दहशतवादाला पोसणाऱ्यांना थेट इशारा! SCO परिषदेत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान आणि चीनला सुनावले खडेबोल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 54 m ago
शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी
शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

बिश्केक

दहशतवादाचा 'सरकारी धोरण' म्हणून वापर करणाऱ्या देशांना आता खपवून घेतले जाणार नाही, असा सणसणीत इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेत दिला आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या उपस्थितीतच मोदींनी दहशतवादावर दुटप्पी भूमिका घेणाऱ्या देशांचे अक्षरशः वाभाडे काढले.

दहशतवाद ही कोणाचीही 'स्ट्रॅटेजिक ॲसेट' असू शकत नाही!

SCO परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानच्या दहशतवाद समर्थक धोरणांवर थेट निशाणा साधला. दहशतवादाचा सामना करण्यासाठी केवळ एखादी घटना घडल्यावरच प्रतिक्रिया देण्याची (Action-Reaction) भूमिका आता पुरेशी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • इकोसिस्टम उद्ध्वस्त करा: दहशतवादाला मिळणारी रसद, त्यांचा पैसा, भरती प्रक्रिया आणि त्यांना दिला जाणारा आश्रय ही संपूर्ण साखळीच मुळापासून उखडून फेकण्याची गरज आहे.

  • दुटप्पीपणा नको: या अत्यंत गंभीर प्रश्नावर संपूर्ण जगाने एका सुरात बोलले पाहिजे, यात कोणताही दुटप्पीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही.

  • कठोर संदेश: जे देश दहशतवादाचा वापर आपले धोरण म्हणून करतात, त्यांना आता स्पष्ट संदेश दिला पाहिजे की, दहशतवाद कधीही कोणाचीही 'स्ट्रॅटेजिक ॲसेट'  होऊ शकत नाही.

चीनच्या 'बीआरआय' (BRI) प्रकल्पालाही लगावला टोला

दहशतवादासोबतच मोदींनी चीनच्या 'बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह' (BRI) प्रकल्पावरही अप्रत्यक्ष आणि जोरदार टीका केली. दळणवळण आणि कनेक्टिव्हिटी वाढवणारे प्रकल्प उभारताना प्रत्येक देशाच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा (Sovereignty and Territorial Integrity) आदर राखला गेलाच पाहिजे, असे मोदींनी ठणकावून सांगितले. (चीनचा हा प्रकल्प पाकव्याप्त काश्मीरमधून (PoK) जात असल्याने भारताने त्याला नेहमीच कडाडून विरोध केला आहे.)

युद्धभूमीवर नाही, तर चर्चेने प्रश्न सोडवा

पश्चिम आशियातील सध्याच्या तणावावर चिंता व्यक्त करताना मोदींनी स्पष्ट केले की, आजच्या एकमेकांशी जोडलेल्या जगात कुठलाही संघर्ष एकाच भागापुरता मर्यादित राहत नाही.

  • युद्धाचा थेट परिणाम जागतिक ऊर्जा सुरक्षा, सागरी व्यापार आणि पुरवठा साखळीवर (Supply Chain) होतो.

  • या सगळ्याचा सर्वात मोठा फटका 'ग्लोबल साऊथ'च्या (विकसनशील) देशांना बसतो.

  • त्यामुळे कोणतेही तणाव किंवा वाद हे युद्धभूमीवर न सोडवता, चर्चा आणि मुत्सद्देगिरीच्या (Diplomacy) माध्यमातूनच सोडवले पाहिजेत, ही भारताची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा मांडली.

युरेशियामध्ये शांतता आणि स्थैर्य राखायचे असेल तर अफगाणिस्तानमध्ये शांतता असणे अत्यंत गरजेचे आहे. भारताची अफगाणिस्तानला मिळणारी मानवी मदत यापुढेही सुरूच राहील, अशी ग्वाही मोदींनी दिली. भविष्यात SCO ची वाटचाल 'सुरक्षा, कनेक्टिव्हिटी आणि संधी' या तीन स्तंभांवर आधारित असावी आणि याचा थेट फायदा आपले तरुण, शेतकरी आणि उद्योजकांना मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी शेवटी व्यक्त केली.