नागोया
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या सावन बरवालने पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत ऐतिहासिक कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे. वैयक्तिक सर्वोत्कृष्ट वेळेची नोंद करत सावनने हे पदक जिंकले असून, गेल्या ४४ वर्षांत या प्रकारात भारताचे हे पहिलेच पदक ठरले आहे.
यापूर्वी भारताने १९८२ च्या नवी दिल्ली आशियाई क्रीडा स्पर्धेत मॅरेथॉनमध्ये पदक जिंकले होते. सावन बरवालने २ तास ११ मिनिटे ३७ सेकंदांची वेळ नोंदवली. जपानच्या इचिटाका यामाशिताने २ तास १० मिनिटे ४९ सेकंदांसह सुवर्णपदक पटकावले, तर चीनच्या पेइयू फेन्गने (२:१२:१३) कांस्यपदक आपल्या नावावर केले. शर्यतीदरम्यान सावनने काही वेळ आघाडीही घेतली होती. अर्धवेळेच्या टप्प्यावर तो १ तास ५ मिनिटे ५४ सेकंदांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला होता. या स्पर्धेत सहभागी झालेला दुसरा भारतीय धावपटू कार्तिक करखेरा याने १९ जणांच्या स्पर्धेत १७ वे स्थान मिळवले.