ईमान सकिन
जेव्हा आपण मस्जिद हा शब्द ऐकतो, तेव्हा आपल्या मनात सर्वात आधी नमाजचा विचार येतो. खांद्याला खांदा लावून उभे असलेले सर्व नमाजी, अजानचा सुमधुर आवाज, कुराणचं पवित्र पठण आणि प्रार्थनेचं शांत वातावरण डोळ्यांसमोर उभं राहतं. ही नैसर्गिक आणि साहजिक गोष्ट आहे. मस्जिद हे एक पवित्र प्रार्थनास्थळ आहे. मुस्लिम लोक तिथे अल्लाहकडे श्रद्धेने येतात.
पण अनेकदा आपण एक महत्त्वाची गोष्ट पूर्णपणे विसरून जातो. मस्जिद म्हणजे केवळ काही मिनिटं नमाज अदा करून परत येण्याची एखादी साधी जागा नाहीये. इस्लामिक इतिहासाच्या विविध कालखंडांमध्ये मस्जिदी ज्ञान, शिक्षण, दानशूर काम, सामाजिक चर्चा, आश्रय आणि समाजसेवेची मुख्य केंद्रं राहिल्या आहेत. मस्जिद समाजाच्या समस्यांपासून कधीही वेगळी नव्हती. ती या सर्व समस्यांच्या मधे उभी राहिलेली आहे कायमच.
कुराण सर्व श्रद्धावानांना एका गोष्टीची आठवण करून देतं. केवळ प्रार्थना आणि बाह्य विधींपुरती पुण्य ही गोष्ट मर्यादित नाहीये. अल्लाहने याबद्दल एक आदेश दिलाय. "केवळ पूर्व किंवा पश्चिमेकडे स्वतःचा चेहरा वळवणं म्हणजे पुण्य नाहीये. अल्लाहवर दृढ विश्वास ठेवणारा व्यक्तीच खऱ्या अर्थाने पुण्यवान आहे. तसंच स्वतःच्या प्रिय संपत्तीतून नातेवाईक, अनाथ, गरजू लोक आणि प्रवाशांना मदत करणारा व्यक्ती पुण्यवान आहे," असा पवित्र कुराणचा (२:१७७) संदेश आहे.
ही पवित्र आयत विश्वासाला मानवी जबाबदारीशी जोडते. नमाज महत्त्वाची आहे. पण आपल्या बाजूला उभ्या असलेल्या आणि गरजू व्यक्तीशी आपली वागणूक कशी आहे, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आता एका अशा भारतीय मस्जिदीची कल्पना करा. ही मस्जिद रक्तदान शिबिरांचं केंद्र बनू शकते. शुक्रवारच्या नमाजनंतर लोकांनी आपापल्या घरी परत जाण्याऐवजी स्वयंसेवकांसोबत मिळून रक्तदान शिबिर आयोजित करावं. तिथे तरुण लोक अपघातातले पीडित, शस्त्रक्रियेला सामोरे जाणारे गंभीर रुग्ण आणि मोठ्या आजारांशी लढा देणाऱ्या लोकांसाठी आवर्जून रक्तदान करू शकतात. अशा पद्धतीने मस्जिद कोणाचा तरी जीव वाचवणाऱ्या संपूर्ण समुदायाच्या सामायिक प्रयत्नांचं ठिकाण नक्कीच बनू शकतं.
हे काम प्रार्थनेपासून वेगळं नाहीये. प्रार्थनेचाच तो एक आविष्कार आहे. अल्लाहने याबद्दलही स्पष्टपणे सांगितलंय. "ज्या व्यक्तीने एका माणसाचा जीव वाचवला, त्याने संपूर्ण मानवतेला वाचवल्यासारखं आहे," असा पवित्र कुराणचा (५:३२) संदेश आहे.
हीच भावना भयानक पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या वेळीही स्पष्टपणे दिसू शकते. भारतातल्या अनेक भागांमध्ये मस्जिदी अन्न, कपडे, आवश्यक औषधं आणि इतर गरजेच्या वस्तू गोळा करण्याची केंद्रं बनू शकतात. हे सर्व साहित्य पीडितांपर्यंत पोहोचवण्याचं काम तिथून होऊ शकतं. ज्या मस्जिदीत स्वयंपाकघर उपलब्ध आहे, तिथे बेघर झालेल्या कुटुंबांसाठी अन्नाची सोय केली जाऊ शकते. मस्जिदीच्या खोल्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. मस्जिदीचे प्रामाणिक स्वयंसेवक वृद्ध लोक, लहान मुलं आणि मदतीचा कोणताही आधार नसलेल्या असहाय्य लोकांना मदत करू शकतात.
