नवी दिल्ली
संसदेत महत्त्वाच्या विधेयकांवरील चर्चादरम्यान अनुसूचित जाती आणि जमाती (SC/ST) प्रवर्गातील खासदारांना बोलण्यासाठी पुरेशी संधी मिळावी, या मागणीसाठी केंद्रीय मंत्री जितन राम मांझी यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. या विषयावर योग्य ती कारवाई करण्याची विनंती त्यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्री मांझी यांनी आपल्या पत्रात नमूद केले की, मध्य प्रदेशच्या खरगोनचे प्रतिनिधित्व करणारे भाजप खासदार गजेंद्र सिंह पटेल यांनी ५ ऑगस्ट रोजी मांझी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या एनडीए खासदार समूहाच्या संवाद बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता. सदस्यांना आपापल्या समुदायाचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी अधिक वेळ मिळायला हवा, अशी मागणी पटेल यांनी केली होती.
पीटीआयशी बोलताना खासदार गजेंद्र सिंह पटेल यांनी दुजोरा दिला की, राजकीय पक्षांना मिळणारा एकूण वेळ त्यांच्या खासदारांमध्ये विभागला जात असल्याने एससी/एसटी खासदारांचा बोलण्याचा वेळ वाढवला पाहिजे. यामुळे समुदायाशी संबंधित प्रश्न संसदेत अधिक प्रभावीपणे मांडले जाऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.