बांगलादेशचे पंतप्रधान तारेक रहमान यांनी भारतात आयोजित 'ब्रिक्स' (BRICS) शिखर परिषदेला न उपस्थित राहण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत "अपरिपक्व" आणि देशाच्या राष्ट्रीय हिताला बाधा पोहोचवणारा होता, अशी तीव्र टीका बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी केली आहे. वैयक्तिक राजकीय विरोध किंवा अल्पकालीन राजकीय समीकरणांच्या आधारावर परराष्ट्र धोरण चालवणे हे देशासाठी नेहमीच घातक ठरते, असा इशाराही त्यांनी दिला.
'पीटीआय' (PTI) या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत ७८ वर्षीय शेख हसीना यांनी बांगलादेशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, जागतिक पातळीवरील प्रमुख उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा गट असलेल्या ब्रिक्सच्या परिषदेतील सहभागामुळे बांगलादेशसाठी आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या असत्या, मात्र ती संधी देशाने गमावली आहे.
"माझ्या उपस्थितीमुळे दौरा रद्द करणे दुर्दैवी"
नवी दिल्लीत ९-१० सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी बिमस्टेकचे (BIMSTEC) अध्यक्ष म्हणून बांगलादेशचे पंतप्रधान तारेक रहमान यांना भारताने अधिकृत आमंत्रण धाडले होते. मात्र, त्यांनी या परिषदेत सहभाग घेतला नाही. यावर बोलताना हसीना म्हणाल्या, "मी दिल्लीत आहे म्हणूनच जर तारेक रहमान यांनी भारत दौरा रद्द केला असेल, तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. दोन देशांमधील ऐतिहासिक संबंध एका व्यक्तीच्या वैयक्तिक संवेदनशीलतेवर किंवा आवडीनिवडीवर ठरू शकत नाहीत."
१९७९ मध्ये झियाउर रहमान (तारेक रहमान यांचे वडील) दिल्लीत आले होते, तेव्हाही मी दिल्लीतच राहत होते, या ऐतिहासिक घटनेचा दाखला त्यांनी दिला. जबाबदार सरकारने देशासाठी दरवाजे उघडे ठेवायला हवेत, ते बंद करायचे नसतात, असा टोला त्यांनी लगावला.
फाशीच्या शिक्षेच्या भीतीला स्पष्ट नकारबांगलादेशातील न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेबद्दल विचारले असता शेख हसीना म्हणाल्या, "मला अटकेची, तुरुंगवासाची किंवा जीवाला धोक्याची पूर्ण कल्पना आहे. परंतु भीती माझे कर्तव्य ठरवू शकत नाही." लोकशाही पुनरुज्जीवित करण्यासाठी, मतदानाचा अधिकार आणि कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी मी बांगलादेशात परत जाण्यास ठाम आहे. बांगलादेश सध्या मोठ्या राष्ट्रीय संकटातून जात असून, तिथे विरोधकांवर राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.