या मराठमोळ्या तरुणासोबत अफगाणिस्तानमध्ये काय घडलं?

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 56 m ago
ट्रॅव्हलर विशाल चव्हाण आणि अफगाणिस्तानातील नागरिक
ट्रॅव्हलर विशाल चव्हाण आणि अफगाणिस्तानातील नागरिक

 

भक्ती चाळक

अफगाणिस्तान म्हटलं की डोळ्यांसमोर काय येतं? हातात मोठमोठाल्या बंदुका घेतलेले तालिबानी सैनिक, ठिकठिकाणी होणारे बॉम्बस्फोट आणि दडपशाहीखाली जगणारे लोक. टीव्ही चॅनेल असोत किंवा पाश्चात्य माध्यमे, कित्येक वर्षांपासून जगासमोर अफगाणिस्तानची हीच बाजू आपल्याला पाहायला मिळतेय. पण अफगाणची हीच प्रतिमा शंभर टक्के खरी आहे का? तिथली प्रत्यक्ष ग्राउंड रियालिटी नेमकी काय आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी नाशिकमधील एका ३९ वर्षीय धाडसी मराठमोळ्या ट्रॅव्हलरने थेट अफगाणिस्तान गाठले आणि तिथे २२ दिवस घालवले.

नाशिकचे विशाल चव्हाण हे आयटी कन्सल्टंट आहेत. गेल्या १८ वर्षांपासून स्वतःचा व्यवसाय सांभाळत त्यांनी जगभरातील १६ देश पिंजून काढलेत. भटकंतीचा हा छंद त्यांना त्यांच्या घरातूनच वारशाने मिळालाय. त्यांच्या  आई-वडिलांना फिरण्याची प्रचंड आवड. लहानपणापासूनच त्यांनी संपूर्ण भारत भ्रमंतीचा प्रवास सुरु केला होता. देशभर फिरून झाल्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रवासाला सुरुवात केली. नुकतीच त्यांनी अफगाणिस्तानची अद्भुत सफर केली आहे. ‘आवाज-द-व्हॉईस’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत २२ दिवसांच्या अफगाणिस्तानातील खऱ्याखुऱ्या वास्तवाचा चकित करणारा अनुभव सांगितला. 
 

अफगाणिस्तानचा अनपेक्षित दौरा
२०१७ मध्ये सिंगापूर, थायलंड आणि मलेशियाच्या रुपाने विशाल यांची पहिली परदेशी ट्रिप झाली. त्यानंतर आलेल्या कोविडच्या काळात दोन-तीन वर्षे सगळेच घरी होते. कोविड संपल्यानंतर २०२१ मध्ये त्यांनी व्हिएतनामला पहिली सोलो ट्रिप केली आणि तेव्हापासून ते सातत्याने परदेशात फिरत आहेत. आतापर्यंत त्यांनी १६ देश पाहिले आहेत. हा छंद आता हळूहळू युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून ट्रॅव्हल ब्लॉगिंग आणि कंटेंट क्रिएशनच्या रुपाने लोकांसमोर येतोय.

२०२५ मध्ये विशाल इराणला गेले होते. तेव्हा इराणने भारतीयांसाठी १४ दिवसांचा प्रवास विजा-फ्री केला होता. मुंबईवरून फ्लाईटने निघून विशाल इराणमधील मशद या बॉर्डर टाऊनवर लँड झाले. तिथे फिरल्यानंतर जेव्हा ते हॉटेलच्या खोलीत लॅपटॉपवर रिसर्च करत होते, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपण ज्या शहरात आहोत, त्याची सीमा थेट अफगाणिस्तानला लागून आहे. 

खरं तर विशाल यांची पुढील ट्रिप आधीच पूर्ण प्लॅन झालेली होती. ते इराणवरून अझरबैजान, अर्मेनिया, जॉर्जिया असा प्रवास करून भारतात परतणार होते. त्यांची एअर तिकिटे, व्हिसा आणि सर्व आयटनरी फायनल होती. पण सीमेवर उभे असताना त्यांच्या डोक्यात विचार आला की, आपण इथपर्यंत आलोच आहोत तर एकदा अफगाणात जाऊन यायला हरकत नाही.
 

विशाल यांनी मशदमधील अफगाणिस्तान काउन्सेलेट गाठले. त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना अफगाणिस्तानात जाण्याबाबत विचारणा केली. ते ट्रॅव्हलर असून त्यांना तिथली ग्राउंड रिॲलिटी दाखवायची आहे, असे त्यांनी सांगितले. परंतु तिथे गेल्या चार-साडेचार वर्षांपासून तालिबानचे शासन आणि विशाल एकटे असल्याने अधिकाऱ्यांनी सुरुवातीला नकार दिला. परंतु विशाल त्यांच्या मतावर ठाम होते. आणि त्याच विश्वासातून त्यांनी परवानगी सुद्धा मिळवली. 

