मोदींनी भेट दिलेल्या या इस्लामी देशाला आता देता येणार व्हिसाशिवाय भेट

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भक्ती चाळक

उझबेकिस्तानला फिरायला जाण्याची इच्छा असणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी एक अतिशय आनंदाची अन् मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उझबेकिस्तानच्या दोन दिवसीय अधिकृत दौऱ्यादरम्यान एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. मध्य आशियातील अतिशय सुंदर अन् ऐतिहासिक देश असलेल्या उझबेकिस्तानने भारतीय नागरिकांसाठी ३० दिवसांची व्हिसामुक्त प्रवेश सुविधा जाहीर केली आहे.

ताश्कंद येथे पंतप्रधान मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शवकत मिर्झियोयेव्ह यांच्यात पार पडलेल्या द्विपक्षीय बैठकीत अध्यक्षांनी स्वतः ही घोषणा केली. या निर्णयामुळे दोन्ही देशांतील नागरिकांमधील संबंध, पर्यटन अन् व्यापारी देवाणघेवाण वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

अध्यक्ष शवकत मिर्झियोयेव्ह यांनी आपल्या भाषणात भारताला विश्वासू धोरणात्मक भागीदार म्हटले आहे. दोन्ही देशांतील व्यापार आणि सांस्कृतिक संबंध वेगाने वाढत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

मिर्झियोयेव्ह म्हणाले, "भारत आमचा विश्वासू धोरणात्मक भागीदार आहे. गेल्या वर्षी आमचा द्विपक्षीय व्यापार पहिल्यांदाच १ अब्ज अमेरिकन डॉलरच्या पार गेला. गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांतील संयुक्त उपक्रमांची संख्या सात पटीने वाढली आहे. सध्या दोन्ही देशांदरम्यान दर आठवड्याला १४ थेट विमाने उड्डाण करत आहेत."

उझबेकिस्तानमध्ये योग आणि भारतीय संस्कृतीची वाढती लोकप्रियता अधोरेखित करत अध्यक्ष पुढे म्हणाले, "भारतीय नागरिकांसाठी ३० दिवसांची व्हिसा-मुक्त सुविधा लागू केल्याने दोन्ही देशांतील परस्पर संबंध, पर्यटन आणि व्यावसायिक देवाणघेवाणीला खूप मोठा हातभार लागेल."

उझबेकिस्तान भ्रमंतीत काय आहे खास?
व्हिसाची कटकट संपल्यामुळे आता पासपोर्ट हातात धरून थेट उझबेकिस्तान गाठता येणार आहे. सिल्क रोडचा समृद्ध इतिहास, अप्रतिम इस्लामिक वास्तुकला, गजबजलेल्या बाजारपेठा आणि चविष्ट खाद्यसंस्कृती अनुभवण्यासाठी उझबेकिस्तान हा उत्तम पर्याय ठरत आहे.

फिरण्यासाठी योग्य वेळ कोणती?
उझबेकिस्तानला भेट देण्यासाठी एप्रिल ते जून (वसंत ऋतू) आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर (शरद ऋतू) हा काळ सर्वात उत्तम मानला जातो. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात तिथे प्रचंड उकाडा असतो, तर डिसेंबर ते फेब्रुवारी या हिवाळ्याच्या दिवसांत खूप थंडी असते.

पाहण्यासारखी प्रमुख ५ ठिकाणे

समरकंद : सिल्क रोडचा ऐतिहासिक वारसा
 

मध्य आशियातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक असलेले समरकंद हे त्याच्या भव्य वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. रेजिस्टान स्क्वेअर, शाह-ई-झिंदा आणि गुर-ए-अमीर यांसारख्या भव्य इस्लामिक वास्तू प्रमुख आकर्षणे आहेत. हे शहर पाहण्यासाठी कमीत कमी दोन दिवस ठेवावेत. ताश्कंदहून इथे येण्यासाठी हाय-स्पीड ट्रेनची उत्तम सोय आहे.

बुखारा : जुन्या संस्कृतीचा इतिहास
 

समरकंदच्या तुलनेत बुखारा हे शहर जुन्या संस्कृतीची ओळख करून देणारे ठिकाण आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेले जुने शहर, मस्जीदी, मदरसा आणि पारंपारिक बाजार येथील प्रमुख आकर्षणे आहेत. जुन्या शहरात मुक्काम केल्यास सर्व ऐतिहासिक ठिकाणे पायी फिरून पाहता येतात.

खिवा : मातीच्या विटांचे प्राचीन शहर
 

खिवा शहरात पाऊल ठेवताच एखादा ऐतिहासिक चित्रपट पाहत असल्याचा भास होतो. 'इत्चन कला' हा तटबंदी असलेला जुना भाग, मातीच्या विटांपासून बनवलेल्या वास्तू आणि निळ्या रंगाचे नक्षीदार मिनार येथील प्रमुख आकर्षणे आहेत. शहराचा पूर्ण अनुभव घेण्यासाठी जुन्या तटबंदीच्या आतच मुक्काम करावा.

ताश्कंद : आधुनिकता आणि सोव्हिएत संस्कृतीचा संगम
 

उझबेकिस्तानची ही राजधानी पर्यटकांसाठीचे मुख्य प्रवेशद्वार आहे. सोव्हिएत काळातील इमारती, कलात्मक मेट्रो स्टेशन आणि गजबजलेला चोरसू बाजार येथील प्रमुख आकर्षणे आहेत. भारतातून येणारी विमाने इथेच उतरतात. ताश्कंदला केंद्रस्थान मानून इतर शहरांत प्रवास करणे सोपे पडते.

फर्गाना व्हॅली : कला अन् निसर्गाचा अनुभव
 

सिल्क रोडच्या नेहमीच्या मार्गापेक्षा काहीतरी वेगळे अनुभवायचे असल्यास फर्गाना व्हॅली उत्तम पर्याय आहे. रेशीम विणकाम, मातीची भांडी (सिरामिक्स) बनवण्याची कला आणि निसर्गरम्य ग्रामीण भाग येथील प्रमुख आकर्षणे आहेत. मार्गिलान आणि रिशतान सारख्या छोट्या शहरांमध्ये जाऊन स्थानिक हस्तकला जवळून पाहता येते.

भारतीय पर्यटकांसाठी उपयुक्त माहिती

प्रवास कालावधी : विना-व्हिसा सलग ३० दिवस राहण्याची परवानगी.
विमान प्रवास : भारतातून ताश्कंदसाठी थेट विमाने असून अवघ्या ४ तासांपेक्षा कमी वेळेत पोहोचता येते.
चलन : स्थानिक चलन उझबेक सोम असले तरी सोबत अमेरिकन डॉलर (USD) ठेवणे सोयीचे पडते.
खाद्यसंस्कृती : प्लोव्ह (Plov), कबाब, स्थानिक ब्रेड आणि नूडल्स हे पदार्थ खूप लोकप्रिय आहेत.
भाषा : उझबेक आणि रशियन भाषा सर्वाधिक बोलली जाते. मुख्य पर्यटन क्षेत्राबाहेर इंग्रजीचा वापर मर्यादित आहे.

कमी खर्चात परदेश प्रवासाची सफर घडवून आणणारा उझबेकिस्तान हा देश आता व्हिसा-मुक्त झाल्यामुळे भारतीय पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter