काठमांडू
नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी महापुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा सातत्याने वाढत असून मंगळवारी हा आकडा ९८७ वर पोहोचला आहे. विविध भागांतून सुरक्षा दल आणि बचाव पथकांनी शोधमोहीम तीव्र करत आणखी मृतदेह बाहेर काढले आहेत. पुराच्या या भीषण तांडवात ५८३ परदेशी नागरिकांसह तब्बल ३,९१६ लोक अद्यापही बेपत्ता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मैनेजमेंट अथॉरिटीने (NDRRMA) दिलेल्या माहितीनुसार, चितवन जिल्ह्यात सर्वाधिक ३२१ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. याशिवाय पश्चिम नवलपरासीमध्ये २१६, पूर्व नवलपरासीमध्ये १७० आणि नुवाकोटमध्ये ९५ जणांचे मृतदेह सापडले आहेत. गोरखा, धाडीद, तनहून आणि रसुवा जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे.
नेपाळमधील एकूण आठ जिल्ह्यांना या महापुराचा फटका बसला असून, पुरात २७९ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी १६८ जणांना उपचारातानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे, तर उर्वरितांवर उपचार सुरू आहेत. बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी नेपाळी लष्करासह विविध पथके युद्धपातळीवर काम करत आहेत.