आपल्या इकडून थेट अफगाणिस्तानमध्ये एंट्री केली तर भारतीय पासपोर्टसाठी व्हिसा फ्री असतो, पण इराणच्या बाजूने मॅनेजमेंट वेगळे होते. तालिबान शासनामध्ये अनेक वेगवेगळे गट आहेत, हे तिथे गेल्यावरच समजते. शेवटी तिथे ११ हजार रुपये भरून विशाल यांनी अवघ्या दोन तासांत आपल्या पासपोर्टवर स्टिकर व्हिसा मिळवला. व्हिसा हातात आल्यानंतर त्यांनी अझरबैजान आणि जॉर्जियाचे पुढचे सर्व प्लॅन्स, तिकिटे कॅन्सल केली आणि घरी फोन करून अफगाणिस्तानला जात असल्याची माहिती दिली. 

विशाल यांच्या घरच्यांना धक्का बसला. पत्नीला आधीपासूनच कल्पना दिली होती, पण व्हिसा मिळेपर्यंत निश्चित काही नव्हते. आता हातामध्ये फक्त अफगाणिस्तानचा व्हिसा होता, परतीचे कोणतेही तिकीट नव्हते. इराणमध्ये १०-१५ दिवस राहून तेहरान आणि मशद कव्हर केल्यानंतर ते लँड बॉर्डरने टॅक्सी पकडून अफगाणिस्तानच्या ‘हेरात’ या एका प्रमुख शहराकडे निघाले.

अफगाणचे नाझिम भाई
 
 
इराण बॉर्डरवरून अफगाणिस्तानकडे जाणाऱ्या टॅक्सीमध्ये विशाल बसले. सोबत एक महिला आणि एक पुरुष प्रवासी होते. प्रवास करताना शेजारी बसलेल्या व्यक्तीशी गप्पा सुरू झाल्यावर विशाल यांना समजले की, ते नशीबवान आहेत कारण बाजूच्या व्यक्तीला उत्तम हिंदी येत होते. 

गाडीतील त्या प्रसंगाबद्दल विशाल सांगतात, “माझ्यासोबत प्रवास करत असलेले नाझिम भाईसुद्धा हेरातला चालले होते. मी उत्तम हिंदी-उर्दू बोलत असल्यानं त्यांना वाटलं मी पाकिस्तानी आहे. पण जेव्हा त्यांना सांगितलं मी भारतातून आलोय, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. मग आमच्या गप्पा अजूनच छान रंगल्या. ते अफगाणिस्तानचाचे होते आणि  व्यवसायानिमित्त इराणमध्ये आले होते.”

नाझिम भाईंसोबत चांगली मैत्री झाली आणि विशाल यांच्या मनातील भीती थोडी कमी झाली. बॉर्डरवर पोहोचल्यावर तेथील इमिग्रेशन काउन्टर आपल्या इथल्या टोलनाक्यासारखे साधे होते. पण आत बसलेले दोन तालिबानी सैनिक त्यांचा पारंपरिक पोशाख घालून खांद्यावर मोठ्या AK-47 बंदुका अडकवून बसले होते. त्यांना केवळ पश्तो आणि फारसी भाषा येत होती.

इमिग्रेशन काउन्टरवरील तो अविस्मरणीय प्रसंग सांगताना विशाल म्हणाले, “ते दोघं तालिबानी बंदुका घेऊन बसलेले, एकदम डेंजर दिसत होते. त्यांच्या हावभावावरून मला समजलं की, त्यांच्या भाषेत त्यांनी मला विचारलं कुठला आहेस?  मग मी म्हटलं, ‘अल हिंद’.कारण मिडिल ईस्ट किंवा इस्लामिक कन्ट्रीजमध्ये भारताला ‘हिंद’ म्हणूनच ओळखतात.”

ते पुढे सांगतात, “हिंद ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावर अचानक हसू आलं. ते म्हणाले, ‘हिंद? शारुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन!’ आणि जोरजोरात हसायला लागले. दोन मिनिटं मला कळलंच नाही काय चाललंय. त्यांनी मला काहीच विचारलं नाही, कुठे जाणार, किती दिवस राहणार काहीच नाही. डायरेक्ट एंट्री स्टॅम्प दिला आणि म्हणाले-खुदा हाफिज!”
 

