श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला मिळणार पहिले सीईओ; ५५८५ अर्जांमधून ३ नावांची निवड अंतिम टप्प्यात

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 Months ago
राम मंदिर ट्रस्टच्या बैठकीत आज होणार नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची घोषणा
राम मंदिर ट्रस्टच्या बैठकीत आज होणार नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची घोषणा

 

अयोध्या 

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला लवकरच त्यांचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मिळणार आहेत. अयोध्येत बुधवार, ३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीत ५,५८५ अर्जांमधून शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या तीन नावांपैकी एकाची सीईओ म्हणून निवड केली जाणार आहे. मनीरामदास छावणी येथील नृत्यगोपाल दास यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीत ट्रस्टचे नवीन दोन सदस्य आणि सरचिटणीस यांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निवड समितीचे अधिकारी आणि सेवानिवृत्त न्यायमूर्ती प्रमोद कोहली, सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल विष्णुकान्‍त चतुर्वेदी आणि तज्ज्ञ सदस्य सुरेश हावडे अयोध्येत पोहोचले आहेत. याआधी पारदर्शक आणि तंत्रज्ञान-आधारित प्रक्रियेद्वारे ५,५८५ अर्जांची छाननी करून १६ उमेदवारांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. त्यानंतर समितीने तीन अत्यंत पात्र उमेदवारांची अंतिम यादी ट्रस्टकडे सुपूर्द केली आहे, ज्यावर आज अंतिम निर्णय घेतला जाईल.

जगदिश आडले यांची सचिवपदी वर्णी शक्य

सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत राम मंदिर ट्रस्टच्या पहिल्या सचिवपदाची घोषणा केली जाण्याची शक्यता असून, महाराष्ट्रातील पुणे येथील रहिवासी असलेले जगदिश आडले हे ट्रस्टचे पहिले सचिव बनू शकतात. आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी असलेले आडले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) जोडलेले आहेत. याशिवाय विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय सह-महासचिव बजरंग लाल बांगा यांनाही ट्रस्टमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी यांनी सांगितले की, मोठ्या आणि जागतिक दर्जाच्या मंदिराचे उत्कृष्ट व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी उत्कृष्ट सीईओ शोधण्याच्या उद्देशाने या सर्च पॅनेलची मदत घेण्यात आली होती.