मस्जिद हे शिक्षणाचं केंद्रही बनू शकतं. ज्या वंचित समुदायांमध्ये मुलांना चांगलं शैक्षणिक मार्गदर्शन आणि कोचिंग उपलब्ध नसतं, तिथे मस्जिद मोठी भूमिका बजावू शकते. शाळेनंतर अशा गरजू मुलांसाठी मोफत किंवा कमी खर्चात चालणाऱ्या शैक्षणिक वर्गांची व्यवस्था मस्जिदीत केली जाऊ शकते. निवृत्त झालेले शिक्षक, महाविद्यालयातले विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतले तज्ज्ञ लोक स्वयंसेवक म्हणून मदत करू शकतात. ते गणित, विज्ञान, विविध भाषा, संगणक आणि स्पर्धा परीक्षांची तयारी यांसारखे विषय शिकवू शकतात. शैक्षणिक प्रशिक्षणासोबतच मुलं प्रामाणिकपणा, कडक शिस्त, सहानुभूती आणि जबाबदारी यांसारख्या गोष्टीही शिकू शकतात.
शिक्षण हे धर्माचंच काम आहे. पवित्र कुराणचा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा आदेश याच गोष्टीवर आहे. "ज्याने तुला निर्माण केलं, त्या तुझ्या प्रभूच्या नावाने वाच," असा पवित्र कुराणचा (९६:१) आदेश आहे. एखाद्या गरजू मुलाला गणिताचा कठीण प्रश्न सोडवायला मदत करणारी मस्जिद ग्रेटच म्हणली पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याला उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन करणारी किंवा एखाद्या तरुणाला उपयुक्त कौशल्य शिकायला मदत करणारी मस्जिद संपूर्ण समुदायाला अधिक मजबूत करण्यात स्वतःचा मोलाचा वाटा उचलते.
या व्यतिरिक्त इतरही अनेक शक्यता उपलब्ध आहेत. समुपदेशन आणि कौटुंबिक मदतीचे वर्ग, तरुणांसाठी व्यावसायिक मार्गदर्शन, गरजूंना अन्न वाटप, विधवा आणि वृद्धांची मदत. तसंच वैद्यकीय शिबिरं, पर्यावरण संरक्षणाच्या मोहिमा, नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्याची तयारी आणि आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांची मदत. ही सर्व कामं मस्जिदीच्या माध्यमातून केली जाऊ शकतात. पवित्र कुराण एका गोष्टीवर भर देतं. "पुण्य आणि भक्तीच्या कामांमध्ये एकमेकांना सतत मदत करा," असं पवित्र कुराण (५:२) सांगतं.
हेही वाचा: भारतीय मुस्लिमांचं भविष्य कसं असू शकतं?
एका जिवंत आणि मोठ्या मस्जिदीचा हाच व्यापक अर्थ आहे. तिचे दरवाजे केवळ प्रार्थना सभागृहाकडे उघडण्याऐवजी संपूर्ण समुदायासाठी खुले असले पाहिजेत. अल्लाहसमोर नेमकं कसं उभं राहायचं, हे मस्जिद आपल्याला शिकवते. पण एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे कसं उभं राहायचं, हे शिक्षणही ती आपल्याला देऊ शकते. एखाद्या मस्जिदीचा समुदाय कसा आहे हे तिच्या सुंदर इमारतीवरून ठरत नाही. कोणाला कडक भूक लागली असेल, एखाद्या विद्यार्थ्याला मदतीची गरज असेल, एखादं कुटुंब संकटातून जात असेल, एखाद्या गंभीर रुग्णाला रक्ताची गरज असेल किंवा एखादा परिसर पुराच्या संकटानंतर पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करत असेल. अशा कठीण वेळी मस्जिदीची उपस्थिती तिथे जाणवणं, हेच तिचं सर्वात मोठं यश असू शकतं. नमाज हा मस्जिदीचा महत्त्वाचा गाभा आहे. पण सहानुभूती, ज्ञान, सेवा आणि सामूहिक जबाबदारी या गाभ्याची पोहोच अधिक व्यापक करू शकते. मस्जिदीत आपण जातोच पण मस्जिदीतून कितीतरी पुण्याई आणि भलाई करणं शक्य आहे.