अल्लामा इक्बाल यांच्या 'आफ्ताब' कवितेतून गायत्री मंत्राचा अलौकिक गौरव

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 37 m ago
अल्लामा इक्बाल
अल्लामा इक्बाल

 

ग़ौस सिवानी

अल्लामा इक्बाल यांनी जेव्हा गायत्री मंत्राचे उर्दू काव्यात रूपांतर केले, तेव्हा काही कट्टरपंथी लोकांना हे काम साफ गैर-इस्लामी वाटले. परिणामी, शायर-ए-मशरिक (पूर्वेचे महाकवी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इक्बाल यांच्यावर थेट कुफ्रचा (धर्माबाहेर गेल्याचा) फतवा काढण्यात आला. 

आज जे इक्बाल मुस्लिम जगतात अत्यंत आदरणीय मानले जातात, त्यांना स्वतःच्या हयातीत मुस्लिम मानण्यासही काहींनी नकार दिला होता, यावर आज विश्वास बसणे कठीण आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली की, इक्बाल यांना स्वतःच्याच कवितांचा आणि विचारांचा खुलासा करावा लागला होता.

इक्बाल यांची खरी ओळख इस्लामिक तत्त्वज्ञान, आत्मभान (खुद़ी) आणि मुस्लिमांच्या पुनरुत्थानाचे कवी अशी आहे. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची एक अत्यंत सुंदर बाजू म्हणजे त्यांचा विविध धर्म, संस्कृती आणि तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास! त्यांनी कुराण, हदीसचा अभ्यास करतानाच हिंदू तत्त्वज्ञान, वेदांत, बौद्ध धर्म, इराणी सुफी परंपरा आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचेही गूढ उकलले होते. म्हणूनच त्यांच्या काव्यात इतर धर्मांतील अध्यात्माचा गौरव करणाऱ्या रचनाही आढळतात. त्यांची 'आफ्ताब' (सूर्य) ही कविता म्हणजे गायत्री मंत्राचे केलेले एक अलौकिक काव्यात्मक रूपांतरच मानले जाते.

गायत्री मंत्राचे गूढ 
गायत्री मंत्र हा हिंदू धर्मातील सर्वात प्राचीन आणि पवित्र मंत्र मानला जातो. ऋग्वेदात याचा उल्लेख असून मानवी बुद्धी, विवेक आणि आत्मज्ञानाच्या प्रकाशासाठी केलेली ही एक श्रेष्ठ प्रार्थना आहे. परमेश्वराने मानवी बुद्धीला सन्मार्गावर नेण्यासाठी, अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी यात साकडे घातले जाते.

वेदांताच्या अभ्यासकांच्या मते, या मंत्रात एकेश्वरवादाचा (एकाच परमेश्वराचा) विचार स्पष्टपणे दिसतो. संपूर्ण विश्वाचा निर्माता, सर्वव्यापी आणि प्रकाशमय असलेल्या एकाच अंतिम सत्याची यात स्तुती केली आहे.

गायत्री मंत्राचा सोप्या शब्दांतील अर्थ असा,

"हे ईश्वरा तू सर्वव्यापी, सर्वशक्तिमान आणि विश्वाचा स्वामी आहेस. तू ज्ञानाचा, आत्मबोधाचा आणि आनंदाचा स्रोत आहेस. तू आमची सर्व भये दूर करणारा, या सृष्टीचा निर्माता आणि सर्वश्रेष्ठ आहेस. आम्ही तुझ्या तेजाचे ध्यान करतो. तू आमच्या बुद्धीला नेहमी सन्मार्गाकडे घेऊन जा!"
 

इक्बाल यांची 'आफ्ताब' कविता 
उर्दूमधील अनेक नामवंत कवींनी गायत्री मंत्राचे काव्यानुवाद केले, पण इक्बाल यांची 'आफ्ताब' ही रचना गेल्या शतकाहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. इक्बाल यांनी या कवितेत 'सूर्य' (आफ्ताब) या शब्दाचा वापर केवळ आकाशातील आगीचा गोळा म्हणून केलेला नाही; तर त्याला अंतिम सत्य, चेतना आणि परमेश्वराच्या तेजाचे प्रतीक बनवले आहे.

कवितेच्या सुरुवातीलाच इक्बाल लिहितात,

ऐ आफ़ताब! रूह ओ रवान-ए-जहाँ है तू
शीराज़ा-बंद-ए-दफ़्तर-ए-कौन ओ मकाँ है तू

अर्थात, हे सूर्या! तू या संपूर्ण जगाचा आत्मा आणि प्राण आहेस. या सृष्टीच्या पसारा बांधून ठेवणारा तूच मुख्य धागा आहेस.

