार झालेला नाही, असे स्पष्ट शब्दांत अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो (Marco Rubio) यांनी म्हटले आहे. जगातील अनेक देश इराणच्या राजवटीशी संवाद साधत असतात, असे नमूद करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेष्कीयन यांच्यातील भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. किर्गिस्तानातील बिश्केक येथे पार पडलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परिषदेच्या बाजूला ही भेट झाली होती.
फॉक्स न्यूज रेडिओवरील 'द ब्रायन किल्मीड शो' मध्ये मुलाखत देताना रुबियो बोलत होते. भारत आणि इराण व्यापार करार करत असल्याचे दिसले का, या प्रश्नावर उत्तर देताना रुबियो म्हणाले की, मला वाटत नाही की दोन्ही देशांमध्ये असा कोणतीही व्यापारी करार होत आहे. प्रत्येक देश स्वतःचे परराष्ट्र धोरण ठरवतो आणि अनेक देश इराणच्या संपर्कात असतात. आम्ही स्वतःही काही मुद्यांवर त्यांच्याशी संपर्क साधला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना मार्को रुबियो यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. कोणत्याही देशाने इराणला निर्बंध टाळण्यासाठी मदत करू नये, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. इराणला दहशतवादाला मदत करण्यासाठी किंवा अणुबॉम्ब बनवण्यासाठी महसूल निर्माण करण्यास मदत करणाऱ्या देशांवर अमेरिका कारवाई करेल आणि त्यांनाही निर्बंधांचा सामना करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.