अमेरिकेचे इराणवर हवाई हल्ले सुरूच; ट्रम्प यांचा 'सर्वात मोठा हल्ला' बाकी असल्याचा इशारा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 42 m ago
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प

 

वाॅशिंग्टन 

होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये व्यापारी जहाजांवर आणि मध्यपूर्वेतील अमेरिकन सैनिकांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणवर नवीन हवाई हल्ले सुरू केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट करत इराणला कडक शब्दांत चेतावणी दिली असून, अद्याप "सर्वात मोठा हल्ला" होणे बाकी असल्याचे म्हटले आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या लक्ष्यांवर हे हल्ले करण्यात आल्याची माहिती अमेरिकन सेंट्रल कमांडने दिली आहे.

रविवारी अमेरिकेने इराणच्या लाराक बेटावर क्षेपणास्त्र लाँचर आणि इतर ठिकाणांवर हल्ले केले होते, त्यानंतर आता हा नवीन लष्करी संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, होर्मुझ सामुद्रधुनीच्या पूर्वेकडील शहरांमध्ये चार क्षेपणास्त्रे कोसळल्याची नोंद झाली आहे. विशेषतः चाबाहार आणि कोनारॅक या जिल्ह्यांमध्ये हे हल्ले झाले असून, जीवितहानीबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, अमेरिकेच्या या हल्ल्यांना तीव्र प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या प्रवक्त्याने दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला सज्जड दम

या संपूर्ण घडामोडींवर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला स्पष्ट शब्दात चेतावणी दिली आहे. इराणने या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यास याहून अधिक तीव्र आणि मोठे हल्ले केले जातील, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. इराणच्या अर्थव्यवस्थेवर आणि लष्करावर मोठा परिणाम झाला असून, अमेरिका आपल्या सुरक्षा धोरणांशी तडजोड करणार नाही, असे संकेत त्यांनी दिले आहेत. दुसरीकडे, गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धामुळे जागतिक ऊर्जा सुरक्षा आणि व्यापारी मार्गांवरील संकट आणखी गडद झाले आहे