18th BRICS Summit New Delhi 2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून जागतिक नेते नवी दिल्लीत येणार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आणि पंतप्रधान मोदी
संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आणि पंतप्रधान मोदी

 

नवी दिल्ली 

संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस (Antonio Guterres) या महिन्याच्या मध्यात नवी दिल्लीत आयोजित करण्यात येणाऱ्या १८ व्या ब्रिक्स (BRICS) परिषदेत सहभागी होणार आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने या वृत्ताला दुजोरा देण्यात आला असून, भारत यंदा ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवत आहे. १२ ते १३ सप्टेंबर दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रवक्त्यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ब्रिक्सच्या या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी सरचिटणीस नवी दिल्लीला भेट देणार आहेत. भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेची 'रेझिलिअन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी' (Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability) ही मुख्य थीम आहे. या परिषदेत जगभरातील सदस्य देश, भागीदार देश आणि निमंत्रित पाहुण्यांचे प्रमुख एकत्र येणार आहेत.

भारताचे अध्यक्षपद आणि जागतिक महत्त्व

भारत ब्रिक्सचा संस्थापक सदस्य असून, २०१२, २०१६ आणि २०२१ नंतर भारताने १ जानेवारी २०२६ रोजी चौथ्यांदा ब्रिक्सचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. ब्रिक्स आपल्या स्थापनेची २० वर्षे पूर्ण करत असताना भारतात ही परिषद होत आहे. याआधी सरचिटणीस गुटेरेस यांनी फेब्रुवारी २०२६ मध्ये नवी दिल्लीत झालेल्या इंडिया-एआय इम्पॅक्ट समिटसाठीही भारताला भेट दिली होती. यंदाच्या ब्रिक्स परिषदेत रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेष्कीयन यांच्यासह अनेक जागतिक नेते सहभागी होण्याची दाट शक्यता आहे.