पुढे बुद्धी आणि विवकेाच्या प्रकाशासाठी प्रार्थना करताना इक्बाल म्हणतात,

ऐ आफ़ताब हम को ज़ियाए-शऊर दे
चश्म-ए-ख़िरद को अपनी तजल्ली से नूर दे

म्हणजेच, हे परमेश्वरी तेजा! आम्हाला ज्ञानाचा आणि विवेकाचा प्रकाश दे. आमच्या बुद्धीच्या डोळ्यांना तुझ्या तेजाने उजळून निघू दे! ही प्रार्थना हुबेहूब गायत्री मंत्रातील 'धियो यो नः प्रचोदयात्' या संकल्पनेशी जुळणारी आहे.

'कुलियात-ए-इक्बाल' मधील या कवितेत पुढेही ते लिहितात की, या जगात पसरलेले संपूर्ण जीवन, पर्वत, निसर्ग आणि प्राणिमात्रांमधील चेतना ही त्या एकाच अंतिम प्रभूच्या तेजाची सावली आहे.

इक्बाल यांचा खरा हेतू
गायत्री मंत्राचे काव्यात रूपांतर करताना इक्बाल यांचा उद्देश कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा प्रचार करणे हा नव्हता. जगभरातील मानवी संस्कृतींमध्ये असलेले universal (सार्वत्रिक) मूल्ये जगासमोर आणणे हाच त्यांचा हेतू होता. माणसाला संकुचित विचारांमधून बाहेर काढून ईश्वरीय प्रेम आणि नैतिकतेकडे नेणाऱ्या प्रत्येक विचाराचा ते मनापासून आदर करत असत.

त्यांची ही रचना म्हणजे कवी स्वतःच्या धार्मिक श्रद्धेवर ठाम राहूनही इतर संस्कृतींमधील उदात्त विचारांचा स्वीकार कसा करू शकतो, याचे जिवंत उदाहरण आहे.

कुफ्रचा फतवा अन् वाद
इक्बाल यांच्या या उघड्या अन् उदार विचारांमुळे त्या काळात मोठा वाद निर्माण झाला. त्यांची 'शिकवा' ही कविता, सुफी परंपरेतील आळसावर त्यांनी केलेले भाष्य आणि 'आफ्ताब' मधील सूर्याची स्तुती यावरून काही मौलवी भडकले.

लाहोरच्या प्रसिद्ध वझीर खान मशिदीचे खतीब मौलवी दीदार अली अलवरी यांनी इक्बाल यांच्याविरोधात कुफ्रचा फतवा जारी केला! मौलवींना एक धार्मिक प्रश्न (इस्तिफ्ता) विचारण्यात आला होता की, "जो व्यक्ती सूर्याला ईश्वराचे रूप मानून त्याची प्रार्थना करतो, मशिदींच्या वक्त्यांवर टोमणे मारतो आणि हिंदूंच्या महापुरुषांना 'इमाम-ए-हिंद' आणि 'चिराग-ए-हिदायत' म्हणतो, तो मुसलमान राहतो का?"

यावर उत्तर देताना मौलवी दीदार अली यांनी फतवा काढला की, इक्बाल यांनी सूर्याला 'परवरदिगार' आणि 'यझदान' म्हटल्यामुळे ते धर्माबाहेर गेले आहेत आणि त्यांनी तौबा (क्षमायाचना) न केल्यास त्यांच्याशी सर्व संबंध तोडून टाकावेत!

या फतव्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली. "जर इक्बाल यांच्यासारखा थोर विचारवंतही मुसलमान उरला नसेल, तर मग खरा मुसलमान कोण?" असा प्रश्न सामान्य जनता विचारू लागली.

प्रतीकांचा गैरसमज आणि इक्बाल यांचे मौन
वास्तविक पाहता, इक्बाल यांच्या कवितेतील 'आफ्ताब' हे केवळ एक रूपक (symbol) होते. कुराणातही परमेश्वराचा उल्लेख "आकाश आणि पृथ्वीचा नूर (प्रकाश)" असा आला आहे. परंतु, काव्यातील रूपके, उपमा आणि भावना समजून न घेताच केवळ शब्दशः अर्थ लावून हा फतवा ठोकण्यात आला होता.

विशेष म्हणजे, इक्बाल यांनी या फतव्यांना कोणतेही आक्रमक उत्तर दिले नाही. सामान्य जनतेने आणि साहित्यप्रेमींनीही या फतव्याकडे साफ दुर्लक्ष केले.

काळ बदलला, फतवे देणारे इतिहासजमा झाले आणि लोकांच्या स्मरणातून पुसले गेले. पण अल्लामा इक्बाल यांची काव्यात्मक प्रतिभा, त्यांची 'आफ्ताब' ही रचना आणि त्यांचा उदार मानवतावादी विचार आजही जगभरात तितक्याच आदराने अन् तेजाने तळपत आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter