नवी दिल्ली
जागतिक स्तरावर आपल्या संगीताने लाखो रसिकांच्या मनावर राज्य करणारे प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान (A R Rahman) लवकरच आपले नवे आत्मचरित्र प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. 'रहमान: ए रेनेसान्स' (Rahman: A Renaissance) असे या आगामी पुस्तकाचे नाव असून, लेखिका रूपा चक्रवर्ती यांच्यासोबत त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. या आत्मचरित्राच्या माध्यमातून चाहत्यांना रहमान यांच्या वैयक्तिक जीवन, संगीत आणि सर्जनशील विश्वाबद्दल कधीही न पाहिलेली माहिती मिळणार आहे.
एका प्रसिद्ध पत्रकानुसार, या पुस्तकात ए आर रहमान यांच्या बालपणापासून ते आतापर्यंतच्या कलात्मक प्रवासावर प्रकाश टाकला जाणार आहे. संगीतकार म्हणून घडताना आलेले अनुभव, मानसिक संघर्ष, आकांक्षा आणि त्यांच्या विचारांना आकार देणाऱ्या विविध घटकांचा यात समावेश असणार आहे.
आपल्या संगिताबद्दल बोलताना ए आर रहमान यांनी सांगितले की, माझे संगीत हे मनाच्या सततच्या विकासातून आणि प्रवासातून येते. मी अनुभवलेली बंधुभावकता, मानसिक उलथापालथ आणि आव्हाने एकमेकांशी जोडलेली आहेत आणि त्यातील काही पैलू या पुस्तकाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करण्याचा माझा प्रयत्न आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.