कंदहारमधील थरारक चार तास 
बॉर्डर क्लिअर झाल्यावर नाझिम भाईंनी विशाल यांना हॉटेलवर जाऊच दिले नाही. आणि घरी येण्याचा आग्रह केला. अनोळखी देशात भीती वाटत असताना विशाल यांनी धाडसी निर्णय घेतला. ते नाझिम भाईंच्या चार मजली अलिशान घरात गेले. घराखाली तीन-चार गाड्या उभ्या होत्या. थोडक्यात काय तर नाझिम भाई त्या परिसरातील नावाजलेली व्यक्ती वाटत होती.

गेल्या अनेक दशकांपासून युद्ध सुरू असल्यामुळे तिथल्या सामान्य लोकांपर्यंत विजेसारख्या मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत, पण श्रीमंत लोकांकडे जनरेटर व इतर सर्व सोयी होत्या. तिथे विशाल यांना स्वतंत्र खोली, थंडीचे दिवस असल्याने हिटर आणि उत्तम खाण्यापिण्याची सोय करून नाझिम भाईंनी स्वतःच्या गाडीतून त्यांना तीन दिवस संपूर्ण हेरात फिरवले.

खरं तर अफगाणिस्तानमध्ये कोणत्याही परदेशी पर्यटकाला फिरण्यासाठी तिथल्या मंत्रालयाकडून विशेष परमिट घ्यावे लागते. ज्यात तुम्ही किती दिवस, कोणत्या शहरात आणि कोणाकडे राहणार याची संपूर्ण माहिती द्यावी लागते. पहिल्या तीन दिवसांत विशाल यांच्याकडे कोणतेही परमिट नव्हते. हेरातनंतर नाझिम भाईंचा निरोप घेऊन विशाल रात्रीच्या बसने कंदहारकडे निघाले.

तालिबान्यांकडून अनपेक्षित भेटवस्तू 
 
 
कंदहार हे तालिबानचे मुख्य केंद्र मानले जाते. तिथे पोहोचताच विशाल एका मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. कंधारच्या बस स्टँडवर घडलेल्या त्या थरारक घटनेबद्दल सांगताना विशाल म्हणाले, “कंदहारला पोहोचल्यावर सकाळी सकाळी मला तालिबान्यांनी अडवलं. मी कोणी पाकिस्तानी गुप्तहेर आहे आणि तिथे रेकी करायला गेलोय, असं त्यांना वाटलं.” 

ते पुढे म्हणाले, “माझी चेहरापट्टी, जिन्स-टीशर्ट आणि जॅकेटचा पेहराव तिथे एकदम वेगळा जाणवत होता, त्यामुळं त्यांना मी पाकिस्तानी असल्यासारखं वाटलं. तिथं कोण सैनिक आहे अन् कोण सामान्य नागरिक हे ओळखूच येत नाही. कारण सगळे सिव्हिल ड्रेसमध्ये असतात. त्यांनी मला चार तासांसाठी कंदहारच्या बस स्टँडवर डिटेन केलं होतं.”

त्या चार तासांत विशाल यांचे लॅपटॉप, कॅमेरा, माईक, बॅगेतील एकन्-एक वस्तू, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि अगदी भारतात भरलेल्या आयटीआर टॅक्सची प्रत या सर्वांचे फोटो काढून वरच्या अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले. चार तासांच्या कसून चौकशीनंतर ते भारतीय पर्यटक आहेत हे स्पष्ट झाले.

सुटका झाल्यानंतर तालिबान्यांनी विशाल यांना भेटवस्तू दिली. हे त्यांच्यासाठी अनपेक्षित  होतं. याविषयी ते सांगतात, “चौकशीनंतर चार तासांनी ते सैनिक परत आले आणि त्यांनी माझी सुटका केली. पण त्यांच्या मनात काहीतरी काहीतरी गिल्ट असावा. आमच्या नाशिकमध्ये गोदावरी किनारी बसणाऱ्या अंगठीवाल्यांसारखा एक माणूस फिरत होता. त्याला बोलवून त्या तालिबान्यांनी मला तिथलीच एक अंगठी आणि अत्तराची कुपी गिफ्ट दिली. माझ्यासाठी तो खरंच कल्चरल शॉक होता.”

