नवी दिल्ली
युद्ध, जागतिक अस्थिरता आणि पुरवठा साखळीतील अडथळे असतानाही देशाने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के जीडीपी वाढ साध्य केली आहे. या यशाचे श्रेय देशवासीयांच्या सामूहिक परिश्रमांना देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांचे अभिनंदन केले आहे. इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ संदेश जारी करत त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली.
२०२० च्या कोरोना महामारीनंतर जगात कुठेही स्थैर्य राहिलेले नाही, मात्र भारताने या आव्हानांवर मात करत मोठी प्रगती केली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. देशात काही लोक सतत नकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु त्याकडे दुर्लक्ष करून भारताने आपली घोडदौड सुरूच ठेवली आहे. भारताच्या विकासाचा हा वेग कायम राखण्यासाठी नागरिकांनी स्वदेशी आणि आत्मनिभैरतेवर भर दिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
देशातील तरुणांना विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे. नागरिकांनी शक्यतो परदेशात फिरण्यासाठी जाणे टाळावे, परदेशात विवाह सोहळे आयोजित करू नयेत आणि गरज नसताना सोन्याची खरेदी टाळावी, असे मोलाचे आवाहन पंतप्रधानांनी केले. सरकारच्या स्पष्ट धोरणांमुळेच देश प्रगतीच्या नव्या शिखरावर पोहोचत असल्याचे त्यांनी नमूद केले.