सुपरस्टार रजनीकांत यांच्या बहुप्रतिक्षित 'जेलर २' (Jailer 2) या आगामी चित्रपटाच्या रिलीजपूर्वी चेन्नईमध्ये चाहत्यांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. गुरुवारी चित्रपट प्रदर्शित होत असताना, सकाळच्या विशेष शोचे तिकीट मिळवण्यासाठी चाहत्यांनी चित्रपटगृहांबाहेर मोठी गर्दी केली आहे.
रोहिणी सिल्व्हर स्क्रीनसह विविध चित्रपटगृहांबाहेर चाहत्यांनी पहाटेपासूनच लांबच लांब रांगा लावल्या होत्या, तर अनेक ठिकाणी बुकिंग काऊंटरवर 'हाउसफुल्ल'चे बोर्ड झळकले आहेत. वयाच्या ७५ व्या वर्षीही रजनीकांत यांचे बॉक्स ऑफिसवरील गारुड आणि स्टार पॉवर कायम असल्याचे चाहत्यांनी सांगितले. पहिल्या भागाच्या यशानंतर आता दुसरा भाग त्याहून अधिक धमाकेदार असेल, असा विश्वास चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे.
देशभरातून चेन्नईत दाखल झाले चाहते
या उच्च-ऑक्टेन सिक्वेलचा 'फर्स्ट डे फर्स्ट शो' (FDFS) अनुभवण्यासाठी केवळ स्थानिकच नव्हे, तर इतर राज्यांमधूनही चाहते चेन्नईत पोहोचले आहेत. गुजरातच्या अहमदाबादहून विशेष ेवकर आलेल्या राज चोकसी या चाहत्याने सांगितले की, रजनीकांत यांची लोकप्रियता संपूर्ण देशभरात पसरलेली आहे. पहिल्या भागात मोहनलाल आणि शिव राजकुमार यांच्या पाहुण्या कलाकारांच्या भूमिकांनी चित्रपट संस्मरणीय केला होता, त्यामुळे या भागात कोण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाईची शक्यता
या फ्रँचायझीची लोकप्रियता पाहता चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. १० ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित झालेला 'जेलर' हा चित्रपट तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला होता, ज्याने जगभरात ६०० कोटींहून अधिक कमाई केली होती.
दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार यांच्या या चित्रपटात 'टायगर' म्हणून ओळखले जाणारे मुथुवेन पांडियन यांची कथा पुढे सरकणार आहे. पहिल्या भागातील कलाकारांसोबतच सुरज वेंजारमूडू, एस. जे. सूर्य्या, विद्या बालन, विजय सेतुपती आणि मिथुन चक्रवर्ती यांसारखे नवीन कलाकारही या चित्रपटात झळकणार आहेत.