हिंदुस्थानावर प्रेम आणि पाकिस्तानचा द्वेष 
 
 
पाश्चात्य माध्यमांत दाखवला जाणारा अफगाणिस्तान आणि प्रत्यक्ष तिथले वास्तव याच्यात जमीन-अस्मानाचा फरक असल्याचे विशाल आवर्जून सांगतात. ते म्हणतात, “अफगाण लोक आणि तालिबानी सैनिक भारतीयांना मनापासून मानतात. पाकिस्तानबद्दल त्यांच्या मनात प्रचंड द्वेष आहे. त्यामुळे कुठंही गेलो की आधीच सांगायचो मी हिंदुस्थानातून आलोय. अनेक ठिकाणी दुकानदारांनी आणि हॉटेलवाल्यांनी माझ्याकडून पैसेसुद्धा घेतले नाहीत. तुम्ही आमचे पाहुणे आहात असंच ते म्हणायचे.”

तालिबानी राज्यात महिलांचे स्वातंत्र्य आणि शिक्षण याबाबत काही कठोर नियम आहेत. कोणत्याही महिलेचे फोटो किंवा व्हिडिओ काढायचे नाहीत, हा त्यापैकीच एक नियम. विशाल यांनी हा नियम पाळला, पण व्लॉगिंग करताना कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेजमध्ये हेरात, काबुल यांसारख्या मोठ्या शहरांत अनेक महिला, तरुणी बाजारात हिजाबशिवाय फिरताना, खरेदी करताना आणि कामावर जाताना दिसल्या. 

अर्थात, काबुल, हेरात, मजार-ए-शरीफ या मोठ्या शहरांशिवाय इतर ठिकाणी अजूनही फक्त सातवीपर्यंतच मुलींना शिक्षणाची परवानगी आहे. पण हळूहळू तालिबानी सरकारने नियमांमध्ये लवचिकता आणली आहे. परिणामी तिथे लोकांचे अधिकार पूर्ववत होत आहेत.

शिक्षेच्या भीतीने झिरो क्राईम
विशाल तेथील अनुभवांवरून आणि तिथे मिळालेल्या माहितीवरून सांगतात की, तालिबानचे शासन आल्यापासून भ्रष्टाचार, चोरी आणि किडनॅपिंग पूर्णपणे बंद झाले आहे. गेल्या चार-साडेचार वर्षांत संपूर्ण देशात फक्त दोन गुन्हे घडल्याचे तिथे सांगितले जाते. त्यापैकी एक सायकल चोरी आणि दुसरा छेडछाड. 

सायकल चोरी करणाऱ्याचे दोन्ही हात रस्त्यातच कलम करण्यात आले, ज्यामुळे कायद्याचा जबरदस्त धाक निर्माण झाला आहे. याचे उदाहरण देताना विशाल सांगतात की, “काबुलमधील एका सार्वजनिक हमाममध्ये (स्नानगृह) तालिबान्यांनी भेट दिलेली अंगठी मी विसरलो होतो. ती अंगठी माझ्यासाठी खूप मौल्यवान होती. दोन-तीन तासांनी आठवण झाल्यावर ती अंगठी पुन्हा मिळवण्यासाठी मी तिथे गेलो तर अगदी तिथेच ती सुरक्षित सापडली.”
 

२२ दिवसांचे रहस्य
अफगाणिस्तानची खाद्यसंस्कृती जगभर प्रसिद्ध आहे. तिथला काबुली पुलाव, काबुली चण्यांपासून बनवणारा शोर्नोखोर हा शाकाहारी पदार्थ आणि चपली कबाब हे तिथले प्रमुख आकर्षण आहे. अफगाणिस्तानसारख्या मध्य आशियाई देशांप्रमाणे शाकाहारी पर्याय थोडे कमीच मिळतात.  

कोणत्याही प्लॅनिंगशिवाय निघालेले विशाल चव्हाण तब्बल २२ दिवस अफगाणिस्तानमध्ये का राहिले? त्यांनी मजार-ए-शरीफपासून ४० किलोमीटर आत असलेल्या एका दुर्गम खेड्यात दुचाकीवरून घेतलेला शोध नेमका कसला होता? आणि या २२ दिवसांत त्यांनी अनुभवलेला प्रत्येक क्षण, त्याठिकाणचे वास्तव त्यांनी आपल्या ‘नाशिककर इन अफगाणिस्तान’ या पुस्तकात सविस्तरपणे मांडले आहे.

अफगाणिस्तानच्या बंदुका आणि दहशतीच्या प्रतिमेपलीकडे जाऊन तिथली संस्कृती, भारतीयांप्रतीची आपुलकी आणि तालिबान्यांचे वास्तव लोकांसमोरसमोर आणणारा नाशिकच्या या ट्रॅव्हलरचा अनुभव खरोखरच जाणून घेण्यासारखा आहे. 
 
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter